देशप्रेम निर्माण करणारे लष्करी पर्यटन !
भारतामध्ये पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतीय हे प्रेक्षणीय स्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देत असतात. आता लष्करी पर्यटनाविषयीही लोकांना आकर्षण वाटू लागले आहे. लष्करी पर्यटन, म्हणजे जेथे युद्धे झाली, तेथे जाऊन लढाया कशा लढल्या गेल्या ? याविषयी माहिती जाणून घेणे आणि तेथे अभिवादन करणे होय. लष्करी पर्यटन हे देशभक्ती निर्माण करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे की, जे पर्यटकांना त्यांच्या देशाचा इतिहास, सैनिकांनी देशासाठी केलेले बलीदान आणि संस्कृती यांविषयी जाणून घेण्यास साहाय्य करते.
१. महाराष्ट्रातील लष्करी पर्यटनाची स्थळे
‘महाराष्ट्रापुरते सांगायचे म्हटले, तर राज्यात अनेक ठिकाणी सैन्याच्या छावण्या आहेत. तेथे सैन्याची अनेक संग्रहालये आहेत. ते पाहिल्यावर आपल्याला सैन्याविषयी माहिती मिळते. देवळाली किंवा नाशिक रोड येथे तोफखाना केंद्राचे संग्रहालय आहे. तेथे विविध तोफा ठेवलेल्या आहेत. नगर येथे रणगाडे किंवा चिलखती वाहनांचे प्रदर्शन लावण्यात आलेले आहे. बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्रीचे उत्तम संग्रहालय आहे. तेथे मराठा रेजिमेंटने वर्ष १९४७, १९६२, १९६५, तसेच १९७१ ची युद्धे, तसेच कारगिल युुद्ध यांमध्ये गाजवलेल्या महापराक्रमांची सर्व माहिती मिळते.
महाराष्ट्रामध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये नौदलाचे तटरक्षक दल आहे. तेथे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा महत्त्वाच्या दिवशी सामान्यांना भारतीय नौदलाच्या बोटींना भेट देण्याची अनुमती असते. तेथे ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ नावाच्या जुन्या बोटीला संग्रहालयात परावर्तित करण्यात आले आहे. यासमवेतच महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांचा इतिहास दर्शवतात. या किल्ल्यांवर गेलो की, स्वतःचे ऊर अभिमानाने भरून येते. पुण्यातील घोरपडी येथे सैनिकांचे युद्ध स्मारक आहे. तेथे पुणेस्थित दक्षिण कमांडचा पूर्ण इतिहास पहायला मिळतो. खडकवासला येथे असलेली ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (एन्.डी.ए.) ही जगप्रसिद्ध संस्था असून तेथे शूरवीर घडवले जातात. तेथे प्रत्येक रविवारी नियोजित टूर (दौरा) असते. त्यात शाळा महाविद्यालये भेट देऊ शकतात.
२. पाकिस्तान आणि चीन यांच्या सीमाभागांतील लष्करी पर्यटन स्थळे !
अ. सध्या भारत सरकारने नवीन ठिकाणी लष्करी पर्यटनस्थळे उघड केली आहेत. काश्मीरमधील अनेक ठिकाणी आपण रस्त्याने जाऊ शकतो. आता सरकारने अनेक रस्ते बांधलेले आहेत. लेह, लडाख येथील लोकसंख्या अनुमाने साडेचार लाख आहे. आता पठाणकोटवरून, तसेच धर्मशाळेच्या बाजूनेही लेहला रस्ता जातो. त्यामुळे तेथे पर्यटन करणे पुष्कळ सोपे झालेले आहे. मागील वर्षी अनुमाने ५ लाख पर्यटकांनी लडाखला भेट दिली होती. तेथे ते गलवान युद्धभूमीवर गेले होते, जेथे भारतीय सैन्याने ७०-८० चिनी सैनिकांना मारले होते. त्यासाठी २० भारतीय सैनिकांनी त्यांच्या प्राणाचे बलीदान दिले होते. तसेच पेंगाँग त्सो तलावाच्या ठिकाणी भारतीय सैन्याने आक्रमकपणे चीनला मागे लोटले होते. तेथे जाऊन आपण राहू शकतो. हे रस्ते आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातात.
पूर्वी लडाखला जाणे अशक्य होते. आता तेथील विमानतळावर प्रतिदिन ३०-३५ विमाने उतरतात. रस्त्याने ९-१० घंट्यांत लडाखला पोेचू शकतो. यासमवेतच दुसरा रस्ता श्रीनगरच्या बाजूने कारगिलला जातो. श्रीनगर येथून कारगिल आणि लडाख येथे जाणार्या पर्यटकांमध्ये पुष्कळ वाढ झाली आहे. त्या मार्गावर उपाहारगृहे, रहाण्याच्या व्यवस्था, ‘होम स्टे’ (घरासारखी वास्तू) प्रकार निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना रोजगारही उपलब्ध झाले आहेत.
