आय.व्ही.एफ्. उपचारपद्धत विनाशुल्क देणारे गोवा हे पहिले राज्य असेल ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

(आय.व्ही.एफ्. ही गर्भधारणेशी संबंधित अडचण सोडवणारी एक उपचारपद्धत)

आय.व्ही.एफ्. ही गर्भधारणेशी संबंधित एक उपचारपद्धत

पणजी, १४ ऑगस्ट (वार्ता.) – आय.व्ही.एफ. (इन व्हिट्रो फर्टीलायझेशन) उपचारपद्धत विनाशुल्क देणारे गोवा हे पहिले राज्य ठरेल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी १४ ऑगस्टला येथे दिली.

ते म्हणाले, ‘‘१ सप्टेंबरपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपरस्पेशालिटी विभागात मुले होत नसलेल्या दांपत्यांसाठी आय.व्ही.एफ् उपचारपद्धतीची सुविधा उपलब्ध होईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधीच ५० ते १०० जणांनी नावनोंदणी केली आहे.’’

प्रत्येक आय.व्ही.एफ्. उपचारपद्धतीसाठी सरकार सरासरी ५ ते ७ लाख रुपये खर्च करणार असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांनी दिली.

१४ ऑगस्टला सकाळी आरोग्य खात्याकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर नेते यांच्या उपस्थितीत ए.आर्.टी. (असिस्टेड रिप्रॉडक्टीव्ह टेक्नॉलॉजी) आणि आय.यु.आय. (इन्ट्रायुटेरिन इन्सेमिनेशन) ही केंद्रे चालू करण्यात आली. या विभागात उपकरणांसाठी सरकार खासगी आस्थापनांकडून सी.एस्.आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून साहाय्य घेणार आहे.