सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सवाचे सूक्ष्म परीक्षण आणि साधकांना झालेले आध्यात्मिक स्तरावरील लाभ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या विशिष्ट वेशभूषेमुळे साधकांना भक्ती आणि ज्ञान यांचा प्रसाद मिळणे, रथोत्सवातील एकूण क्रम आणि त्याची जाणवलेली काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये’, यांविषयी आपण वाचले. आज त्या पुढील सूत्रे येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/708428.html
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सूक्ष्म स्तरावरील रथोत्सव अन् त्याचे परिणाम
स्थुलातून साधकांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ ओढून रथोत्सव साजरा केला असला, तरी सूक्ष्मातून अनुक्रमे शेष, अश्व, हंस, सिंह, गरुड, गज आणि प्रकाश अशा विविध शक्तीस्वरूपांनीही रथ ओढला. संपूर्ण रथोत्सवात ‘बाल श्रीकृष्ण रथासमोर नृत्य करत चालत आहे’, असे मला दिसले.
या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून समष्टीसाठी आवश्यक अशी विविध प्रकारची शक्ती प्रक्षेपित होत आहे. साधकांकडे प्रक्षेपित होणार्या विविध शक्तींचे प्रतीक म्हणून विविध शक्ती रथ ओढतांना दिसत आहेत.’ पुढील विश्लेषणातून हे सूत्र आणि त्याचे साधकांवर झालेले परिणाम अधिक स्पष्ट होतील.
६ अ. मोठ्या वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी शेषनागाने छत्र बनून काही वेळ रथाच्या समवेत चालणे : पुरुष साधकांनी मंडपातून रथ ओढून प्रांगणात आणला, तेव्हा मला सूक्ष्मातून रथाच्या समोर ५ अश्व आणि रथाच्या मागे सूक्ष्मातून १० फण्यांचा शेषनाग दिसला. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधकांना व्यवस्थित दर्शन होऊ नये आणि ब्रह्मोत्सवात अडथळे निर्माण व्हावेत’, यांसाठी पाताळातील मोठ्या वाईट शक्ती साधक, स्थळ आणि उपकरणे यांवर आक्रमणे करत आहेत. या आक्रमणांपासून सर्वत्रच्या समष्टीचे रक्षण होण्यासाठी शेषनाग (निर्गुण शक्ती) कार्यरत आहे. या निर्गुण शक्तीमुळे साधकांचे रक्षण होऊन त्यांना निर्विघ्नपणे कार्यक्रम बघणे शक्य होत आहे.
६ अ १. शेष ही निर्गुण शक्ती असून तिच्या अस्तित्वामुळे सोहळ्यात आणि सोहळ्याच्या प्रक्षेपणात एकही अडचण न येणे : शेष म्हणजे निर्गुणत्व. विश्वपुरुषाचा उल्लेख करतांना वेद सांगतात, ‘चराचर व्यापूनही तो विश्वपुरुष दहा अंगुळे शेष रहातो.’ ही राहिलेली शेषशक्ती म्हणजे निर्गुणत्व, म्हणजे शेषनाग.’ (सनातनच्या विविध कार्यक्रमांचे संगणकीय प्रणालीद्वारे प्रसारण करतांना नेहमी काही ना काही अडथळे येतात; याउलट ‘ब्रह्मोत्सवाच्या कार्यक्रमात एकही अडचण आली नाही’, असे संगणकीय प्रणालीद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रसारण करणार्या साधकांनी सांगितले.) काही वेळ रथाच्या समवेत चालल्यानंतर शेषनाग अंतर्धान पावला.
६ आ. पाताळातील वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणांचे परिणाम नष्ट करून वैकुंठमार्ग (आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग) निर्माण करण्यासाठी सूक्ष्मातील अश्वांनी रथ ओढणे : शेषनाग अंतर्धान पावल्यावर पंचतत्त्वांचे प्रतीक असलेल्या सूक्ष्मातील ५ अश्वांनी काही काळ रथ ओढला. अश्वांच्या चालण्यामुळे पाताळाच्या दिशेने चैतन्य जाऊन वाईट शक्तींनी प्रांगणात केलेल्या आक्रमणांचे परिणाम बर्यापैकी नष्ट झाले. काही वेळाने ५ ही अश्वांचे पाय भूमीवर न लागता ते हवेत तरंगत होते. त्यामुळे एक सूक्ष्म मार्ग निर्माण झाला. तेव्हा ‘रथोत्सवाच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांसाठी वैकुंठमार्ग (आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग) उघडत आहेत’, असे मला जाणवले. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘पाताळातील वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे काही साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यात अडथळे येत आहेत. हे अडथळे नष्ट करून साधकांसाठी आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग उघडण्याची प्रक्रिया सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून होत आहे.
