अमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी ‘दप्तर तपासणी मोहीम’ ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
कोल्हापूर – अमली पदार्थांच्या व्यसनापासून विद्यार्थी आणि युवक यांना परावृत्त करण्यासाठी व्यापक जनजागृती करा. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, तसेच महाविद्यालयातील मुलांनी अमली पदार्थ जवळ बाळगू नयेत यांसाठी शाळा, महाविद्यालयांनी एका मासात अचानकपणे २ वेळा विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या. या वेळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर, मिरज रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी काळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘दप्तर तपासणीच्या कालावधीत मुलांच्या दफ्तरात अमली पदार्थ आढळून आल्यास त्यांचे समुपदेशन करा. मुलींच्या दप्तराची पडताळणी महिला शिक्षिकेकडूनच होईल, याची दक्षता शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. शाळा, महाविद्यालये, बगिचा, चित्रपटगृहे, कॉफी शॉप, हुक्का पार्लर, निवासगृहे, बसस्थानक, रेल्वेस्थानक, खासगी बसगाड्या आदी ठिकाणी अमली पदार्थांची विक्री आणि देवाणघेवाण होऊ नये, यांसाठी पडताळणी करा. विद्यार्थी-युवकांसमवेत त्यांच्या पालकांमध्येही जनजागृती करा.’’
संपादकीय भूमिका
|