सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने करण्यात येणारे आध्यात्मिक संशोधन !
‘जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्म आणि साधना यांचे महत्त्व समजावे अन् सर्वांनी स्वतः साधना करून आनंदप्राप्ती करून घ्यावी, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आधुनिक वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म अन् साधना समजावून सांगतात. यासाठी वर्ष २०१४ पासून ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’, ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पी.आय.पी.)’, ‘थर्मल इमेजिंग’, ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ इत्यादी वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून आध्यात्मिक संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनकार्याला स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ज्ञानाची, म्हणजे ‘सूक्ष्म परीक्षणा’ची (टीप) जोड देऊन या संशोधनाचे विश्लेषणही करण्यात येत आहे.
टीप – स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा), मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’ ! एखाद्या घटनेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने वैज्ञानिक उपकरणांद्वारे विविध विषयांशी संबंधित ५ सहस्रांहून अधिक संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना वेळोवेळी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे हे आध्यात्मिक संशोधन अनेक कसोट्या पार करून अव्याहतपणे चालू आहे. या संदर्भातील सूत्रे आपण या लेखाद्वारे समजून घेऊया.
१. आध्यात्मिक संशोधनाच्या वाढत्या व्याप्तीमुळे प्रत्यक्ष व्यक्ती किंवा वस्तू यांच्याऐवजी त्यांच्या छायाचित्रांच्या चाचण्या करण्यात येणे
संशोधनाच्या अंतर्गत अनेक चाचण्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. वर्ष २०१८ पर्यंत व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळी अधिकतम १० ते १२ मीटरपर्यंत येत असत. वर्ष २०१९ पासून मात्र या प्रभावळी ३५ मीटरपेक्षाही अधिक येत असल्याने त्या अचूक मोजण्यासाठी चाचणीस्थळी जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे काही किलोमीटर अंतरावर दुसरी मोठी जागा शोधून तेथे चाचण्या करणे आरंभ केले. काही मासांनी लक्षात आले की, काही संतांच्या किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तूंच्या प्रभावळी ५०० मीटरपेक्षाही अधिक येत आहेत. वर्ष २०२१ पासून आध्यात्मिक संशोधनाची व्याप्ती, तसेच चाचण्यांची संख्या निरंतर वाढू लागली. त्यामुळे व्यक्ती किंवा वस्तू यांच्या प्रभावळी मोजण्यासाठी त्यांना लांब अंतरावरील ठिकाणी ने-आण करण्यास पुष्कळ मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे व्यक्ती किंवा वस्तू यांच्याऐवजी त्यांची छायाचित्रे काढून त्यांच्या प्रभावळी मोजण्यास आरंभ केले. यामागील तत्त्व पुढे दिले आहे.
२. व्यक्ती किंवा वस्तू यांच्या छायाचित्रांत त्यांची स्पंदने असणे
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. या तत्त्वानुसार व्यक्ती किंवा वस्तू यांच्या छायाचित्रांत त्यांची स्पंदने असतात. त्यामुळे प्रत्यक्ष व्यक्तीची जेवढी प्रभावळ येते साधारण तेवढीच प्रभावळ तिच्या छायाचित्राचीही येते. हे सूत्र काही प्रयोग करून पडताळण्यात आले, उदा. व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित असतांना तिची प्रभावळ मोजण्यात आली. त्यानंतर तिच्या छायाचित्राची प्रभावळ मोजण्यात आली. तेव्हा दोन्ही प्रकारे मोजलेली प्रभावळ साधारण सारखीच आली. असाच भाग वस्तूंच्या संदर्भातही असल्याचे चाचण्यांतून लक्षात आले.
३. ‘छायाचित्रांद्वारे संशोधन करणे’ या संकल्पनेचे जनक परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २०२१ मध्ये त्यांच्या खोलीची, तसेच देवघराची छायाचित्रे काढून त्यांचे संशोधन करायला सांगितलेे. हे संशोधन अप्रतिम झाले. ‘छायाचित्रांद्वारे संशोधन करणे’, ही संकल्पना पुढे येणार्या काळात आध्यात्मिक संशोधनाचे महत्त्वाचे अंग ठरली. या संकल्पनेमुळे झालेले लाभ पुढे दिले आहेत. ही सूत्रे वाचून सर्वांना परात्पर गुरु डॉक्टरांचे द्रष्टेपण लक्षात येईल.