६ इ. पाच अश्वांनंतर आत्मतत्त्वाचे प्रतीक असलेल्या हंसांनी रथ ओढणे आणि त्यामुळे साधकांच्या आत्म्यावरील आवरण न्यून होणे : काही वेळाने ५ अश्व अंतर्धान झाले आणि त्या जागी सूक्ष्मातून पांढर्या शुभ्र रंगाच्या हंसांनी रथ ओढायला आरंभ केला. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘हंस हे आत्मतत्त्वाचे प्रतीक आहे. आनंद हा आत्म्याचा गुणधर्म आहे. आत्म्यावर अहं, स्वभावदोष, बुद्धी अशी विविध आवरणे आल्यामुळे जिवाला निरंतर आनंद अनुभवता येत नाही. हे आवरण न्यून करून साधकांना चिरंतन आनंद देण्यासाठी रथारूढ तिन्ही गुरूंकडून प्रक्षेपित होत असलेल्या निर्गुण तत्त्वाचे प्रतीक म्हणून हंस रथ ओढतांना दिसत आहेत.’
६ ई. हंसांनंतर शक्तीद्वारे अहं न्यून करण्याचे प्रतीक असलेल्या सिंहाने रथ ओढणे : हंसांनंतर ‘सिंह रथ ओढत आहे’, असे मला दिसले. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘सिंह वनाचा राजा असून तो शक्तीद्वारे अहं-निर्मूलन करण्याचे प्रतीक आहे. हिरण्यकश्यपू या राक्षसात एवढा अहं होता की, तो भगवान श्रीविष्णूची पूजा न करता स्वतःची पूजा करण्यासाठी सर्वांवर बळजोरी करायचा. या राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान श्रीविष्णूने नृसिंह (मुख आणि नखे सिंहाची, तर देहाचे अन्य भाग मनुष्याप्रमाणे )(टीप) रूप धारण केले होते. अहंमुळे साधकांना श्री गुरूंचे दिव्य रूप अनुभवता येत नाही. त्यामुळे साधकांमधील अहंचा अडथळा दूर करण्यासाठी तिन्ही गुरूंकडून निर्गुण-सगुण तत्त्व प्रक्षेपित होत होते. तिन्ही गुरूंकडून साधकांमधील अहं न्यून करण्यासाठी प्रक्षेपित होत असलेल्या निर्गुण-सगुण तत्त्वाचे प्रतीक म्हणून सिंह रथ ओढतांना दिसत आहेत.’ (३.७.२०२३, दुपारी ४.३५ ते ४.४५)
टीप : श्रीमद्भागवत या पुराणातील श्लोकांत केलेले भगवान नृसिंहाच्या रूपाचे वर्णन
श्रीमद्भागवत या पुराणातील श्लोक
मीमांसमानस्य समुत्थितोऽग्रतो नृसिंहरूपस्तदलं भयानकम् । प्रतप्तचामीकरचण्डलोचनं स्फुरत्सटाकेशरजृम्भिताननम् ॥
– श्रीमद्भागवत, स्कंध ७, अध्याय ८, श्लोक २०
अर्थ : तो (हिरण्यकश्यपू) असा विचार करत होता, तोच त्याच्या अगदी समोर नृसिंहभगवान उभे राहिले. त्यांचे ते रूप अतिशय भयानक होते. त्यांचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे आरक्त आणि भयानक होते. जांभई दिल्यामुळे आयाळ इकडे तिकडे फडफडत होती.
