साधक भाऊ-भावजय यांच्याविषयी आदर असणारे आणि त्यांना समजून घेऊन प्रेमाने साहाय्य करणारे देवीभक्त गावडे कुटुंबीय !
सौ. राधा गावडे आणि श्री. घनश्याम गावडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४९ वर्षे) हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. त्यांचे कुटुंबीय मडकई, गोवा येथे एकत्र रहातात. त्यांना त्यांच्या कुटुंबियांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सौ. राधा गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. शेजारचे लोक सनातन संस्थेविषयी नकारात्मक बोलल्याचे सासर्यांनी घरी सांगितल्यावर दीर श्री. वामन गावडे यांनी सासर्यांना समजावून सांगून सनातन संस्थेविषयी सकारात्मक करणे : ‘वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे असलेल्या दळणवळण बंदीच्या काळात माझ्या सासर्यांजवळ (कै. गणेश गावडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याजवळ) शेजारचे लोक ‘सनातन संस्थेविषयी’ नकारात्मक बोलले. तेव्हा माझ्या सासर्यांनी ते घरी येऊन माझ्या दिरांना (श्री. वामन गावडे यांना) सांगितले. तेव्हा दिरांनी त्यांना समजावून सांगितले, ‘‘तुम्ही लोक काय म्हणतात ?’, याकडे लक्ष देऊ नका. लोक काहीही बोलतात. ते बोलतात, ते आपण खरे समजायचे नाही.’’ असे समजावून त्यांनी माझ्या सासर्यांना सनातन संस्थेविषयी सकारात्मक केले.
१ आ. साधिकेच्या विवाहानंतर सणाला सासरी गोड पदार्थ पाठवण्याची प्रथा साधिकेच्या माहेरी ठाऊक नसल्याचे लक्षात घेऊन ‘आपणच गोड पदार्थ आणून वाटूया’, असे सांगणारे समंजस दीर श्री. वामन गावडे ! : माझ्या सासरी सणाला नवविवाहित सूनेच्या माहेरहून ‘गोड पदार्थ भेट म्हणून यायला हवा’, अशी प्रथा आहे; पण माझ्या माहेरच्यांना माझ्या सासरी असलेली ही प्रथा ठाऊक नसल्याने त्यांनी गोड पदार्थ पाठवला नाही. तेव्हा शेजारचे लोक माझ्या सासर्यांना म्हणाले, ‘‘सुनेच्या माहेरहून गोड पदार्थ आला नाही का ?’’ सासर्यांनी शेजार्यांचे हे बोलणे घरी सांगितले. तेव्हा माझे दीर (श्री. वामन गावडे) सासर्यांना म्हणाले, ‘‘वहिनींच्या घरच्यांना ही प्रथा ठाऊक नसेल. आपणच गोड पदार्थ विकत आणून गावात वाटूया.’’ अशा प्रकारे त्यांनी मला वाईट वाटू न देता सांभाळून घेतले. त्यांचे हे बोलणे ऐकून मला भरून आले.
१ इ. आर्थिक अडचण असूनही देवाला पैसे अर्पण करणार्या दीरांचा देवाप्रती असलेला भाव ! : वर्ष २०२१ मध्ये माझे दीर श्री. वामन गावडे यांनी आर्थिक अडचणींमुळे घराच्या दाराचे काम थोडे लांबणीवर टाकले होते; मात्र गणेशचतुर्थीच्या काळात आमच्या गावातील सार्वजनिक गणपती उत्सवासाठी त्यांनी एक सहस्र रुपयांची देणगी दिली. नंतर त्यांना सार्वजनिक गणपती मंडळाकडून ठेवलेले पहिल्या क्रमांकाचे २५ सहस्र रुपयांचे बक्षीस मिळाले. स्वतःकडे पैसे न्यून असतांनाही त्यांनी स्वतःची अडचण बाजूला सारून देवासाठी अर्पण दिले. यातून त्यांचा देवाप्रती असलेला भाव दिसला. देवानेही त्यांना पंचवीस पट अधिक पैसे दिले.
१ ई. साधिकेला समजून घेऊन वागणारे कुटुंबीय ! : गणेशचतुर्थीच्या कालावधीत घरी पुष्कळ सेवा असतात. ‘मी दमले आहे’, असे माझ्या जावांच्या लक्षात आल्यावर त्या मला समजून घेऊन त्यांच्या तुलनेत थोडी हलकी सेवा करायला सांगतात आणि मला थोडी विश्रांती घ्यायला सांगतात. त्यामुळे मला ‘मी माहेरी आईकडे आहे कि सासरी आहे ?’, असा प्रश्न पडतो. एवढे त्यांचे प्रेम मला मिळते. त्यामुळे माझ्या तिन्ही जावा (सौ. वैष्णवी वामन गावडे, सौ. छाया सीताराम गावडे आणि सौ. पूर्णा रामकृष्ण गावडे) मला बहिणीसारख्याच वाटतात.
१ उ. ‘भाऊ-वहिनी पूर्णवेळ साधना करत असल्यामुळे ते पैसे मिळवत नाहीत’, हे लक्षात घेऊन नातेवाइकांकडे जातांना आर्थिक साहाय्य करणारे माझे सर्व दीर !
१. आमचे नवीन लग्न झाल्यावर आम्ही नातेवाइकांकडे जायचोे. तेव्हा ‘आम्ही आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत असल्यामुळे पैसे मिळवत नाही’, हे लक्षात घेऊन माझे तीनही दीर आम्ही घेत नसलो, तरी माझ्या यजमानांच्या (श्री. घनश्याम यांच्या) खिशात पैसे ठेवायचे. ‘‘तुम्हाला वाटेत पेट्रोलसाठी पैसे लागतील’’, असे म्हणायचे. एवढे त्यांचे आमच्यावर प्रेम आहे.
