सांगवी (जिल्हा धुळे) येथे फलक फाडल्याने १२ जणांना अटक !

दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

शिरपूर (जिल्हा धुळे) – आदिवासी क्रांती दिनाचे फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याने १० ऑगस्ट या दिवशी सांगवी (तालुका शिरपूर) गावात २ गटांत दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

१. सांगवी गावातील जोयदा रस्त्यावरील शाळेजवळ आदिवासी क्रांती दिनाचे फलक फाडल्याचे वृत्त गावात पसरताच शेकडो आदिवासी बांधवांच्या संतप्त जमावाने दुसर्‍या समुदायावर दगडफेक केली.

२. ‘फलक फाडणार्‍यांना अटक करा’, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. काही टपर्‍या उलथवून टाकण्यात आल्या, तर काही पेटवण्याचा प्रयत्नही झाला. या समवेतच काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या; मात्र या वेळी होणारी मोठी दुर्घटना सांगवी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून हाणून पाडली.

३. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच धुळे येथून राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथक यांना बोलावून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. सांगवी गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले आहेत.

४. लक्ष्मण भील (वय १८ वर्षे), शिवदास भील (वय ४० वर्षे) आणि सुभाष सोनवणे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना धुळे येथे रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

५. परिस्थितीची पहाणी केल्यानंतर आमदार काशीराम पावरा, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, तहसीलदार महेंद्र माळी शांतता प्रस्थापित करण्यासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतांना अचानक एका बाजूने दगडफेक चालू झाली. दगडफेकीत आमदार काशीराम पावरा आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या.