रोहिडेश्वर प्रवेशद्वाराजवळील तटबंदी पावसामुळे ढासळली !
भोर (जिल्हा पुणे) – भोरपासून अनुमाने १२ कि.मी. अंतरावर असणार्या रोहिडेश्वराच्या (रोहिडा) मुख्य प्रवेशद्वाराजवळील तटबंदीचा बुरुज १० ऑगस्टला मध्यरात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्यामुळे गडावर पर्यटकांना जाणे अवघड झाले आहे, तर काही ठिकाणी पावसामुळे भेगा पडल्या असल्यामुळे तटबंदी ढासळण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे गडावरील पायवाट बंद झालेली आहे. शासन एकीकडे गडसंवर्धनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये ठराविक गडदुर्गांसाठी व्यय करत आहे; परंतु जे गड पुरातत्व विभागाकडे आहेत, त्या गडांसाठी शासन निधी उपलब्ध करत नसल्याचे दिसून येत आहे. गावकर्यांनी गडाच्या तटबंदीची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. (पुरातत्व विभाग गडदुर्गांचे संवर्धन कधी करणार ? – संपादक) याविषयी बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे मत ट्वीट करून व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, स्वराज्याची साक्ष देणार्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रोहिडेश्वराच्या (रोहिडा) प्रवेशद्वाराजवळील तटबंदी बुरुज नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्याची डागडुजी, दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गडप्रेमी नागरिकांसाठी हा गड अतिशय महत्त्वाचा आहे. यासह इतिहासाच्या अभ्यासक आणि नागरिक यांसाठी हा उज्ज्वल वारसा आहे. या वास्तूचे जतन आणि संवर्धन व्हायला हवे. जिल्हाधिकारी पुणे यांनी याविषयी सकारात्मक विचार करून आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे.