७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी केले भारताचे अभिनंदन !

नवी देहली – भारताच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जागतिक नेत्यांनी भारताचे अभिनंदन केले आहे.

१. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्वीट केले की, गेल्याच मासात पंतप्रधान मोदी आणि मी वर्ष २०४७ पर्यंत दोन्ही देशांतील संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे ध्येय ठेवले होते. फ्रान्स सदैव भारताचा विश्‍वासू मित्र आणि सहकारी राहिला आहे.

२. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले की, या विशेष दिवशी भारताला विशेष शुभेच्छा ! भारतासमवेत असलेले आमचे रणनैतिक सहकार्य आमच्यासाठी पुष्कळ महत्त्वपूर्ण आहे.

३. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्टनी ब्लिंकन यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले राहिले आहेत.

४. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ट्वीट केले की, आपण एका चांगल्या भविष्याच्या दिशेने एकत्र येऊन कार्य करत आहोत.

५. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता यांचे अभिनंदन करत म्हटले की, भारत आणि इस्रायल यांनी अधिक जवळ यावे अन् एकत्रितपणे समृद्ध व्हावे !