मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांना ‘ईडी’ची नोटीस !
मुंबई – मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना आर्थिक अपहाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स देण्यात आला आहे. ठाणे येथील बांधकाम व्यावसायिकाशी एका कथित आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी हा समन्स पाठवण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये पोलिसांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन कमाल मर्यादा विभागात घोटाळा झाल्याचे उघडकीस आणले होते. याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली. आरोपी बांधकाम व्यवसायिकाला नागरी जमीन कमाल मर्यादा कायद्याच्या अंतर्गत त्यांची अधिकची भूमी सरकारकडे सोपवायची होती. या कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही भूखंडावर बांधकाम करतांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ५ टक्के भूमी सरकारला हस्तांतरित करणे आवश्यक आहे. कायद्यातील या तरतुदीला फाटा देऊन या प्रकरणात चुकीच्या नोंदी करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक नियुक्त करण्यात आले आहे.