ठाण्‍यातील १५ तलावांचे सुशोभिकरण करणार !

ठाणे – तलावांचे शहर अशी ओळख असणार्‍या ठाण्‍यात केंद्रशासनाच्‍या अमृत -२ योजनेंतर्गत उपलब्‍ध झालेल्‍या निधीतून १५ तलावांच्‍या संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे हाती घेण्‍यात आली आहेत. या कामाचे ‘आयआयटी’ या त्रयस्‍थ संस्‍थेकडून लेखापरीक्षण करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. हे काम करतांना तलावातील जीव आणि आजूबाजूची वनसंपदा यांना हानी न पोचवण्‍याची काळजी यात घेण्‍यात येणार आहे. एकेकाळी शहरात ७० हून अधिक तलाव होते, आता ३४ तलाव शिल्लक राहिले आहेत. या प्रकल्‍पासाठी एकूण ५३ कोटी ३६ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. २५ टक्‍के रक्‍कम केंद्रशासन, २५ टक्‍के राज्‍यशासन देणार आहे. उर्वरित ५० टक्‍के निधी महापालिकेचा आहे. प्रत्‍येक तलावाच्‍या अनुषंगाने करण्‍यात येणार्‍या कामांमध्‍ये स्‍थापत्‍य, विद्युत् आणि पर्यावरण अशी तीन स्‍वरूपाची कामे आहेत.