जिल्ह्यातील मासेमारांना डिझेलच्या परताव्याचे ११ कोटी रुपये संमत


रत्नागिरी – जिल्ह्यातील मासेमारी १ ऑगस्टपासून चालू झाली. मासेमारीला कोणतीही अडचण येऊ नये, तसेच मासेमारांना डिझेलचा परतावा मिळावा, यासाठी राज्यशासनाकडून जिल्ह्याला ११ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत. ते लवकरच जिल्ह्याला प्राप्त होतील, अशी माहिती मत्स्यव्यवसाय खात्याकडून देण्यात आली.

दोन दिवसांत ही रक्कम प्राप्त होणार असून, ते पैसे लगेचच मच्छिमारी सोसायट्यांकडे वर्ग केली जाणार आहेत. अद्यापही १९ कोटी रुपये येणे बाकी असून, तेही लवकरात लवकर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

मासेमारांना डिझेल परतावा मिळाल्यास त्यांचा व्यवसाय सुखकर होण्यास साहाय्य होईल, यासाठी अधिवेशनानंतर हे पैसे तात्काळ वर्ग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणार्‍या सोसायट्या आणि तेथील मासेमारांना याचा लाभ होणार आहे.  राज्यशासनाकडून आतापर्यंत अधिकाधिक परतावा देण्यात आला आहे. पूर्वी ६० कोटी रुपयांचा डिझेल परतावा येणे बाकी होते; परंतु मुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे तात्काळ हा परतावा मिळण्यास साहाय्य झाले.