परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा अनुभवतांना ‘त्यांना अपेक्षित अशी साधना होत नाही’, याविषयी पू. शिवाजी वटकर यांना वाटणारी खंत !
सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगामुळे पू. शिवाजी वटकर यांच्यात झालेले गुणवर्धन, संत आणि प्रचारसेवा यांसाठी चारचाकी गाडीचा झालेला उपयोग, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अविस्मरणीय सत्संगातील काही सुखद आठवणी !’, यांविषयी आपण १०.८.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पाहिले. आज पुढील भाग पाहू.
(भाग ९)
भाग ८ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/709442.html
२१. परात्पर गुरु डॉक्टरांनी टप्प्याटप्प्याने अध्यात्म शिकवून साधना आणि सेवा करून घेणे
वर्ष १९८९ मध्ये माझी परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली. आरंभी त्यांना भेटतांना माझे वैयक्तिक प्रश्न सुटण्यावरच माझा भर होता; मात्र त्यांनी ‘सर्व प्रश्नांवर ‘साधना करणे’, हाच उपाय आहे’, हे माझ्या मनावर बिंबवले. त्यानंतर मी नामस्मरण, सत्संग आणि सत्सेवा करण्यास आरंभ केला. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला टप्प्याटप्प्याने अध्यात्म शिकवून माझ्याकडून साधना आणि सत्सेवा करून घेतली. हळूहळू माझी त्यांच्यावर नितांत श्रद्धा बसली.
२१ अ. आईच्या आजारपणात अनुभवलेली परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा !
२१ अ १. रुग्णालयातील आधुनिक वैद्य परात्पर गुरु डॉक्टरांच्या ओळखीचे असणे आणि त्यांनी ‘आईची काळजी घेऊ’, असे सांगून आश्वस्त करणे : त्या वेळी माझी आई माझ्या बहिणीकडे रहात होती. फेब्रुवारी १९९२ मध्ये माझ्या आईची प्रकृती ढासळली. तिची स्थिती गंभीर झाल्यामुळे आम्ही तिला कांदीवली, मुंबई येथे बहिणीच्या घराजवळील ‘चव्हाण रुग्णालया’त भरती केले. ते रुग्णालय आधुनिक वैद्य यशवंत चव्हाण यांचे होते आणि ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या ओळखीचे होते. त्यांनी मला पुष्कळ साहाय्य केले. मला धीर देतांना ते म्हणाले, ‘‘तुम्ही आईची काळजी करू नका. आम्ही सर्व काळजी घेऊ. शस्त्रकर्म किंवा काही कष्टप्रद गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. त्यांना नळीवाटे अन्न देऊन जितके दिवस सांभाळता येईल, तितके दिवस सांभाळू.’’ त्या वेळी बहिणीने पुष्कळ कष्ट घेऊन आईला सांभाळले.
२१ अ २. आईचा मृत्यू एका आठवड्याने न होता अडीच मासांनी झाल्यावर त्याविषयी प.पू. डॉक्टरांना विचारणे, तेव्हा ‘आईसोबत असलेले प्रारब्ध संपावे’, यासाठी ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी तिचे आयुष्य वाढवले’, असे गुरुदेवांनी सांगणे : एके दिवशी अभ्यासवर्ग संपल्यानंतर मी प.पू. डॉक्टरांना आईविषयी सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘त्या एका आठवड्यात जातील (मृत्यू होईल) !’’ त्यानंतर ३ मासांनी मी प.पू. डॉक्टरांना विचारले, ‘‘माझी आई एक आठवड्यानंतर जाणार होती; मात्र ती अडीच मासांनंतर गेली.’’ तेव्हा थोडे शांत राहून ते म्हणाले, ‘‘तुमची आणि तुमच्या बहिणीची आईच्या संदर्भातील सेवा राहिली होती. ते प्रारब्ध फेडण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे आयुष्य वाढवले. त्यांची तुमच्यावर कृपा झाली.’’ हे ऐकून माझी भावजागृती झाली. त्यांच्या त्या शब्दांचा नंतर मला प्रत्यय आला. वर्ष २००८ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या कृपेने माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के आणि वर्ष २०१५ मध्ये बहिणीची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होऊन आम्ही दोघेही जन्म-मृृत्यूच्या फेर्यांतून सुटलो. यासाठी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.
२२. ‘परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी साधना होत नाही’, याविषयी पू. शिवाजी वटकर यांना वाटणारी खंत
परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यापासून, म्हणजे वर्ष १९८९ ते २००६ पर्यंत मी घरी राहून आणि कार्यालयात कामे करत असतांना साधना करत होतो. प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेले संत जनाबाईंचे पुढील भजन मला फार प्रिय आहे. त्यामध्ये माझ्या मनाच्या स्थितीचे वर्णन आहे. माझ्या साधनाप्रवासात प्रत्यक्ष भगवंताने, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्वकाही केले आहे; मात्र ‘मी त्यांचे आज्ञापालन करण्यास न्यून पडलो’, याची मला नेहमी खंत वाटते.
नाहीं केली तुझी सेवा । दुःख वाटतसे माझ्या जिवा ॥ १ ॥
नष्ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥ २ ॥
जें जें दुःख झालें मला । तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥ ३ ॥
रात्रंदिन मजपाशीं । दळूं कांडूं लागलासी ॥ ४ ॥
क्षमा करावी देवराया । दासी जनी लागे पायां ॥ ५ ॥
अर्थ : संत जनाबाई विठ्ठलाला म्हणतात, ‘हे देवा, मी तुझी सेवा केली नाही’, याचे माझ्या जिवाला दुःख होत आहे. तुझे ध्यान न करणारी मी नीच पापीण आहे. मला जे जे दुःख झाले, ते ते तूच सहन केलेस. तू माझ्या समवेत रात्रंदिवस दळण-कांडण केलेस. हे देवराया, तू मला क्षमा कर. मी तुझ्या चरणांपाशी आले आहे.’
वरील अभंगाप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनी मला नेहमी स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर साहाय्य केले आहे. त्यांना मी ‘गुरुकृपायोगानुसार’ अष्टांग साधना करणे अपेक्षित आहे; पण ती करण्यास मी पुष्कळ न्यून पडलो. त्यासाठी त्यांनी मला क्षमा करावी.
आता मी एका सुखी, ऐश्वर्यसंपन्न आणि आनंदी अशा मोठ्या कुटुंबात, म्हणजे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहात आहे. येथे अनेक साधक एका कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे वात्सल्यभावाने एकत्र रहातात. साधकांमध्ये व्यापकता वाढत आहे आणि त्या व्यापकतेचा आनंद सर्वजण घेत आहेत. या आश्रमामुळे मला भगवंताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’, असा आनंद चाखायला मिळत आहे.
प्रार्थना
‘हे गुरुराया, मला माझ्या स्वेच्छेने मायेतील मागितलेले काहीही देऊ नका. सर्वकाही ईश्वराच्या, म्हणजेच तुमच्या इच्छेने होऊ द्या. तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना आणि सेवा यांचे प्रयत्न करून घ्या. मला तुमच्या चरणी धूलीकण म्हणून राहू द्या’, अशी मी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’
(क्रमशः)
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.५.२०२०)