कर्नाटकात गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करू नयेत !

बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित

बेंगळुरू (कर्नाटक) – मागील भाजपशासित सरकारने राज्यात धर्मांतरबंदी, तसेच गोहत्याबंदी कायदे केले होते. ते सध्याच्या काँग्रेस सरकारने रहित करू नयेत, तसेच त्यांची तीव्रताही अल्प करू नये, अशी मागणी येथे आयोजित संत संमेलनामध्ये करण्यात आली. विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या या संमेलनामध्ये विविध मठांचे १४ संत-महंत सहभागी झाले होते. या वेळी वरील मागण्यांचे प्रस्ताव एकमुखाने संमत करण्यात आले.

शहरातील मल्लेश्‍वरम्च्या यदुगिरि यतिराजा मठात आयोजित संत संमेलनामध्ये ‘गोहत्या’, ‘हिंदु म्हणजे अविभाजित परिवार’, ‘पर्यावरण’ आदी विषयांवरही चर्चा करून प्रस्ताव मान्य करण्यात आले. प्रस्तावांवर हस्ताक्षर करणार्‍यांमध्ये यदुगिरि यतिराजा मठाचे यदुगिरि यतिराजा नारायण रामानुज जीयर स्वामीजी, रामकृष्ण मिशनचे चंद्रेशानंदजी, महालिंगेश्‍वर मठाचे रविशंकर शिवाचार्य स्वामीजी यांच्यासह एकूण १४ महंत सहभागी होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सत्तेवर येताच सांगितले होते की, त्यांचे सरकार धर्मांतरविरोधी कायदा परत घेईल; परंतु आतापर्यंत गोहत्याबंदी कायदा रहित करण्याचा त्यांचा विचार नाही. (हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले कृतघ्न हिंदुद्वेष्टे काँग्रेस सरकार ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हिंदूंनी हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसला सत्ता दिल्याने हिंदूंच्या संतांना अशी मागणी करावी लागत आहे, हे नतद्रष्ट हिंदूंना लज्जास्पद !