२० कारवायांमध्ये ३६ जणांना अटक : २५ जणांना तडीपार करणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी
जिल्ह्यातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध भागांत छापे
रत्नागिरी, ९ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यात अमली पदार्थांची होणारी तस्करी, विक्री, सेवन याविरोधात पोलिसांनी मोहीम राबवण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातून अमली पदार्थांचे उच्चाटन होण्यासाठी जानेवारीपासून अनेक भागांत छापेही मारण्यात आले. या छाप्यानंतर २० कारवाया करण्यात आल्या असून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील ६ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धनंजय कुलकर्णी पुढे म्हणाले की, या कारवाईत २२ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये भा.दं.वि. १०७ प्रमाणे ६, भा.दं.वि. ११० प्रमाणे १० आणि भा.दं.वि. ५६ प्रमाणे ६ जणांचा समावेश आहे. या प्रकरणातील कारागृहात असलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण २५ जणांना जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याचे प्रयत्न असून, सध्या अमली पदार्थांची तस्करी करणार्या ६ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई, मिरज, पंढरपूर, सातारा, पुणे यासारख्या भागांतून अमली पदार्थ येत असल्याचे अन्वेषणात समोर आले आहे.
अमली पदार्थांविरोधात प्रबोधन आवश्यक !
अमली पदार्थांविषयी शाळांमध्ये चित्रकला आणि निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना १५ ऑगस्ट या दिवशी गौरवण्यात येणार आहे.