मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळावा !
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महिला शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी !
नाशिक – चालुक्यांच्याही कालखंडात मराठी भाषेचा वापर केला जात असल्याचे दाखले आज उपलब्ध आहेत. ऐतिहासिक नोंदींनुसार शतकानुशतके मराठी भाषेचा वापर केला जात आहे. बाराव्या शतकातील लीळाचरित्र ग्रंथ आजही वाचनात आहे. या सर्व दस्तवेजांची नोंद घेऊन ‘मराठी भाषेस अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा’, यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न करावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या नाशिकरोड शाखेच्या महिला शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.
केवळ महिलांच्या शिष्टमंडळाने राजभवनात जाऊन राज्यपालांना मराठीच्या अभिजात भाषेविषयी आग्रह करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विस्तृत अहवाल आणि प्रस्ताव राज्यशासनाच्या वतीने सादर केला आहे; मात्र तसे असूनही आजपर्यंत मराठी भाषेची उपेक्षा होत असल्याचे शिष्टमंडळाने याकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय हा केंद्र सरकारच्या अख्यत्यारीत येत असल्याने त्यासाठी प्रसंगी देहलीपर्यंत जाण्याचीही सिद्धता ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’च्या वतीने करण्यात आली आहे.