‘आनंदी रहाणे’, हे साध्य सहजतेने गाठण्यासाठी साधकांनी कसे प्रयत्न करावेत ?
दिलेली सेवा समयमर्यादेत पूर्ण केल्यावर साधनेच्या दृष्टीने शीघ्र गतीने प्रगती होत असणे‘एकदा परम पूज्य डॉक्टर यांच्या खोलीत देवांची पूजा करत असतांना आमच्यात पुढील संभाषण झाले. प.पू. डॉक्टर : ‘तुला पूजा करायला किती वेळ लागतो ? मी (सौ. वर्धिनी गोरल) : मला पाऊण घंटा लागतो. प.पू. डॉक्टर : तीच सेवा करायला सहसाधकांना किती वेळ लागतो ? मी : एक घंटा लागतो. प.पू. डॉक्टर : एखाद्या सेवेला जेवढा सेवेचा वेळ असतो, त्याच वेळेत ती सेवा पूर्ण करायला पाहिजे. जर आपण अधिक वेळ सेवा करत राहिलो, तर आपली साधना होत नाही. जेवढा सेवेला उशीर होतो, तेवढी प्रगती न्यून होते. मी : परम पूज्य, जर त्या साधकाची गती आणि प्रकृती यांमुळे त्याला वेळ लागत असेल, तर त्या वेळी कसे करायचे ? प.पू. डॉक्टर : प्रयत्न केल्यावर सर्वकाही मिळते. भाव वाढवला की, ‘देव मिळतो.’ कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आपण प्रयत्न करायला पाहिजेत. ‘आपला प्रत्येक क्षण भगवंतासाठी दिला पाहिजे. आपली तळमळ वाढवायला पहिजे. आपण जर प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठीच करत राहिलो, तर देव आपल्याला साहाय्य करणारच आहे. भगवंत आपल्याला प्रत्येक सेवेचे नियोजन करून देत असतो’, हे मला शिकायला मिळाले.’ – सौ. वर्धिनी गोरल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. |
मी नेहमी आनंदी असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एकदा मला ‘साधकांनी आनंदी रहाण्यासाठी काय प्रयत्न करावेत ?’, याविषयी लेख लिहून देण्यास सांगितले होते. माझ्या लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘भगवंताच्या कृपेने ईश्वरप्राप्ती जलद गतीने होण्यासाठी आनंदी रहाणे’, हा देवाने दिलेला सहज आणि सोपा मार्ग आहे !
‘भगवंताच्या कृपेने ईश्वरप्राप्ती शीघ्र गतीने होण्यासाठी आनंदी रहाणे’, हा देवाने दिलेला सहज आणि सोपा मार्ग आहे. ‘साधकांनी आनंदी राहून आपला प्रत्येक क्षण भगवंतासाठी द्यायला पाहिजे. आपण मिळालेला आनंद कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रयत्न करायला पाहिजेत. तसे केल्याने आपण प्रत्येक कृतीतून आनंद मिळवू शकतो.
२. नकारात्मक विचारांमुळे ताण वाढणे आणि सेवेतील आनंद घेता न येणे, तर सकारात्मक विचारांमुळे आनंदात वाढ होणे
आपल्या मनात येत असलेल्या विचारांवर आपल्या मनाची स्थिती अवलंबून असते. मनात नकारात्मक विचार असतील, तर मन निरुत्साही रहाते. त्यामुळे आपण जी कृती किंवा सेवा करतो, तिच्याकडे आपले लक्ष नसते. परिणामी आपल्याकडून चुका होतात किंवा त्या कृती वेळेत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे आपल्याला ताण येतो. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊन आपण दिवसभर त्या विचारांमध्ये असतो. त्यामुळे आनंद मिळवू शकत नाही. देवाने दिलेल्या प्रत्येक क्षणाचा आणि सेवेतून मिळणारा आनंदही आपण घेऊ शकत नाही.
३. उपाययोजना
३ अ. मनात येणार्या नकारात्मक विचारांवर नामजप आणि आध्यात्मिक उपाय करून त्यांवर मात करणे आवश्यक असणे : मनात नकारात्मक विचार येत असतील, तर त्या वेळी त्या नकारात्मक विचारांच्या जोडीला सकारात्मक विचार करायला हवेत. मनात सकारात्मक विचार वाढले की, आपोआप आनंदात वाढ होते. नामजप करून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आणि स्वतःवर आलेले त्रासदायक शक्तींचे आवरण काढणे’, असे प्रयत्नही केले पाहिजेत.
