रत्नागिरीत पैशांच्या वादातून मैत्रिणीचा खून : आरोपीला जन्मठेप
रत्नागिरी – पैशांच्या वादातून ज्योती उपाख्य शमिका पिलणकर या मैत्रिणीचा खून केल्या प्रकरणी न्यायालयाने आरोपी संतोष सावंतला (हातखंबा) दोषी ठरवले. ही घटना १० जानेवारी २०१९ या दिवशी हातखंबा-तारवेवाडी येथे घडली होती. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी संतोष सावंतला जन्मठेप आणि १० सहस्र रुपये दंड, तो न भरल्यास एका वर्षाची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली. ११ ऑगस्ट या दिवशी प्रमुख जिल्हा अन् सत्र न्यायाधीश व्ही.आर्. जोशी यांनी हा निकाल दिला.
रत्नागिरी : मैत्रिणीचा खून करणाऱ्या अपंगाला आरोपीला जन्मठेप https://t.co/8TTajnYDXB
— Pethe Udyog (@PetheUdyog) August 12, 2023
एका अपघातात संतोष सावंत याला अपंगत्व आले होते. कुबड्यांच्या आधाराने तो चालतो; मात्र चालक म्हणून तो काम करायचा. त्याची पत्नी घरी नसायची, तेव्हा मैत्रीण ज्योती त्याला भेटायला येत असे. १० जानेवारीच्या सकाळी नेहमीप्रमाणे संतोषची पत्नी कामाला गेली होती. त्या वेळी त्याची मैत्रीण ज्योती त्याच्या घरी आली. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. ज्योतीने त्याच्या घरातील सुरा घेऊन संतोषवर आक्रमण केले; मात्र संतोषने तोच सुरा घेऊन ज्योतीच्या पोटात दोनवेळा भोसकले होते. त्यानंतर संतोषच्या पत्नीने ग्रामीण पोलीस ठाण्यात याची माहिती दिली होती. आरोपी संतोष सावंत यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी संतोषला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. या खटल्यात सरकारी पक्षाकडून अधिवक्ता प्रफुल्ल साळवी यांनी २२ साक्षीदार तपासले.