राष्ट्रध्वजाचे चित्र छापलेल्या वस्तूंच्या उत्पादकांवर सरकारने कठोर कारवाई करावी ! – राष्ट्रप्रेमींची मागणी
उत्तरप्रदेश आणि बिहार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर
वाराणसी (उत्तरप्रदेश) – १५ ऑगस्ट या देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक ठिकाणी प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाची सर्रासपणे विक्री करण्यात येते. हेच राष्ट्रध्वज दुसर्या दिवशी कचर्यामध्ये किंवा नाल्यासह इतरत्र पडलेले आढळतात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तसेच अनेक ठिकाणी विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून राष्ट्रध्वजासारखी मुखपट्टी, टी-शर्ट आणि टोपी यांची विक्री करतात, अशा व्यक्ती, दुकाने, आस्थापन, संघटना यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीसह अनेक राष्ट्रप्रेमींकडून प्रशासनाला सादर करण्यात आले. मुजफ्फरपूर आणि हाजीपूर (बिहार) अन् वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे जिल्हाधिकारी, तसेच पोलीस यांना निवेदन देण्यात आले.