दुर्धर व्याधीतही ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा।’, अशी अवस्था अनुभवणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता ठाकूर !
‘वर्ष १९९६ मध्ये माझा साधनेच्या निमित्ताने ठाकूर कुटुंबियांशी संबंध आला. तेव्हापासून आमचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. सौ. नम्रता ठाकूर म्हणजे ठाकूर कुटुंबाचा केंद्रबिंदू ! त्यांच्या आताच्या आजारपणात मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. दुर्धर व्याधींशी सामना करत अनेक दायित्वे सांभाळणे
सौ. नम्रता ठाकूर यांच्या कमरेच्या हाडाचे शस्त्रकर्म झाले आहे. त्यानंतर त्यांना मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी जडल्या. वर्ष २०१४ मध्ये आणि त्यानंतर पुन्हा वर्ष २०१८ मध्ये असे दोन वेळा त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीला सामोरे जावे लागले. अधूनमधून त्यांना पोटाचाही त्रास होत असे. अशा सर्व व्याधींना त्यांनी अगदी हसतमुखाने तोंड दिले. त्या सतत म्हणायच्या, ‘‘गुरुदेवच मला सहनशक्ती देऊन आनंदी ठेवतात.’’ हे करत असतांना त्यांना सेवेचाही ध्यास असतो. थोडेसे उठता येऊ लागले की, त्या पुन्हा सेवा करत असत. प्रपंचातील दायित्वेही त्या उत्तमरितीने सांभाळतात.
२. इतरांचा विचार करणे
त्या केव्हाही प्रथम दुसर्याचाच विचार करतात. प्रेमळ स्वभाव आणि निरपेक्ष प्रीती ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यांना ऊठबस करतांना त्रास होतो, तरीही त्या स्वतःची कामे, उदा. पंखा, दंडदीप लावणे; आलेल्याला पाणी देणे; स्वतःला सेवा करतांना काही लागले, तर सभोवताली इतर जण असूनही कुणालाही काही देण्यास वा करण्यास न सांगता स्वतः उठून सर्व करत असत.
त्यांच्या याच गुणांचे प्रकटीकरण आताच्या त्यांच्या आजारपणातही अनुभवायला मिळाले. इतरांना समजून घेणे, त्यांना आपल्यासाठी काही करावे लागू नये, या गुणांचा त्यांच्यावर इतका संस्कार आहे की, त्यांना स्मृतीभ्रंश झाल्यावरही त्या स्वतःच स्वतःचे सर्व करण्याचा प्रयत्न करतात.
३. सतत आनंदी असणे
सौ. नम्रता ठाकूर यांचे व्यक्तीमत्त्व पूर्वीपासूनच प्रसन्न आणि आनंदी आहे. त्यांना केव्हाही भ्रमणभाषवर विचारले, ‘‘तुम्ही कशा आहात ?’’, तर त्या ‘मी एकदम आनंदी आहे’, असे उत्तर देतात. त्यांनी कधीच ‘मला बरे नाही’, असे सांगितले नाही. त्यांच्या प्रकृतीविषयी कुटुंबियांकडून आम्हाला कळते.
४. सौ. नम्रता ठाकूर यांची ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’ अशी अवस्था !
आम्ही जुलै २०२३ मध्ये काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. तेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्या वेळी आम्हाला वेगळेच दृश्य पहायला मिळाले.
४ अ. शरिराचे भान नसणे : सध्या ‘अनेक दिवस पुरेसे जेवण न घेतल्याने अतिशय थकवा येणे, अंगात उभे रहाण्याचेही त्राण नसणे, कित्येकदा नैसर्गिक क्रियांचे भान नसणे, कुणी भरवल्यास खाणे, लहान मुलाप्रमाणे ‘कोण सांगेल, तसे करणे’, अशी नम्रतावहिनींची अवस्था आहे. कित्येकदा ‘मी आताच जेवले आहे, मला जेवण नको’, म्हणतात, तर कधी ‘किती देता ? मी आताच नाश्ता केला. अर्धी पोळी खाल्ली’, असे म्हणतात. प्रत्यक्षात मात्र त्यांनी काहीही खाल्लेले नसते.
४ आ. सतत प.पू. डॉक्टरांच्याच अनुसंधानात असणे : इतकी विस्मृती होऊनही त्यांना केवळ प.पू. डॉक्टरांचे स्मरण आहे. मध्येच त्या असंबद्ध बोलत असल्या, तरी प.पू. डॉक्टरांच्या सातत्याने सहवासात असल्याप्रमाणे त्यांच्याविषयी मात्र सलगपणे बोलतात. त्या स्वतःहून सांगतात, ‘‘आताच परम पूज्य येऊन गेले. ते मला म्हणाले, ‘चला आपल्याला जायचंय ना !’ त्यांनी माझा हात हातात घेतला. (हे सांगतांना त्या भावावस्थेत जातात.) त्यांनी मला प्रसाद दिला.’’ कधी कधी त्या सगळ्यांना सांगतात, ‘‘लवकर लवकर आवरा. परम पूज्य येणार आहेत. आपल्याला त्यांनी भेटायला बोलावले आहे.’’ त्यांचे असे सतत बोलणे असते.
४ इ. प्रेमभाव : आम्ही त्यांना रामनाथीहून आणलेला प्रसाद दिल्यावर त्यांना पुष्कळ आनंद झाला. प्रसादातील बिस्किट त्यांनी खाल्ले आणि म्हणाल्या, ‘‘इतरांनाही प्रसाद मिळू दे.’’ इतरांनी जेवण केले का, याची त्या अगत्याने चौकशी करतात.
