गोवा : बेतकी, बोरी येथील इस्कॉनच्या भक्तांवरील आक्रमणाचा भजनाद्वारे निषेध

मंडगाव पोलीस ठाण्यासामोर निदर्शने करतांना इस्कॉनचे भक्त

बोरी – बेतकी, बोरी येथील इस्कॉनच्या प्रकल्पाला काही स्थानिकांनी १२ ऑगस्टला विरोध दर्शवून प्रकल्पाकडे जाण्यासाठी बांधण्यात येणार्‍या रस्त्याच्या कामाला विरोध केला. रस्त्याचे काम चालू असतांना त्या ठिकाणी असलेल्या इस्कॉनच्या भाविकांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून योग्य प्रकारे अन्वेषण करत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी १३ ऑगस्टला इस्कॉनच्या भाविकांसह हिंदु संघटनांनी केली आहे.

(सौजन्य : Dainik Gomantak TV) 

दक्षिण गोवा जिल्हा पोलीस मुख्यालयाबाहेर यासाठी रविवारी सकाळी भजन करत घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.

इस्कॉनच्या प्रकल्पावरून बोरी पंचायत कार्यालयातही पंचायत मंडळ आणि स्थानिक यांमध्ये चर्चा झाली होती. प्रकल्पाला दिलेला ना हरकत दाखला मागे घेण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.

प्रकल्प कायदेशीरच ! – सूरज चोडणकर, प्रवक्ते, इस्कॉन

इस्कॉनचे प्रवक्ते सूरज चोडणकर यांनी सांगितले की, राज्यशासनाकडून इस्कॉनच्या प्रकल्पासाठी चांगले सहकार्य मिळत आहे. इस्कॉनच्या या प्रकल्पासाठी सर्व आवश्यक त्या अनुज्ञप्त्या (परवानग्या) घेण्यात आल्या आहेत. ज्यांना शंका असेल, ते माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन निश्चिती करू शकतात.

(सौजन्य : OHeraldo Goa)

या प्रकल्पात गोशाळा, रेन हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी साठवण्याचा) प्रकल्प केला जाईल. निसर्गाची कोणतीही हानी केली जाणार नाही, उलट औषधी झाडे आणि इतर झाडे लावण्यात येतील. हा प्रकल्प बोरीच्या लोकांच्या विरोधात नाही; मात्र काही ठराविक लोक या प्रकल्पाला विरोध करतात. मारहाणीच्या विरोधात फोंडा पोलिसांत तक्रार नोंद केलेली असून १४ ऑगस्टला पोलीस अधीक्षकांची भेट घेत न्यायाची मागणी करणार आहोत.

इस्कॉनच्या भाविकांवरील आक्रमण दुर्दैवी ! – नितीन फळदेसाई, राष्ट्रीय बजरंग दल

राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. नितीन फळदेसाई यांनी सांगितले की, इस्कॉनच्या प्रकल्पाच्या ठिकाणी भाविकांवर आक्रमण होणे, हे दुर्दैवी आहे. धर्माचे काम करत असतांना शास्त्र आहेच; पण शस्त्रही हवे. ज्या ठिकाणी लागेल, त्या ठिकाणी बजरंग दल सहकार्य करेल.