सातारा जिल्ह्याला विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी सहा कोटी रुपये !
सातारा, ९ ऑगस्ट (वार्ता.) – राज्य शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि पायमोजे वितरणासाठी सातारा जिल्ह्यास अनुमाने ६ कोटी ८३ लाख रुपये दिले आहेत. केंद्रशासनाच्या ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्याला मिळालेला निधी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने लवकरच शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात येणार आहे.
१. विनामूल्य गणवेश योजनेतून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या वर्गातील अनुसूचित जाती जमातीच्या सर्व मुले-मुली आणि दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांना विनामूल्य गणवेशाचा लाभ देण्यात येत होता; मात्र आता पहिली ते आठवीपर्यंतच्या इतर प्रवर्गातील दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांनाही विनामूल्य गणवेश दिला जाणार आहे.
२. ‘समग्र शिक्षा अभियान’ अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला ६०० रुपये प्रमाणे विनामूल्य २ गणवेश दिले जातात. बूट आणि पायमोजेही देण्यात येतात. बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचे वाटप करण्यात आले होते.
३. सातारा जिल्ह्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या अनुमाने १ लाख ३९ सहस्र ३४७ आहे.