४. ‘छायाचित्रांद्वारे संशोधन करणे’ या संकल्पनेमुळे झालेले लाभ
४ अ. एकाच वेळी १ पेक्षा अधिक संशोधनात्मक प्रयोग करता येणे : काही वेळा यज्ञयाग किंवा धार्मिक विधी किंवा संतांशी संबंधित संशोधन एकाच दिवशी करणे आवश्यक असायचे. अशा वेळी प्रयोगातील व्यक्ती किंवा वस्तू यांची छायाचित्रे काढून नंतर त्यांच्या चाचण्या करण्यास आरंभ केल्याने एकाच वेळी १ पेक्षा अधिक संशोधनात्मक प्रयोग करता येणे शक्य झाले, उदा. वर्ष २०२१ मधील नवरात्रीच्या काळात रामनाथी आश्रमात महर्षींच्या आज्ञेने प्रतिदिन यज्ञयाग करण्यात आले होते. त्याच वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत श्रीसप्तशतीपाठाचे प्रतिदिन अनुष्ठान करण्यात आले होते. अशा वेळी दोन्ही प्रयोगांतील घटकांची प्रतिदिन छायाचित्रे काढून नंतर त्यांचे संशोधन करण्यात आले. यामुळे संशोधनाला पूर्वीप्रमाणे स्थळ, काळाचे बंधन उरले नाही.
४ आ. विविध प्रकारच्या मर्यादा ओलांडून संशोधन करता येणे : प्रयोगात सहभागी साधक अन् संत यांची छायाचित्रे काढून त्यांचे संशोधन करणे आरंभ केल्याने त्यांना चाचण्यांसाठी द्यावा लागणारा वेळ, अतिरिक्त श्रम इत्यादी वाचले. तसेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांमुळे चाचण्या करतांना येणार्या मर्यादा ओलांडून संशोधन करता येणे शक्य झाले, उदा. संगीत प्रयोगाच्या वेळी दिवसभरात ३-४ प्रयोग घेण्यात येतात. या प्रयोगांतील कलाकार अन् त्यांची वाद्ये, प्रयोगांना उपस्थित प्रेक्षक (साधक अन् संत), तसेच प्रयोगाच्या ठिकाणी असलेल्या वनस्पती यांना प्रयोगापूर्वी अन् प्रयोगानंतर चाचणीसाठी लांबच्या ठिकाणी प्रत्यक्ष घेऊन जाण्यास पुष्कळ मर्यादा येतात. त्यामुळे सर्वांची छायाचित्रे काढून नंतर त्यांचे संशोधन करण्यात आले. यामुळे अल्प कालावधीत संगीताचे अनेक संशोधनात्मक प्रयोग करता येणे शक्य झाले. असेच अन्य विषयांशी संबंधित संशोधनाच्या संदर्भातही झाले.
४ इ. बुद्धीअगम्य घटनांचे संशोधन सहजतेने करता येणे : आध्यात्मिक विश्वात नित्य चांगल्या-वाईट बुद्धीअगम्य घटना घडत असतात. या घटनांशी संबंधित छायाचित्रांचे संशोधन केल्याने अध्यात्मातील विविध पैलू उलगडतात, उदा. वर्ष २०२२ मध्ये रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र स्थुलातील काही कारण नसतांना जागेवरून आपोआप खाली पडले. या घटनेची छायाचित्रे काढून त्यांचे संशोधन करण्यात आले. या संशोधनातून ‘सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्ती संतांवर कशा प्रकारे आक्रमण करतात ? तसेच त्यांची तीव्रता केवढी अधिक असते ?’ ही सूत्रे अभ्यासता आली.
