पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सुभेदार’ चित्रपटाचे ‘प्रमोशन’ !
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा !
पुणे, १० ऑगस्ट (वार्ता.) – आज आपण शिवरायांचा जागर करणार आहोत. श्री शिवराज अष्टक म्हणजे छत्रपती शिवराय आणि त्यांचे पराक्रमी सहकारी यांच्या पराक्रमावर आधारित ८ चित्रपटांची मालिका. काही वर्षांपूर्वी दिग्पाल लांजेकर या पुणे येथील हरहुन्नरी तरुणाने स्वप्न पाहिले होते. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीपर्यंत पोचवणे हा या मालिकेचा प्रामाणिक हेतू होता. या हेतूशी प्रामाणिक रहात ही मोहीम चालू केली. फर्जंद, फत्तेशिकस्त, शेर शिवराज, पावनखिंड या ४ चित्रपटांच्या पूर्ततेने बघता बघता श्री शिवराज अष्टकाच्या मध्यावर येऊन पोचलो. आता ‘सुभेदार’ या चित्रपटाच्या रूपाने पाचवे चित्रपुष्प शिवरायांच्या चरणी वहाणार आहोत. आज आपण या चित्रपटाचे लघुदर्शन (ट्रेलर) पहाणार आहोत. उपस्थित सर्व मावळ्यांच्या वंशजांना अभिवादन !, या शब्दांत ७ ऑगस्ट या दिवशी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सुभेदार’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. कोंढाणा गड काबीज करण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा या चित्रपटात दाखवण्यात येत आहे. १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ चित्रपटगृहामध्ये येणार आहे.
सुभेदार तानाजी मालुसरेंचे तेरावे वंशज श्री. कुणाल मालुसरे आणि त्यांचे सर्व मालुसरे कुटुंब, तसेच इतर मावळ्यांचे वंशजही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्वांचा येथे सत्कार करण्यात आला. सर्व सभागृह छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.