प्राणी कल्याण अधिकार्यांचे अपहरण आणि मारहाण !
कोल्हापूर येथे कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारे वाहन अडवले !
कोल्हापूर – कत्तलीसाठी जाणार्या गायींची वाहतूक करणारे वाहन अडवल्याने प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारीक यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार १२ ऑगस्टला घडला. या प्रकरणी ६ जणांच्या विरोधात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बारीक यांना मारहाण झाल्याचे समजताच सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांनी तातडीने पेठवडगाव येथील पोलीस ठाण्यात जाऊन बारीक यांची चौकशी केली, तेथे तक्रार देऊन त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात भरती करून उपचार केले.
एका टेंपोतून गोवंश कत्तलीसाठी कर्नाटककडे जात असल्याची माहिती आशिष बारीक यांना मिळाली. ही माहिती मिळाल्यावर बारीक यांनी त्यांचे मित्र सूरज चव्हाण यांना घेऊन पेठनाका येथून त्या टेंपोचा पाठलाग गेला. किणी पथकर नाक्यावर टेंपो थांबला असता बारीक यांनी चालकास गाडीतील गोवंशाविषयी विचारणा केल्यावर समाजकंटकांनी बारीक यांना मारहाण केली. त्यांच्या खिशातील भ्रमणभाष आणि कागदपत्रे काढून घेतली. त्यांना पथकर नाक्यापासून बाजूला नेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास खंडणीचा गुन्हा नोंद करण्याची धमकी देऊन वाठार पुलाखाली सोडून पसार झाले.
सदरच्या घटनेत सचिन साळुंखे हा प्रमुख सूत्रधार असून त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्याचे आणि त्याच्या सांगण्यावरूनच अन्य समाजकंटकांनी बारीक यांना मारहाण केल्याचे गोरक्षकांनी सांगितले. या घटनेमुळे गोरक्षकांमध्ये संताप आहे. महाराष्ट्रात गेल्या काही कालावधीत गोरक्षकांवरील आक्रमणे परत वाढली असून यावर शासन आणि पोलीस यांना तातडीने कठोर कारवाईची मागणी गोरक्षकांनी केली आहे.
संपादकीय भूमिका :गायींची कत्तल करणार्यांची मजल कुठवर गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते. कत्तल करणार्यांना त्वरित कठोर शिक्षा झाल्याविना हे थांबणार नाही. प्रशासनाने गोहत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी ! |