लवकरच संत श्री बाळूमामा मंदिरात (आदमापूर) २४ घंटे ‘ऑनलाईन’ दर्शन चालू करणार ! – शिवराज नाईकवाडे, प्रशासक
कोल्हापूर – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत श्री बाळूमामा मंदिराचा कारभार हातात घेतल्यानंतर केवळ ४ मासांत ९ कोटी २ लाख रुपये मिळाले आहेत. श्री बाळूमामा मंदिरातील एकूणच कारभारात शिस्त आणण्याचा प्रयत्न असून सर्व दानपेट्या कुलपबंद करण्यात आल्या आहेत. मंदिरातील सर्व आर्थिक व्यवहार हे पारदर्शीपणे होण्यासाठी ते आता ‘धनादेशा’च्या माध्यमातून करण्यात येत आहेत. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून आता मुखदर्शनाच्या २ रांगा केल्या आहेत. मंदिराचे फेसबुक, ट्विटर खाते चालू केले असून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराप्रमाणे संत श्री बाळूमामा मंदिरात २४ घंटे ‘ऑनलाईन’ दर्शन चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे प्रशासक श्री. शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
१. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिवपद सांभाळल्यामुळे तेथील अनुभव गाठीशी होता. त्यामुळे या मंदिरासाठी जे जे काही करता येईल, ते सर्व करण्याचा माझा प्रयत्न आहे. हे मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे उत्पन्न असणारे मंदिर असून अमावास्या-पौर्णिमेला २-३ लाखांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांना प्रसाद, वाहतनतळ यांपासून ज्या ज्या सुविधा देणे आवश्यक आहे, त्या त्या सर्व सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे.
२. सध्या मंदिरात सकाळ आणि सायंकाळ २ घंटे विनामूल्य प्रसाद देण्याची सुविधा आहे. प्रसादात भात, आमटी, खीर यांचा समावेश असून या प्रसादाच्या माध्यमातून आणखी चांगली सुविधा कशी देता येईल ? यांसाठी आमचे प्रयत्न आहेत.
३. यापूर्वी मंदिरात काही चोरट्यांकडून महिला भाविकांचे दागिने चोरण्याचा प्रकार होत असे; मात्र मंदिरात ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवल्यावर हा प्रकार जवळपास बंद झाला आहे.
४. संत श्री बाळूमामा देवस्थानच्या बकर्याही मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, हिंगोली, जालना या ठिकाणी या बकर्या आहेत. १८ तळांवर साधारणत: ३० ते ३२ सहस्र बकर्या देवस्थानच्या मालकीच्या आहेत.
५. येथे येणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कागल-निढोरी, निपाणी-मुरगुड, मुदाळतिठ्ठा-गारगोटी यांसह मंदिराकडे येणार्या मार्गावर आम्ही देवस्थानकडे जाणारे दिशादर्शक फलक लावले आहेत. यात कर्नाटक राज्यातून येणार्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनाही समजावे म्हणून फलकावर संत श्री बाळूमामा यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे.
मोठ्या संख्येने भाविक आल्याने भाविकांना वाहन लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशी अमावास्येला स्थिती असते. त्यासाठी जागा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंदिराच्या परिसरातील काही जागा लवकरच आमच्या कह्यात येईल. ती आल्यावर पुढील काळात एकही वाहन रस्त्यावर न थांबता विनामूल्य असलेल्या देवस्थानच्या वाहनतळावर थांबेल.
६. संत बाळूमामा यांच्यासाठी भाविक जे धोतर, सदरा, फेटा अर्पण करतात, ते ‘वस्त्र प्रसाद केंद्रा’च्या माध्यमातून आम्ही भाविकांना परत देतो. देवस्थानच्या वतीने शुद्ध खोबरेल तेल देण्याची व्यवस्था असून या माध्यमातूनही भाविकांना लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
आगामी योजना ! १. सध्या लाडूप्रसाद बंद असून लवकरच भाविकांसाठी आम्ही लाडूप्रसाद उपलब्ध करून देणार आहोत. जे भाविक ५०० रुपयांच्या पुढे अर्पण देतील, त्यांना विनामूल्य लाडूप्रसाद देण्याचा आमचा विचार आहे. २. मंदिराचे सुसज्ज असे रुग्णालय असून सध्या ‘महात्मा फुले वैद्यकीय सुविधा’ येथे उपलब्ध नाही. ही सुविधा चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ३. सध्या भक्तनिवासात १२० खोल्या आहेत. येणार्या भाविकांचा ओघ पहाता ही व्यवस्था पुष्कळच अपुरी असून आणखी २ भक्तनिवास प्रस्तावित आहेत. त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. ४. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस चौकीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सध्या देवस्थानच्या वतीने त्यासाठी जागा देण्यात आली आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर २४ घंटे भाविकांसाठी उघडे असते. ‘श्री महालक्ष्मीदेवीच्या कृपाछत्राखाली राहिल्यानंतर आता संत श्री बाळूमामा यांनीच मला येथे बोलावून घेतले’, अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे भाविकांना ज्या सर्व सुविधा देणे अपेक्षित आहे, त्या सर्व सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे. |