स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ बंदीवानांची कारागृहांतून सुटका होणार !
केंद्रीय गृह सचिवाकडून माहिती
मुंबई – येत्या १५ ऑगस्ट या दिवशी देशाचा ७६ व्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहांतील विशिष्ट प्रवर्गाच्या बंदीवानांना ३ टप्प्यांमध्ये विशेष क्षमा (माफी) करण्यात येत आहे. या क्षमेच्या तिसर्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी १८६ बंदीवानांना विशेष क्षमा करून कारागृहांतून मुक्त करण्याविषयीचे आदेश सरकारने दिले आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय गृह सचिवाकडून याविषयीची माहिती देण्यात आली आहे.
क्षमा योजनेचा उद्देश हा बंदीवानांमध्ये कारागृहातील शिस्त आणि आचरण निश्चित करणे, तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळे बंदीवानांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे उत्तरदायी नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. बंदीवानांची पात्रता पडताळण्यासाठी ९ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या वतीने शिफारस केलेल्या बंदीवानांच्या प्रस्तावास राज्यपालांची मान्यता घेण्यात आली आहे. गेल्या २ वर्षांत ३ टप्प्यांत २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी एकूण ५८१ बंदीवानांची कारागृहांतून मुक्तता करण्यात आली आहे.