४ ई. भवसागरातून सहजतेने भावसागरात विहार करणे : त्या सगळ्यांमध्ये थोडा वेळ बसल्या, तरी त्यांचे चित्त प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानातच असते. आता ‘त्यांना मायेतील कुठल्याही गोष्टीत किंवा विषयात काही रस नाही’, असे जाणवते. त्यांना मुले, नातेवाईक यांविषयी बोलायला आवडत नाही. एखादे वाक्य बोलून त्या परत स्वत:च्याच विश्वात रममाण होतात. त्यांना प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र, जीवनदर्शन ग्रंथ इत्यादी जवळ घेण्यास आवडते. त्यांचे विश्वच वेगळे आहे. ‘सकृतदर्शनी त्यांचा स्मृतीभ्रंश झाला आहे आणि त्यांच्या मनावरील मायेचे संस्कार अस्पष्ट झाले आहेत’, असे दिसले, तरी अंतर्मनावर झालेला साधनेचा दृढ संस्कार मात्र अबाधित आहे. तेव्हा ‘प.पू. डॉक्टर अंतर्मनाने साधना करा’, असे का सांगतात, हे पुन्हा एकदा मनावर ठसले. ‘६२ वर्षांचे भवसागरातील विचरणे (विहार करणे) क्षणात विसरून माणूस भावसागरात विहार करत आनंदी कसा राहू शकतो’, हे लक्षात आले. ‘अंतर्मनातील हे संस्कार किती आनंददायी असतात !’, हे नम्रता ठाकूर यांच्या उदाहरणातून लक्षात आले.
४ उ. चेहर्यावर वेदनेचा लवलेशही नसणे आणि प्रत्येक कृती अन् स्मृती यांचा केंद्रबिंदू परात्पर गुरु डॉ. आठवले असणे : सौ. नम्रतावहिनींच्या मेंदूत कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. आधुनिक वैद्यांच्या मते अशा आजारात पुष्कळ वेदना होतात; परंतु त्यांच्या चेहर्यावर वेदनांचा लवलेशही दिसत नाही. त्यानंतर कुटुंबियांकडून त्या किमोथेरपीच्या उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे आणि रुग्णालयात रहाण्यास तयार नसल्याचे कळले. घरी आणल्यावर हळूहळू त्या घरच्यांना प्रतिसाद देत होत्या. त्यांच्या शुश्रूषेसाठी ठेवलेल्या परिचारिकेला त्या जवळ येऊ देत नव्हत्या. जेव्हा त्यांना सांगितले, ‘‘प.पू. डॉक्टरांनी त्यांना तुमच्यासाठी पाठवले आहे.’’ तेव्हा त्यांनी तिला सेवा करू दिली. प.पू. डॉक्टरांविना जणू त्यांच्यासाठी अन्य विश्वच नव्हते.
४ ऊ. अंतर्मनाच्या साधनेने प्राप्त झालेली आनंदावस्था ! : ‘साधनेने प्रारब्ध न्यून होते आणि तीव्र साधना अन् गुरुकृपा यांनी ते नष्ट होते’, हे मला ठाऊक होते; परंतु ‘साधनेने चिरंतन आनंदावस्था कशी मिळते’, हे सौ. नम्रतावहिनींच्या उदाहरणातून कळले. ‘अंतर्मनातून साधना कशी करायची ?’, हेही मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. अशा रुग्णाईत अवस्थेतही त्या भावावस्थेत राहून आवरण काढणे, नामजप शोधणे इत्यादी क्रिया करत आहेत. त्यांच्यातील ‘इतरांचा विचार करणे, सर्व प्रकारचे दायित्व उत्तमरित्या पार पाडणे, कधीही कुणालाही न दुखावणे, सर्वांप्रती असीम कृतज्ञतेचा भाव असणे’, हे दैवी गुण आणि साधनेची तीव्र तळमळ अन् गुरुदेवांवरील अपार श्रद्धा यांमुळे त्यांची मायेतील सर्व गोष्टींची आसक्ती संपून त्यांना मनातील सार्या काळज्या अन् चिंता गुरुदेवांच्या चरणी अर्पण करता आल्या. त्यामुळेच व्यावहारिक गोष्टींची कात टाकून, मन आणि बुद्धी यांवरील सर्व संस्कार पुसले जाऊन (प्रकृतीला विसरून) त्यांच्या अंतर्मनातील संस्कार प्रकटले आणि त्यांचे चित्त पुरुषाशी, म्हणजे चैतन्याशी जोडले गेले. असे झाल्यावर देह आपोआपच प्रारब्धावर सोडला जाऊन चित्त चैतन्याशी म्हणजे चिरंतन आनंदाशी जोडले जाते. ‘जाणिवेतून नेणिवेकडे जाणे’, ही अवस्था साधक कसा अनुभवतो, हे सर्व ‘याची देही, याची डोळा ।’ पहायला देणार्या परात्पर गुरु डॉक्टरांप्रती किती कृतज्ञता अर्पण करायची ?
साधनेतील एका वेगळ्या टप्प्याची अनुभूती अनुभवायला आणि शिकायला दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी अनन्य शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते. साधकाची तळमळ आणि गुरूंवर अढळ श्रद्धा असेल, तर भगवंताची कृपा होऊन अशक्य ते शक्य होते, हेच यातून शिकायला मिळते. सौ. नम्रतावहिनींचे गुण आम्हालाही आत्मसात् करता येऊ देत आणि सौ. नम्रतावहिनी लवकरच संतपदी विराजमान होऊ देत’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’
– श्रीमती रजनी साळुंके, फोंडा, गोवा. (७.८.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |