अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्यात आणीबाणी घोषित !

बॉस्टन (अमेरिका) – अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्याच्या गव्हर्नर मौरा हीली यांनी ८ ऑगस्ट या दिवशी राजधानी बॉस्टनमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित केली. शरणार्थी मोठ्या प्रमाणात राज्यात घुसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगत हीली म्हणाल्या की, मॅसॅच्युसेट्स राज्य जवळपास ५ सहस्र ६०० कुटुंबे किंवा २० सहस्रांपेक्षा अधिक शरणार्थींना सहन करत आहे. एका वर्षापूर्वी ३ सहस्र १०० कुटुंबे आश्रयस्थानात रहात होती. यावरून स्थलांतरितांच्या संख्येत ८० टक्के वाढ झाली आहे, असे हीली यांनी सांगितले.

अनेक शरणार्थी इतर राज्यांतून विमानाने राज्यात येत आहेत. गेल्या ४८ घंट्यांत ५० स्थलांतरित कुटुंबे राज्यात आश्रयासाठी आली आहेत. मॅसॅच्युसेट्समध्ये येणारे शरणार्थी हे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित संकटाचा एक भाग आहे. ते अशा वेळी येत आहेत, जेव्हा राज्यात आधीच घरांची न्यूनता आहे, असेही हीली म्हणाल्या. ‘असोसिएटेड प्रेस’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.