श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) यांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेच्या कालावधीत त्यांना जाणवलेली सूत्रे अन् गुरुकृपेने आलेल्या अनुभूती !
१. शस्त्रक्रियेविषयी आरंभी असलेली भीती जाऊन सर्वकाही गुरुचरणी सोपवल्याने स्वत:कडे त्रयस्थाप्रमाणे पहाता येणे
‘हृदयाची शस्त्रक्रिया होणार’ या विचाराने ‘माझे काय होणार ?; मला हे कसे सहन करता येणार ?’, असे विचार माझ्या मनात आरंभीच्या काळात येत होते; पण नंतर वाटले, ‘तन-मन-धन गुरूंना अर्पण केल्यावर तन माझे नाहीच. त्यामुळे शस्त्रक्रियेचा मला काहीही शारीरिक त्रास होणार नाही.’ प्रत्यक्षातही तसेच झाले. पूर्ण काळ मी स्वतःकडे आणि स्वतःच्या शरिराकडे त्रयस्थाप्रमाणे बघू शकलो.
२. सद़्गुरु राजेंद्रदादांमधील प्रीती अनुभवणे
‘माझ्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यानंतर जेव्हा जेव्हा आश्रमातील भोजनकक्षात माझी सद़्गुरु राजेंद्रदादांशी (सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांची) भेट व्हायची, तेव्हा ते माझी प्रेमपूर्वक चौकशी करायचे. त्या वेळी त्यांना त्रासानुरूप नामजपादी उपाय विचारल्यावर ते लगेच उपायही सांगायचे.
३. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सतत समवेत असल्याची अनुभूती येणे
चिकित्सालयात हृदयाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी गेल्यावर आरंभी मला थोडा त्रास जाणवला; पण नंतर ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव माझ्यासमवेत सतत असून माझे रक्षण करत आहेत’, याची मला अनुभूती आली. रुग्णालयात भरती झाल्यावर पहिल्याच रात्री पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा दूरभाष आला. त्यांनी मला सांगितले की, त्यांची भावजागृती होत आहे. त्या वेळी रुग्णालयात सर्वत्र रज-तम असूनही ‘माझ्याभोवती सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी संरक्षककवच निर्माण केले आहे’, असे मला वाटले.
४. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मंत्रांचे लक्षात आलेले सामर्थ्य !
शस्त्रक्रियेच्या आधी मला उपायांसाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या स्वरातील मंत्र पाठवण्यात आले होते. त्यांचे उच्चारण केल्यानंतर माझी सकारात्मकता वाढली असल्याचे मला जाणवायचे.
५. चिंताग्रस्त सहरुग्णांना साधनेचे महत्त्व सांगता येणे
शस्त्रक्रियेसाठी आलेले इतर रुग्ण अतिशय त्रस्त आणि चिंतेत दिसायचे. अनेकांच्या बोलण्यात त्यांच्या नातेवाइकांबद्दल तक्रारीचा सूर जाणवायचा. शस्त्रक्रियेपूर्वी अनेक दिवस विविध शारीरिक चाचण्यांसाठी मला रुग्णालयात रहावे लागले. त्या काळात मला काही रुग्णांशी सकारात्मक चर्चा करता आली आणि मला त्यांना साधना अन् तिची आवश्यकता यांविषयी सांगता आले.
६. शस्त्रक्रियेच्या वेळी असलेली मनाची स्थिती
शस्त्रक्रियेच्या दिवशी मला सकाळी शल्यकर्म कक्षात (‘ऑपरेशन थिएटर’मध्ये) नेण्यात आले. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे, स्वत:कडे त्रयस्थासारखे बघणे आणि मन शांत ठेवणे हे सर्व मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळे जमू शकले.
७. पू. वटकरकाका यांनी केलेले आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य
अनेक दिवसांपासून पू. वटकरकाकांकडून मला शिकण्यासाठी आणि साधनेसाठी प्रेरित करणारे संदेश सकाळी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून येत असत. त्यामुळे मला अस्वास्थ्याची तीव्रता असूनही धीर मिळत असे आणि कृतज्ञता वाटत असे.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर पू. काकांकडून मला समुचित (योग्य, उपयुक्त) मार्गदर्शन मिळाले. ते प्रतिदिन पहाटे प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या शिकवणीतील एकेक सूत्र चित्ररूपाने पाठवत. मी आश्रमात आल्यावर एके दिवशी पू. वटकरकाका स्वत: माझ्या खोलीत सदिच्छा देण्याच्या निमित्ताने आले आणि त्यांनी मला प्रसादरूपी फळेे दिली. त्यांनी केलेल्या आध्यात्मिक साहाय्याबद्दल त्यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो.
८. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे कृपामय बोल ऐकून भावजागृती होणे
शस्त्रक्रियेनंतर मला आश्रमात आणल्यावर एकदा श्रीसत्शक्ति सौ. बिंदा सिंगबाळ यांचा विक्रमला (माझ्या मुलाला) भ्रमणभाष आला होता. त्यांनी त्याच्याकडे माझी प्रेमपूर्वक विचारपूस केली. पुढे रक्तदाब अत्यल्प झाल्याने मी पुन्हा एकदा रुग्णालयात भरती असतांना त्यांनी भ्रमणभाष करून आमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मला ‘नामजप अधिकाधिक भावपूर्ण करण्यास सांगून भगवंत आपले प्रारब्ध आपत्काळापूर्वीच संपवत असल्याचे सांगून सर्वकाही चांगले होईल’, या शब्दांनी मला आश्वस्त केले. त्यांचे कृपामय बोल ऐकून आम्हा सर्वांची भावजागृती झाली.
९. कृतज्ञता
सनातन परिवाराने पूर्णपणे निभावून नेलेल्या या जटिल शस्त्रक्रियेचे वर्णन करणे शब्दांच्या पलीकडे आहे. ‘पूर्णपणे निकामी झालेले माझे हृदय या माध्यमाने सक्षम करून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी जी वाढीव वर्षे साधनेसाठी उपलब्ध करून दिली आहेत, त्यांचा पूर्ण उपयोग माझ्याकडून भावपूर्ण आणि परिणामकारक साधना करण्यासाठी व्हावा अन् यासाठी त्यांनीच शक्ती देऊन साधना करवून घ्यावी’, अशी त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना करतो.’
– श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |