गोवा : अट्टल चोराला चोरीसाठी साहाय्य करणारा दक्षिण गोव्यातील पोलीस हवालदार निलंबित
मडगाव – दक्षिण गोव्यातील पोलीस हवालदार विकास कौशिक याने फैझान सय्यद या चोरट्याला उत्तर गोव्यात चोरी करण्यासाठी प्रोत्साहन दिल्यावरून हवालदार विकास याला निलंबित करण्यात आले आहे. यासंबंधी विधानसभेत १० ऑगस्टला पडसाद उमटले. आपचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले; मात्र सभापतींनी हे सूत्र शून्य काळात उपस्थित करावे, अशी सूचना केली.
#Cop or #robber? Lines blur as constable #suspended for backing #thieves to commit #robberies
Read: https://t.co/H346pnZqpx#Goa #News #Crime pic.twitter.com/TtzScGhGRA
— Herald Goa (@oheraldogoa) August 11, 2023
याविषयीची सविस्तर माहिती अशी की, फैझान सय्यद या चोरट्याला १ ऑगस्ट या दिवशी न्हावेली, सांखळी येथे डिचोली पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने चोरी करतांना रंगेहाथ पकडले होते. त्याच्या चौकशीत दक्षिण गोव्यातील हवालदार विकास कौशिक याचे नाव समोर आले. ‘हवालदार विकास याने उत्तर गोव्यात चोरी करून त्यातील वाटा देण्याचा करार केला होता’, असा जबाब सय्यदने पोलीस अधिकार्यांना दिला होता. चोरट्याने हवालदार विकास कौशिक याचे नाव उघड केल्यानंतर ७ ऑगस्ट या दिवशी पोलीस मुख्यालयातून अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी आदेश जारी करून हवालदार विकासचे गोवा राखीव पोलीस दलात स्थानांतर केले होते. या हवालदाराला २ पोलीस सेवेतील सनदी (आय.पी.एस्.) अधिकारी पाठीशी घालत असल्याचाही आरोप आहे. हे आय.पी.एस्. अधिकारी कोण आहेत ?, याचा शोध घेण्यात येत आहे.
हवालदार विकास याचे गुन्हेगारांशी चांगले संबंध आहेत, असे समजते. यापूर्वी २ वेळा त्याचे गोवा राखीव पोलीस दलात स्थानांतर करण्यात आले आहे. तो पुन्हा पोलीस हवालदार म्हणून दक्षिण गोव्यात कार्यरत व्हायचा आणि कोलवा, फातोर्डा अन् मडगाव शहर या पोलीस ठाण्यांमध्येच सेवा बजावत असे.
चोरटा फैझान सय्यद याच्या विरोधातील गुन्हे
संशयित फैझान याच्या विरोधात मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे ३, वेर्णा पोलिसांत २, तर सांगे, कुडचडे, डिचोली, आगशी आणि फातोर्डा या पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. याखेरीज मडगाव पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीप्रकरणी १ आणि अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी १, असे २ गुन्हे नोंद आहेत. मायणा-कुडतरी पोलिसांत चोरीप्रकरणी १, तर १ अदखलपात्र गुन्हा नोंद आहे. डिचोली परिसरात नुकत्याच एका सरकारी कर्मचार्याला मारहाण केल्याचा गुन्हा ही त्याच्या विरोधात नोंद आहे. जिल्हा न्यायदंडाधिकार्यांकडे त्याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी १ तक्रार नोंद आहे.
ताज्या घडामोडींनुसार फैझान सय्यद याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) कारवाई करावी, अशी मागणी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी जिल्हा न्यायदंडाधिकार्यांकडे केली आहे.
संपादकीय भूमिकारक्षक नव्हे भक्षक पोलीस ! पोलीसच जर अट्टल गुन्हेगारांना साहाय्य करत असतील आणि त्याची पोलीस खात्यातच जर साखळी असेल, तर राज्यातील गुन्हे अल्प कसे होणार ? |