३ आ. ‘प्रत्येक क्षणी साधनाच करायची आहे’, असा विचार केल्यास मन सकारात्मक राहील ! : ‘भगवंताने मला हा क्षण दिला आहे आणि त्याच्यासाठीच मला हा क्षण वापरायचा आहे’, हा विचार मनात ठेवला, म्हणजेच वर्तमानकाळात राहिले, तरी आपल्या मनात अन्य कोणतेही विचार येणार नाहीत. कोणतीही वैयक्तिक कृती किंवा सेवा असू दे, त्यामध्ये आपले मन सकारात्मकच राहील.
३ इ. आपल्या समवेत असणार्या साधकांशी स्वतःच्या स्थितीची तुलना न करता त्यांच्यासारखे होण्यासाठी ‘मी कुठे अल्प पडते ?’, याचा विचार करावा ! : बरेच साधक इतर साधकांशी स्वतःची तुलना करतात. ‘तो किती आनंदी आहे ? त्याचे सर्व चांगले चालले आहे. त्याची सेवा चांगली चालली आहे. त्याला कसलीच अडचण येत नाही’, अशा प्रकारे तुलना होते. आपण अशा वेळी त्या साधकाकडून शिकणे अपेक्षित आहे. देवाने मलाही त्याच्यासारखेच रूप दिले आहे. त्याच्यासारखीच बोलण्याची क्षमता दिली आहे आणि त्याच्यासारखी सेवा दिली आहे, मग ‘त्याच्यासारखे स्वतःला घडवण्यात मी कुठे न्यून पडत आहे ?’, याचे चिंतन केले पाहिजे.
३ ई. अन्य साधकांच्या माध्यमातून देव करत असलेल्या साहाय्यातून कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे : ‘आपण कुठे न्यून पडतो ?’, हे स्वतःच्या लक्षात येत नसल्यास इतरांचे साहाय्य घेऊ शकतो. ‘अन्य साधकांकडून साहाय्य मिळते, म्हणजे आपल्याला देव साहाय्य करतो’, असा भाव ठेवून प्रयत्न करू शकतो.
३ उ. नकारात्मक आणि सकारात्मक विचार एकत्रच येत असणे : नकारात्मक विचार येत असतील, तर त्या जोडीला सकारात्मक विचारसुद्धा पुष्कळ असतात. सर्वांनाच ठाऊक असते की, ‘कोणता विचार नकारात्मक आहे आणि कोणता विचार सकारात्मक आहे.’ आध्यात्मिक त्रासामुळे काही वेळा लक्षात येत नाही. त्या वेळी अन्य साधकांचे साहाय्य घेऊ शकतो.
३ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अखंड स्मरण करणे : ‘भावाच्या स्तरावर काय प्रयत्न करावे ? गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अखंड स्मरण करून त्यांनी आपल्याला काय दिले ?’, त्या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करायची. गुरूंच्या समवेत आपण घालवलेल्या क्षणांची आठवण ठेवून ‘गुरु आपल्या समवेत आहेत’, याची प्रचीती घ्यायची.
४. प्रत्येक कृती करतांना देवाच्या अनुसंधानात राहिल्यास त्यातून आनंद मिळणे
प्रतिदिन प्रयत्न केले की, देवाची ओढ निर्माण होते. आपल्यामध्ये भाव निर्माण होतो. त्यानंतर आपण देवाच्या अनुसंधानात राहून आपली ‘प्रत्येक कृती आणि सेवा त्याच्या समवेत करत आहोत’, असे आपल्याला वाटून सारखी कृतज्ञता वाटते. मग कोणतीही सेवा असली, तरी ती स्वीकारता येते आणि आपल्याला तिच्यातून आनंद मिळतो. तो आनंद आपल्या चेहर्यावर दिसतो.
५. आरंभी चेहर्यावर स्मितहास्य ठेवून येता-जाता प्रत्येक साधकाकडे पाहून हसत चेहरा प्रसन्न ठेवावा. त्यानंतर आपण आनंदी राहू आणि इतरांनाही आनंदी असल्याचे लक्षात येईल’
– सौ. वर्धिनी वासुदेव गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.