भारतियांनी केलेल्या तपश्चर्येतून १ सहस्र वर्षांचा स्वर्णिम इतिहास अस्तित्वात येणार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ७७ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भारतियांना संबोधित केले
नवी देहली – माझे शब्द लिहून ठेवा. या कालखंडात आपण जे करू, जे निर्णय घेऊ, जो त्याग आणि तपश्चर्या करू, त्यातून येणार्या १ सहस्र वर्षांचा स्वर्णिम इतिहास अस्तित्वात येणार आहे. या कालखंडात घडणार्या घटना पुढील १ सहस्र वर्षांवर प्रभाव निर्माण करतील. १ सहस्र वर्षांचे दास्यत्व आणि १ सहस्र वर्षांच्या भव्य भारताच्या मधोमध आपण उभे आहोत. या संधीकाळात आपण असून आपल्याला कुठेही थांबायचे नाही, तसेच कुठेही द्विधा मन:स्थिती ठेवायची नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी राजधानीतील लाल-किल्ल्यावरून भारतियांना संबोधित करतांना केले.
Addressing the nation on Independence Day. https://t.co/DGrFjG70pA
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड घंटे लोकांना संबोधित केले. यामध्ये त्यांनी त्यांच्या सरकारने गेल्या ९ वर्षांत केलेल्या कार्याची माहिती दिली, तसेच भविष्यात निश्चित केलेल्या ध्येयांविषयीही अवगत केले. या वेळी त्यांनी ‘माझ्या कुटुंबातील प्रिय सदस्यांनो’, या शब्दप्रयोगाचा वारंवार वापर केला. अशा प्रकारे जनतेला साद घालण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या भाषणाचा एक महत्त्वाचा पैलू ठरला.
पंतप्रधान पुढे म्हणाले की,
१. गेल्या १ सहस्र वर्षांमध्ये आपल्यावर अनेक आक्रमणे झाली. किती विचित्र काळ होता तो ! आपण १ सहस्र वर्षे दास्यत्वात जगलो; परंतु जनचेतनेच्या व्यापक रूपाने त्याग आणि तपश्चर्या यांच्या माध्यमातून १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
२. वर्ष २०४७ मध्ये भारताला ‘विकसित राष्ट्र’ म्हणून पहाण्याचे स्वप्न घेऊन आपण पुढे जात आहोत. ते केवळ स्वप्न नसून १४० कोटी भारतियांचा संकल्प आहे. यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यासह सर्वांत मोठी शक्ती म्हणजे आपले राष्ट्रीय चारित्र्य ! हे असे सूत्र आहे, ज्यामुळे आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी पुष्कळ गती मिळणार आहे. आपले राष्ट्रीय चरित्र तेजस्वी, पुरुषार्थी, पराक्रमी आणि प्रखर होणे, हे आपल्या सर्वांचे सामूहिक दायित्व आहे. यासाठी आपल्याला प्रत्येक क्षणी देशाला जोडण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. भारताला वर्ष २०४७ मध्ये ‘विकसित राष्ट्र’ म्हणून आपल्याला पहायचे असेल, तर कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराला सहन करू नका !
३. आपल्याला ३ गोष्टींशी लढावे लागणार आहे. त्या म्हणजे भ्रष्टाचार, परिवारवाद आणि लांगूलचालन ! भ्रष्टाचाराने वाळवीप्रमाणे आपल्या सर्व व्यवस्था आणि सामर्थ्य यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवायची असेल, तर देशातील प्रत्येक विभागामध्ये आपल्याला तसे कार्य करावे लागेल. घराणेशाहीने आपल्या देशाला जखडून ठेवले आहे, लोकांकडून त्यांचे अधिकार हिरावून घेतले आहेत. तुष्टीकरणाने आपल्या सर्वसमावेशक राष्ट्रीय चारित्र्यावर डाग लावला आहे. आपल्या सर्वांना या तीन शत्रूंच्या विरोधात लढायचे आहे.
मणीपूरच्या समस्येवर शांततेच्या मार्गातूनच उपाय शक्य ! – पंतप्रधानमणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणांवर या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मणीपूरसह काही राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. विशेषकरून मणीपूरमध्ये आई-बहिणींच्या सन्मानाशी खेळले गेले, अनेक लोकांना जीव गमवावा लागला. तरी आता तेथील मणीपुरी जनता शांतता राखत आहे. शांतीच्या मार्गानेच आपल्याला उपाय सापडणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून त्यांच्या समस्यांवर उपाय योजण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रयत्न करीत आहे. |