२. आमच्या गावामध्ये प्रतिवर्षी ‘धालो’ (स्त्रियांचा उत्सव) असतो. तो साजरा करण्यासाठी घरातल्या प्रत्येक स्त्रीकडून पोटी (ठराविक पैसे) घेतले जातात. मी घरी रहात नसल्यामुळे ‘माझे जेवढे पैसे द्यावे लागतात, तेवढे पैसे माझे कुटुंबीय देतात. आम्ही त्यांना ‘किती पैसे दिले’, असे विचारल्यावर ‘आम्ही दिले आहेत’, असे सांगतात. आम्ही त्यांना ते पैसे देऊ केले, तरी ते घेत नाहीत.
१ ऊ. एकत्र रहाणे : माझ्या यजमानांनी त्यांची भावंडे आणि भावजया यांना सर्वांनी एकत्रित अन् प्रेमाने रहाण्याचे महत्त्व पटवून दिल्यामुळे ते सर्व जण आनंदाने एकत्र रहात आहेत.’
२. सौ. राधा गावडे आणि श्री. घनश्याम गावडे
अ. ‘घरी आल्यावर आमच्याकडून आम्ही घरातील कामे करायला पाहिजेत’, अशी कुटुंबियांची अपेक्षा नसते.
आ. माझ्या जावा त्यांच्या मुलांना रागावतांना दिसल्यास आम्ही दोघेही जावांना ‘योग्य वर्तन कसे असले पाहिजे ? मुलांना प्रेमाने कसे समजावून सांगायला पाहिजे ?’, याविषयी सांगतो. तेव्हा त्या आम्हाला उलट उत्तरे देत नाहीत. त्या आम्ही सांगत असलेले सर्व ऐकून घेतात. यातून त्यांच्या मनात आमच्याप्रती असलेला आदरभाव दिसून येतो.’
‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्हाला असे प्रेमळ कुटुंब मिळाले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
(१०.१.२०२३)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गावडे कुटुंबियांच्या घरी दिलेली अविस्मरणीय भेट !
१. ‘कुटुंबीय करत असलेली देवीची सेवा देवीच्या चरणी रुजू झाल्यामुळे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना गावडे कुटुंबियांना भेटावे’, असे वाटले असेल’, असे वाटणे
‘जानेवारी २०२३ मध्ये माझ्या यजमानांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘मला तुमच्या कुटुंबियांना भेटायचे आहे.’’ तेव्हा मला वाटले, ‘आमचे सर्व कुटुंबीय श्री नवदुर्गादेवीचे भक्त आहेत. ते देवीची सेवा करण्यासाठी मंदिरात जातात. ते ती सेवा मनापासून करतात. त्यांची सेवा नवदुर्गेचे रूप असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणी पोचली; म्हणूनच श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘कुटुंबियांना भेटावे’, असे वाटले. ‘देवीचे तत्त्व कसे कार्यरत असते’, हेही यातून मला शिकायला मिळाले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या भेटीच्या वेळी दीर श्री. सीताराम गावडे पूर्णवेळ भाववस्थेत असणे आणि त्यांना साधना करण्याची तीव्र इच्छा होणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या भेटीच्या वेळी माझे दीर श्री. सीताराम गावडे पूर्णवेळ भावावस्थेत होते. त्यांना ‘आपणही साधना करायला पाहिजे’, असे तीव्रतेने वाटले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अर्धा घंटा आमच्या घरी थांबल्या होत्या. त्या पूर्ण कालावधीत दिरांच्या (श्री. सीताराम गावडे यांच्या) डोळ्यांतून अखंड भावाश्रू येत होते.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची साधी रहाणी, हसतमुख चेहरा आणि साधनेचे तेज यांमुळे कुटुंबीय भारावून जाणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या भेटीनंतर मी कुटुंबियांना विचारले, ‘‘तुम्हाला कसे वाटले ?’’ं तेव्हा त्या सर्वांनी सांगितले, ‘‘आरंभी आमच्या मनामध्ये विचार होते, ‘आपल्याला कुणीतरी मोठी व्यक्ती भेटायला येत आहे. ती कशी असेल ?’; मात्र श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आम्हाला भेटल्या, तेव्हा त्यांचे एकदम साधे रहाणे आणि हसतमुख चेहरा पाहून आम्हाला आनंद झाला. त्या आमच्यातल्याच एक होऊन गेल्या. त्यांच्या वागण्यात वेगळेपणा वाटला नाही. त्या किती सुंदर आणि गोड बोलत होत्या. ‘त्यांच्याकडे बघतच रहावे’, असे वाटले.’’
४. गावडे कुटुंबियांना भेटून आल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना त्यांच्या सेवेच्या कक्षात कुंकवाच्या सुगंधाची अनुभूती येणे
आमच्या कुटुंबियांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भेटून आल्यावर त्या त्यांच्या सेवेच्या कक्षात गेल्या. तिथे त्यांना कुंकवाचा सुगंध आला. त्या आमच्या घरी आल्या असतांना आम्ही सर्व जण देवीच्या सेवेविषयीच बोलत होतो. त्यामुळे ‘देवीने ही अनुभूती दिली’, असे त्या आम्हाला म्हणाल्या.’
– सौ. राधा गावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |