छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोव्याशी असलेल्या संबंधांची कागदपत्रे उजेडात आणणार ! – पुरातत्व मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा

मडगाव रवींद्र भवनात देशाच्या फाळणीतील अत्याचारांच्या स्मृतींना उजाळा देणारे प्रदर्शन

मडगाव, १४ ऑगस्ट (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याशी असलेले संबंध, गोव्यासाठी त्यांनी केलेले कार्य या संदर्भातील कागदपत्रे, दस्तावेज पुराभिलेख खात्याकडे उपलब्ध आहेत. वर्ष १५१० पासूनचा इतिहास, होऊन गेलेल्या महान व्यक्ती यांची माहितीही उपलब्ध आहे. किल्ल्यांवर जाऊन माहिती गोळा करण्यात आली असून, ही माहिती उजेडात आणण्यात येणार आहे, असे पुराभिलेख आणि पुरातत्व तथा समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मडगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. पुरातत्व खात्याच्या वतीने मडगाव येथील रवींद्र भवनात ब्रिटीश भारत सोडून जातांना १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेली देशाची फाळणी आणि या फाळणीच्या वेळी देशवासियांवर झालेले अनन्वित अत्याचार यासंदर्भात माहिती देण्यासाठी भरवण्यात आलेल्या ‘पार्टीशन हॉरर्स रिमेबरन्स डे’ (फाळणीची भयावहता स्मृतीदिन) या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री सुभाष फळदेसाई बोलत होते. या वेळी व्यासपिठावर माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार तथा कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, अनिवासी भारतीय आयुक्त अधिवक्ता नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक आदी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांसहित अनेकांनी हे प्रदर्शन पाहिले.

देशाच्या फाळणीतील अत्याचारांच्या स्मृतींना उजाळा देणारे प्रदर्शन पाहतांना मंत्री सुभाष फळदेसाई, माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत, कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकरआणि इतर मान्यवर

सुभाष फळदेसाई पुढे म्हणाले, ‘‘ब्रिटीश भारत सोडून जातांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाची फाळणी होऊन झालेली पाकिस्तानची निर्मिती हा देशाच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस असून या वेळी करण्यात आलेले अत्याचार, हाल, धार्मिक कलह आणि एकूण त्यावेळची भयानक स्थिती याची माहिती आजचे विद्यार्थी, युवावर्ग अन् सर्वांनीच करून घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, तर सीमेवर असलेल्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित असल्याने त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ राहिले पाहिजे.’’

आमदार दिगंबर कामत म्हणाले, ‘‘फाळणीचा काळ हा खरोखरच वेदनादायी होता. अनेकांना विस्थापित व्हावे लागले आणि सर्वस्व सोडून पाकिस्तानातून येऊन भारतात रहावे लागले. अनेकांना झोपड्यांत रहावे लागले. सासष्टीतील किनारपट्टी भागातील एका तारांकित हॉटेलचे मालक असलेले माझे एक मित्र फाळणीच्या वेळी असेच सर्व काही सोडून पाकिस्तानातून भारतात आले आणि झोपड्यांतही राहिले. आज कष्टाने, जिद्धीने त्यांनी उद्योग उभारला आहे.’’