करालदंष्ट्रं करवालचञ्चलक्षुरान्तजिह्वं भ्रुकुटीमुखोल्बणम् ।
स्तब्धोर्ध्वकर्णं गिरिकन्दराद्भुतव्यात्तास्यनासं हनुभेदभीषणम् ॥
– श्रीमद्भागवत, स्कंध ७, अध्याय ८, श्लोक २१
अर्थ : त्यांच्या दाढा अतिशय विक्राळ होत्या अन् तलवारीप्रमाणे चमकणारी, सुरीप्रमाणे धारदार तीक्ष्ण जीभ होती. भुवया उंचावल्याने त्यांचे मुख अधिकच दारुण (भयंकर) दिसत होते. कान वरच्या बाजूला ताठ दिसत होते. फुगवलेले नाक आणि उघडलेले तोंड पहाडातील गुहेप्रमाणे अद्भुत वाटत होते. फाकलेल्या जबड्यामुळे त्याची भयानकता फारच वाढली होती.
दिविस्पृशत्कायमदीर्घपीवरग्रीवोरुवक्ष:स्थलमल्पमध्यमम् ।
चन्द्रांशुगौरैश्छुरितं तनूरुहैर्विष्वग्भुजानीकशतं नखायुधम् ॥
– श्रीमद्भागवत, स्कंध ७, अध्याय ८, श्लोक २२
अर्थ : (त्यांचे) विशाल शरीर स्वर्गाला स्पर्श करत होते. मान थोडीशी बुटकी आणि मोठी होती. छाती रुंद आणि कंबर बारीक होती. चंद्रकिरणाप्रमाणे असणारे शुभ्र रोम सर्व शरिरावर चमकत होते. चारही बाजूंना शेकडो हात पसरलेले होते. त्यांची नखे हीच (त्यांची) आयुधे होती.
दुरासदं सर्वनिजेतरायुधप्रवेकविद्रावितदैत्यदानवम् ।
– श्रीमद्भागवत, स्कंध ७, अध्याय ८, श्लोक २३
अर्थ : त्यांच्या जवळपास फिरकणेसुद्धा अशक्य होते. आपल्या चक्रादी आणि अन्य देवतांच्या वज्रादी श्रेष्ठ शस्त्रांनी त्यांनी सर्व दैत्य-दानवांना पळवून लावले.
‘नृसिंह’ म्हणजे ज्याचे मुख आणि हाताची नखे सिंहाप्रमाणे आहेत.
१. ‘नृ’ – मनुष्य.
२. नृसिंह – नारसिंह
३. नृप – मनुष्यांचा अधिपती, राजा
६ उ. मनाचे प्रतीक असलेल्या गरुडाने रथ ओढणे : ‘सिंहांनंतर गरुड रथ ओढत आहे’, असे मला दिसले. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘अनेक साधक मानसिक स्तरावर अडकले आहेत. साधनेचे महत्त्व त्यांना बुद्धीने पटते; पण त्यांच्यातील स्वभावदोषांमुळे त्यांना त्याचे प्रत्यक्ष आचरण करता येत नाही. मन हे गरुडवेगाने भरकटत असते. यामुळे गरुड हे मनाचे प्रतीक आहे. साधकांच्या साधनेतील हे अडथळे नष्ट करण्यासाठी तिन्ही गुरूंकडून चैतन्य प्रक्षेपित होत आहे. याचे प्रतीक म्हणून ‘गरुड रथ ओढत आहे’, असे दृश्य मला दिसत आहे.’
६ ऊ. बुद्धीचे प्रतीक असलेल्या गजाने रथ ओढणे : ‘गरुडानंतर बुद्धीचे प्रतीक असलेला गज (हत्ती) रथ ओढत आहे’, असे मला दिसले. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘अनेक साधकांमध्ये बुद्धीचा अडथळा आहे. यामुळे अनेक वर्षे साधना करूनही त्यांची आध्यात्मिक प्रगती होत नाही. हा अडथळा दूर करण्यासाठी तिन्ही गुरूंकडून प्रक्षेपित होत असलेल्या ज्ञानामुळे ‘बुद्धीचे प्रतीक असलेला गज रथ ओढत आहे’, असे दृश्य दिसत आहे.’
