मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी !
१५ ऑगस्टनंतर त्यांना बळजोरीने रुग्णालयात भरती करणार ! – संजय शिरसाट, आमदार, शिवसेना
छत्रपती संभाजीनगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुष्कळ खराब आहे. त्यामुळे आम्ही त्यांना १५ ऑगस्टनंतर बळजोरीने रुग्णालयात भरती करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी १२ ऑगस्ट या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळ गावी गेले आहेत. ते पुणे येथील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यालाही उपस्थित राहिले नाहीत. प्रारंभी ते या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित रहातील, असे सांगण्यात आले; पण ते ‘ऑनलाईन’ही उपस्थित राहिले नाहीत.
संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ घंटे काम करतात. हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना आधुनिक वैद्यांकडे जाण्याची विनंती केली आहे. त्यांची प्रकृती एवढी खराब आहे की, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही जवळ रहात असल्याने त्यांची माहिती आहे. सत्ताधारी पक्षांत पालकमंत्रीपदावरूनही कोणतीही अप्रसन्नता नाही. काहीजण जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवत आहेत. त्यांना काम नाही; म्हणून असली विधाने चालू आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोणतेही शीतयुद्ध चालू नाही.
अजित पवार यांनी ‘वॉर रूम’मध्ये घेतलेली बैठक असो की, मंत्र्याकडून होणारे झेंडा वंदन असो, यावरून राज्यात चर्चेला उधाण आले आहे; पण आम्ही सर्वजण मिळून काम करत आहोत. अजित पवार यांनी वॉर रूममध्ये अतिक्रमण केले नाही. ही कुणाच्यातरी सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. कोविड घोटाळ्यातील बॉडी बॅग प्रकरणाचे अन्वेषण ईडी करत आहे. या प्रकरणी अटकेतील आरोपींनी अनेकांची नावे घेतली आहेत. त्यामुळे आता मोठी नावे उजेडात येतील. कितीही मोठे कुटुंब असले तरी ४ पैकी १ जण कारागृहात जाणारच आहे.