राज्यपालांची भेट घेऊन पत्रकार संघटनांनी केली कारवाईची मागणी !
आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी पत्रकाराला मारहाण केल्याचे प्रकरण !
मुंबई – पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत जळगावमधील पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली आहे. ११ ऑगस्ट या दिवशी विविध ११ पत्रकार संघटनांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
काही दिवसांपूर्वी संदीप महाजन या स्थानिक पत्रकाराला आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी मारहाण केली. याविषयी कारवाईचे निवेदन दिल्यावर राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. या वेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशन, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई प्रेस क्लब, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, क्राईम रिपोर्टर असोशिएशन, पोलिटिकल फोटो जर्नलिस्ट असोशिएशन, म्हाडा पत्रकार संघ, मुंबई महापालिका पत्रकार संघ आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.