आ. द्रास हे जगातील अतिशय थंड ठिकाण आहे. या ठिकाणी सैन्याने युद्ध स्मारक उभारले आहे. ते वर्ष १९९९ च्या कारगिल युद्धाच्या संदर्भातील आहे. तेथून जेथे भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवला होता, ती सर्व शिखरे आपल्याला दिसतात.
इ. आपण पंजाबमधील अनेक सीमांवर जाऊ शकतो. तेथे हुसेनीवाला, खेमकरण (येथे रणगाड्यांचे युुद्ध झाले होते.) अशा विविध सीमा आहेत. वाघा सीमेवर प्रतिदिन सायंकाळी सोहळा होतो. त्याला मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करतात. त्यानंतर राजस्थान आणि गुजरात यांच्या सीमा आहेत. गुजरातच्या कच्छच्या रणामध्ये शेवटपर्यंत जाता येते.
ई. ईशान्य भारतामध्ये ४ ते साडेचार सहस्र किलोमीटरची भारत-चीन सीमा आहे. या भागातील अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्यास सरकारने अनुमती दिली आहे. त्यामुळे सियांग नदीचे खोरे, सुबांसिरी नदी, विविध खिंडी यांना भेट देऊ शकतो. त्यासाठी खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था आहे. अरुणाचलमध्ये दोन विमानतळ आहेत. तवांगला वर्ष १९६२ ची मोठी लढाई झाली होती. त्या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्यासमवेत युद्ध भूमीलाही भेट देता येते. या युद्धभूमीला भेट दिल्यावर आपल्याला पुष्कळ चांगले वाटते. तेथे भारतीय सैनिक किती कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करत आहेत, हे दिसते.
उ. लडाखमध्ये सियाचीन पर्वत शिखर आहे. ही जगातील सर्वांत उंच रणभूमी आहे. तेथे प्रत्येक वर्षी ५० ते ६० सैनिक सीमेचे रक्षण करतांना प्राणाचे बलीदान देतात. भूस्खलन, हिमकडा कोसळणे इत्यादींमुळे त्यांना प्राण गमवावे लागतात. या सर्व युद्धभूमीवर जाण्यासाठी सरकारने अनुमती दिली आहे.
३. भारत सरकारची ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्रॅम’ची योजना !
(‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्रॅम’ म्हणजे भारताच्या सीमेवरील गावांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने राबवलेली योजना)
भारत सरकार आता तेथे पर्यटन आणि लोकसंख्या वाढावी, यासाठी ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्रॅम’ योजना राबवत आहे. अरुणाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम यांच्या सीमाभागांमध्ये मूलभूत सोयींचा अभाव असल्याने तेथे अल्प लोक रहातात. जुन्या वस्त्याही दिवसेंदिवस अल्प होत आहेत. तेथे भारतीय नागरिकांचे वास्तव्य आवश्यक आहे; कारण नागरिक हे सैन्याचे डोळे आणि कान बनू शकतात. सगळीकडे सैन्य तैनात ठेवणे खर्चाचे काम आहे. आपल्या भूमीवर चीन येऊ नये; म्हणून आपली सामान्य जनता तेथे राहिली पाहिजे. त्यासाठी ‘व्हायब्रंट व्हिलेजेस’ हा उपक्रम वेगाने चालू झालेला आहे. येत्या २ वर्षांत येथे ही खेडी निर्माण होतील. त्यामुळे आपण सीमेवर जाऊन राहू शकतो.
४. भारतियांनो, पर्यटनासाठी विदेशात जाण्यापेक्षा भारताला प्राधान्य द्या !
सध्या ४-५ कोटी भारतीय विदेशात पर्यटनाला जात असतात. तेथे जुने किल्ले, समुद्रकिनारे आदी दाखवले जातात. विदेशात असलेल्या नैसर्गिक सौंदर्यापेक्षा आपल्या हिमालयामध्ये त्याहून अधिक चांगले सौंदर्य आहे. त्यामुळे भारतियांनी विदेशात जाण्याऐवजी आपल्याच सीमांना भेटी दिल्या, तर आपल्याला अतिशय चांगले सौंदर्य पहायला मिळू शकते. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये चारधाम यांची यात्रा चालू झालेली आहे. तेथेही पुष्कळ सौंदर्य आहे; पण आता तेथे पुष्कळ गर्दी वाढत आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये; म्हणून तेथील प्रशासनाने पर्यटनाला नियंत्रित करणे चालू केले आहे. आता तेथे ‘ऑनलाईन’ आरक्षण करूनच जाता येते.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.