६ ए. शिष्यत्वाचे प्रतीक असलेल्या प्रकाशाने रथ ओढणे : गजानंतर प्रकाशाच्या बळावर रथ चालत होता. यांत काही वेळा सोनेरी रंगाच्या प्रकाशाने रथ चालत होता, तर काही वेळा चंदेरी प्रकाशाने रथ चालतांना दिसला. सोनेरी प्रकाश म्हणजे सूर्यशक्ती, तर चंदेरी प्रकाश म्हणजे चंद्रशक्ती. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘आता दिसलेला प्रकाश हा शिष्यत्वाचे प्रतीक आहे. अनेक वर्षांच्या साधनेमुळे काही साधकांमध्ये शिष्यत्व निर्माण झाले आहे. अशा शिष्यांना त्यांच्या प्रकृतीनुसार ‘साधनेचे पुढचे प्रयत्न कसेे करायचे ?’, ‘स्वतः मध्ये कुठले गुण वाढवायचे ?’, ‘परिपूर्ण सेवा कशी करायची ?’, इत्यादींविषयी गुरुतत्त्व त्यांना अधूनमधून मार्गदर्शन करणार आहे. शिष्यत्व म्हणजे चराचरातून साधनेसाठी पूरक (योग्य) ते शिकणे. याचे प्रतीक म्हणजे प्रकाश. यामुळे प्रकाश रथ ओढतांना दिसला.’
६ ऐ. रथोत्सवात सर्वांत पुढे ईश्वरेच्छेचे प्रतीक अशा बालरूपातील मुरलीधर श्रीकृष्णाने नृत्य करत चालणे : रथोत्सवाचा आरंभ होतांच ‘एक क्षण काळ थांबला आहे’, असे मला जाणवले. त्या स्थिर क्षणात आकाशातून अनेक मोरपंखी (मोरपिशी) रंगाचे दैवीकण येऊन ते रथोत्सवातील धर्मध्वजाच्या ५ फूट पुढे एकत्रित होऊ लागले. त्या दैवीकणांतून प्रथम चरण, मग कंबर, छाती, हात, चेहरा असे एक-एक अवयव निर्माण होऊन बालरूपातील (५ – ६ वर्षांच्या) मुरलीधर श्रीकृष्णाचे रूप सिद्ध झाले. श्रीकृष्णाच्या या बालरूपाकडे पाहून मला पुष्कळ आनंद झाला. त्याच्या बालरूपातून सर्वत्र आनंद आणि शांती यांची स्पंदने प्रक्षेपित होत होती. पूर्ण रथोत्सवात बालरूपातील मुरलीधर श्रीकृष्ण नृत्य करत चालत होता. बालकृष्ण चालल्यावर रथोत्सवातील पथके पुढे चालायची आणि कृष्ण चालायचा थांबल्यावर रथोत्सवातील पथकेही काही क्षणांसाठी थांबायची. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘ज्ञान, भक्ती, मधुरता, दिव्यता आणि वैराग्य, म्हणजे श्रीकृष्ण अन् त्याचे बालरूप, म्हणजे ईश्वरेच्छा ! (बाल्यावस्थेत मन आणि बुद्धी यांतील संस्कार पूर्णपणे जागृत नसतात. यामुळे ‘लहान बालके देवाचे रूप असतात’, असे म्हणतात.)
७. रथोत्सवातील ही रथयात्रा सामान्य नसून ‘अवतारायण’ (अवताराची यात्रा) असणे
कार्यक्रमस्थळी रथासाठी एक वेगळा मंडप करण्यात आला होता. या मंडपाच्या डाव्या बाजूला महर्षींचे छायाचित्र, तर उजव्या बाजूला भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र लावण्यात आले होते. ही रथयात्रा महर्षींच्या छायाचित्राच्या बाजूने चालू होऊन पूर्ण प्रांगणाची परिक्रमा करून श्रीकृष्णाच्या छायाचित्रापाशी येऊन थांबली. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘महर्षि म्हणजे समष्टी गुरुरूप, तर भगवान श्रीकृष्ण म्हणजे जगद्गुरु आणि अवतार. गुरुकृपायोगात समष्टी साधना करणारा शिष्य गुरुतत्त्वाशी एकरूप होतो. रथाच्या परिक्रमेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे ‘अवतारायण’ (अवताराची यात्रा) (टीप) समष्टीला दाखवले आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी जीवनभर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘आज्ञाधारक शिष्या’ म्हणून समष्टीला मार्गदर्शन केले. त्यामुळे त्या महर्षींप्रमाणे समष्टी गुरु झाल्या आहेत. आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांना समष्टी गुरुपदातून जगद्गुरु आणि अवतारपद यांकडे नेत आहेत; म्हणून ही रथयात्रा साधारण नसून ‘अवतारायण’ असणे.
