अधिक मासातील अध्यात्म चिंतन धन्यतेची अनुभूती देते ! – वेदांत चुडामणी अशोकशास्त्री कुलकर्णी
नगर शहरात प्रथमच साजरा ‘लक्ष तुळशी अर्चन’ सोहळा
नगर – अधिकमास आत्मचिंतन, अध्यात्म चिंतन करवून घेण्यासाठीच येतो. आपल्या दैनंदिन व्यापातून स्वतःसाठी वेळ काढून लोकोत्तरपुरुष भगवान श्रीकृष्ण आणि पुरुषोत्तम भगवान प्रभु श्रीराम यांचे नामस्मरण केल्यास धन्यतेची अनुभूती मिळवता येते, असे प्रतिपादन आळंदी येथील न्याय-वेदांत चुडामणी श्री. अशोकशास्त्री कुलकर्णीगुरुजी यांनी केले. ते येथील घनपाठी वेदमूर्ती श्री. सागर कुलकर्णी यांनी रासनेनगरमधील दुर्गामाता मंदिरात विश्वकल्याणासाठी आयोजित केलेल्या श्रीमहाविष्णुयाग आणि ‘लक्ष तुळशी अर्चन’ सोहळ्याच्या सांगता समारंभात बोलत होते. यागाचे पौरोहित्य प्रधानाचार्य वेदमूर्ती घनपाठी श्री. सागर कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्यात नगर शहरासह पुणे आणि मुंबई येथील भाविकही श्रद्धेने सहभागी झाले होते. २७ दांपत्यांनी यजमानपद भूषवले.
दोन दिवसांच्या श्रीमहाविष्णुयाग सोहळ्याचा शुभारंभ श्री गणेशाच्या विधीवत् पूजनाने करण्यात आला. पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, प्रधान देवता स्थापन, अग्निस्थापन करत चालू झालेला हा सोहळा उत्तरोत्तर भक्तिपूर्ण होत गेला. नगर शहरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘लक्ष तुळशी अर्चन’ सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून तुळशी आणण्यात आल्या होत्या. सौ. मालुताई नाईक यांनी मुंबई येथून कमळाची फुले आणली होती. ही फुले या सोहळ्यात श्रीमहाविष्णूंच्या चरणी, तसेच नेवासा येथील प.पू. श्री मोहिनीराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली. शास्त्रोक्त पूजा मांडण्याची लक्षवेधी पद्धती अनोखी होती. वेदमंत्रांच्या उच्च स्वरातील कर्णमधुर मंत्रांनी मंदिरासह परिसर मंत्रमुग्ध झाला होता. श्री. अशोकशास्त्री कुलकर्णीगुरुजी यांच्या हस्ते श्री महाविष्णुयागाची विधीवत् पूर्णाहुती करण्यात आली.
भगवान श्रीविष्णूस महाअभिषेक करून लक्ष तुळशी अर्चन सोहळ्याचा श्रीगणेशा उत्साहात करण्यात आला. या सोहळ्यात नगर शहरासह पुणे आणि मुंबई येथील भाविकही श्रध्देने सहभागी झाले होते. २७ दाम्पत्याने यजमानपद भूषविले. यागाचे पौरोहित्य प्रधानाचार्य वेदमूर्ती घनपाठी श्री. सागर कुलकर्णी यांनी केले. त्यांना पुणे येथील वेदमूर्ती प्रसाद साठे, वेदमूर्ती भाग्येश मराठे, नगरमधील वेदमूर्ती प्रशांत मुळे, वेदमूर्ती आनंद जोशी, वेदमूर्ती प्रदीप जोशी, वेदमूर्ती अक्षय चिंधाडे, वेदमूर्ती ह्रषीकेश चिंधाडे, वेदमूर्ती ह्रषीकेश कुलकर्णी यांनी साहाय्य केले. पुरूष सुक्ताची दहा सहस्त्र आहुती देण्यात आली. शास्त्रोक्त पूजा मांडण्याची लक्षवेधी पध्दती पाहून उपस्थित सर्वच भाविक भारावून गेले. वेदमंत्रांच्या उच्च स्वरातील कर्णमधुर मंत्रांनी मंदिरासह परिसर मंत्रमुग्ध झाला होता. श्री. अशोकशास्त्री कुलकर्णी गुरूजी यांच्या हस्ते श्रीमहाविष्णुयागाची विधीवत पूर्णाहुती करण्यात आली.
यज्ञ सोहळ्याच्या यशस्वितेसाठी श्रीदुर्गामाता मंदिराचे व्यवस्थापक रमेश कांडीवकर तसेच शेखर व्यवहारे, विठ्ठल बागडे, सौ. स्मिता कुलकर्णी, सौ.अस्मिता कांडीवकर, नगरसेविका सौ.पुष्पाताई बोरूडे, धनश्री कांडीवकर, सुहास कांडीवकर, रोहित रामदिन, राजेंद्र जोशी आदींनी अथक परिश्रम घेतले.
श्री. अशोकशास्त्री कुलकर्णी गुरूजी पुढे म्हणाले, भगवान श्रीकृष्ण हे व्दापार युगात आणि भगवान श्रीराम हे त्रेतायुगात धर्म राज्याची संस्थापना करण्यास अवतीर्ण झाले होते. त्यांनी धर्म संरक्षणासाठी केलेले कार्य आजच्या प्रगत संगणक युगातही प्रेरणादायी असल्याचे निदर्शनास येत आहे. श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे नामस्मरण करताना अनामिक ऊर्जा मिळते. स्फूर्ती मिळते. उत्साह संचरतो. सीतामाई आणि द्रौपदी यांच्या रक्षणासाठी उभे ठाकून भगवंतांनी द्रृष्टांचा संहार केला. माकडांनीही युध्द केले. सेतूबंधनात दगडांमधून श्रीराम ध्वनी ऐकू येत राहिले. रामायण आणि महाभारतामधील या प्रसंगांमधून दृढ भक्ती आणि भगवंतावरील निष्ठा स्पष्ट होते.
अधिक महिन्याचे महत्व विशद करताना गुरूजींनी दिलेले अनेक पौराणिक दाखले भाविकांना अधिक भावले. संतांच्या पुण्यभूमीचा गौरव लाभलेल्या या भूमीमधून आळंदीकडे मार्गस्थ होताना संत ज्ञानेश्वर माऊलींनी क्रोधावर नियंत्रण कसे ठेवावे ? हे स्वतःच्या कृतीमधून सांगितले. वेदमूर्ती सागर कुलकर्णी आणि सौ. स्मिता कुलकर्णी यांनी अधिक मासाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करताना समाजातील भाविकांना एकत्रित आणण्याची कामगिरी पार पाडत योग्य दिशा दाखविण्याचे पुण्यकर्मच केले आहे, अशा शब्दात उत्कृष्ट आयोजनाचे गुरूजींनी कौतुक केले.
या सोहळ्याच्या दर्शनासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. शहरात प्रथमच होत असलेला लक्ष तुळशी अर्चन सोहळा जवळून पहाण्यासाठी अनेक भाविक उत्सुकतेने आले होते. सामुदायिक महाआरती आणि महाप्रसादाने या दोन दिवसांच्या सोहळ्याची सांगता भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली.