पावसाळी अधिवेशनातील विधान परिषदेमधील कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन !
पुणे – पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. विकासासाठी पूरक विधेयके संमत झाली, तसेच या अधिवेशनामध्ये राजकीय सूत्रांवर चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये विसंवाद होऊ नये; म्हणून ‘उपसभापती’ या नात्याने दोन्ही बाजूंशी संवादाच्या माध्यमातून सांगड घालत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले, अशी भावना उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केले. पावसाळी अधिवेशनाच्या काळात सभागृहात झालेल्या कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कारही केला.
या कार्यक्रमाच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. नीलम गोर्हे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील देवस्थानचा विकास, महिलांचे प्रश्न यासंदर्भात बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचे गोर्हे यांनी सांगितले. मंदिरांच्या ट्रस्टवर महिला सदस्यांना अधिक प्रतिनिधित्व देणे, जिल्ह्यातील जेजुरी देवस्थानच्या संदर्भात पुणे विभागीय आयुक्तांशी चर्चा, शहरातील वाहतुकीच्या संदर्भातील प्रश्न आदी विषयांवर चर्चा झाली. या कार्यक्रमाला पुणे शहर संघटक, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसभापतींचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री. किरण काकडे यांनी केले.