टीप – संस्कृत भाषेत आयन म्हणजे ‘यात्रा (फिरणे).’ श्रीरामाच्या जीवनप्रवासाला ‘रामायण’ म्हणतात, तसे अवतार पदाकडे होणार्या वाटचालीला ‘अवतारायण’ असे संबोधले आहे.
८. रथोत्सवाचे सूक्ष्म परिणाम सप्तपाताळ ते सप्तलोकांपर्यंत होणे
रथोत्सव चालू असतांना रथ गतीमान झाल्यामुळे त्याच्या चाकांतून विशिष्ट नाद निर्माण होत होता. हा नाद निर्गुण-सगुण स्तराचा असून त्याचा परिणाम सप्तपाताळातील वाईट शक्तींवर होऊन त्यांची क्षमता पुष्कळ अल्प झाली होती. रथ चालत असतांना त्यातून सूक्ष्मातून सोनेरी रंगाचे दैवी कण पुष्कळ गतीने प्रक्षेपित होत होते. ज्याप्रमाणे वाळवंटात वादळ आल्यावर रेतीचे कण उडतात, त्याप्रमाणे साधक बसलेल्या मंडपाच्या निकट रथ गेल्यावर त्या मंडपातील साधकांकडे वेगाने सोनेरी रंगाचे दैवी कण प्रक्षेपित झालेे. या दैवी कणांचा प्रवास केवळ साधकांपुरता मर्यादित नसून ते भूलोक ते सत्यलोकापर्यंत प्रक्षेपित होत होते.
९. रथयात्रा चालू असतांना सत्यलोकातील गंध कार्यरत होणे
रथयात्रा चालू झाल्यापासून मोठ्या प्रमाणात दैवी सुगंध येत होता. हा सुगंध या भूतलावरील कुठल्याही फूल किंवा वृक्ष यांचा नसून तो सत्यलोकातील गंध होता आणि त्यात उत्तरोत्तर वाढ होत होती. या संदर्भात ईश्वराने मला सांगितले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ ज्या रथावर आरूढ आहेत, त्या रथाची चाके काळाची प्रतीक आहेत. रथयात्रेच्या माध्यमातून तिन्ही समष्टी गुरु काळात पालट करून कलियुगांतर्गत कलियुगांतर्गत कलियुगांतर्गत सत्ययुगाकडे समष्टीची वाटचाल करून घेत आहेत. त्यामुळे कलियुगाचा काळ फिरून सत्ययुगातील काळ येण्यास आरंभ झाला आहे. याचा परिणाम भूमीवर झाल्याने पृथ्वीची शुद्धी होऊन ती गंधमय होत आहे. सत्ययुग सत्यलोकाशी निगडित असल्याने पृथ्वीवर सत्यलोकातील गंध कार्यरत होण्याची अनुभूती येत आहे.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (१५.५.२०२३ आणि १६.५.२०२३)
ब्रह्मांडात प्रथम निर्माण झालेला नाद ‘अश्वनाद’ असणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत निर्माण झालेला पहिला सूक्ष्म नाद ‘अश्वनाद’ असणे‘मला मिळालेल्या वरील ज्ञानातील काही भाग ऐकून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ मला म्हणाल्या, ‘‘रथोत्सव चालू होताच मला अश्वांच्या टापांचा नाद स्पष्टपणे ऐकू आला. वर्ष २०११ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत निर्माण झालेला पहिला सूक्ष्म नाद ‘अश्वनाद’च (अश्वांच्या टापांंचा नाद) होता.’’ या वेळी तिथे उपस्थित असलेले सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘काही विद्वान सांगतात, ‘ब्रह्मांडात निर्माण झालेला प्रथम नाद हा ‘अश्वनाद’ होता.’’ – श्री. निषाद देशमुख |
|