४ ई. यज्ञयागांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करता येणे : जानेवारी २०२२ मध्ये महर्षींच्या आज्ञेने रामनाथी आश्रमात काही यज्ञयाग करण्यात आले होते. या यज्ञयागांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा परिणाम केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर सप्तलोकांवरही होतो. या संदर्भात संशोधन करण्यासाठी देश-विदेशातील काही ठिकाणे निवडून तेथील माती, पाणी आणि वायूमंडल यांची छायाचित्रे काढून संशोधन करण्यात आले. तसेच सनातनच्या काही साधकांना मृत्यूत्तर महर्लोकाची अन् देहत्याग केलेल्या संतांना जनलोकाची प्राप्ती झाली होती. यांतील काही निवडक साधक अन् संत यांची छायाचित्रे यज्ञस्थळी ठेवून त्यांच्यावर काय परिणाम होतो ? हे अभ्यासण्यात आले. यातून लक्षात आले की, यज्ञाचा सकारात्मक परिणाम देश-विदेशांतील वातावरणावर, तसेच सप्तलोकांतील जिवांवरही होतो.
४ उ. व्यक्ती किंवा वस्तू यांच्यामध्ये होणारे चांगले किंवा त्रासदायक पालट अभ्यासणे : व्यक्ती किंवा वस्तू यांच्या छायाचित्रांत त्यांची त्या त्या वेळची स्पंदने विद्यमान असतात. त्यामुळे व्यक्ती किंवा वस्तू यांच्यामध्ये होणारे चांगले किंवा त्रासदायक पालट तिच्या त्या त्या कालावधीतील छायाचित्रांचे संशोधन करून अभ्यासता येतात. उदा. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केस अन् नखे यांच्यामध्ये झालेल्या दैवी पालटांचा संशोधनात्मक अभ्यास वर्षानुसार त्यांची छायाचित्रे काढून करणे शक्य झाले. तसेच त्यांच्या खोलीतील भिंतीवर वाईट शक्तींच्या आक्रमणांमुळे निर्माण झालेले डाग यासंदर्भात डागांची छायाचित्रे काढून संशोधन करण्यात आले. यातून ‘वाईट शक्ती संतांच्या कार्यात अडथळे आणण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्नरत असतात ? आणि ईश्वर विविध माध्यमातून संतांचे रक्षण कसे करतो ?’, आदी गोष्टी अभ्यासता आल्या.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी संबंधित ‘न भूतो न भविष्यति’ असे संशोधन करता येणे
वर्ष २०२२ पासून परात्पर गुरु डॉक्टरांशी संबंधित चाचण्यांच्या वेळी सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळी २ सहस्र ३३७ मीटरपेक्षाही अधिक होत्या; पण त्या अचूक मोजण्यासाठी त्यांच्यापासून आणखीन मागे जाणे जागेअभावी शक्य नसल्याने त्याला मर्यादा आल्या.
त्यामुळे आता अचूक प्रभावळ कशी मोजायची ? असा मोठा प्रश्न निर्माण झाला. दुसर्या जागांचा शोध घेण्यात आला; पण प्रभावळ अचूक मोजता येण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे वर्ष २०२३ पासून लोलकाचा उपयोग करून प्रभावळ मोजणे आरंभ केले. यातून लक्षात आले की, परात्पर गुरु डॉक्टरांशी संबंधित गोष्टींची, उदा. त्यांचे केस, नखे, कपडे, त्यांचे देवघर, त्यांची खोली इत्यादींची प्रभावळ सहस्रो मीटर आहे. एप्रिल २०२३ मध्ये एका प्रयोगाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची प्रभावळ मोजण्यात आली, तेव्हा ती १ लाख ९३ सहस्र मीटर असल्याचे लक्षात आले. यातून महर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘अवतार’ म्हणून का संबोधले आहे, तसेच महर्षींनी मे २०२२ मध्ये त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी का लावण्यास सांगितले, याचे महत्त्व लक्षात आले.
६. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प अन् कृपाशीर्वाद, त्यांचे द्रष्टेपण अन् अमूल्य मार्गदर्शन यांमुळे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात येणारे आध्यात्मिक संशोधन अनेक मर्यादा ओलांडून अव्याहतपणे चालू आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागातील साधकांना साक्षात् अवतारांशी संबंधित संशोधन करण्याची सुवर्णसंधी मिळणे, हे त्या सर्वांच्या अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ आहे’, असे जाणवते. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सेवेची अमूल्य संधी देवून आम्हा साधकांचे अवघे जीवन कृतार्थ केले, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.५.२०२३)
|