परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगामुळे झालेले गुणवर्धन आणि त्यांच्या अविस्मरणीय सत्संगातील काही सुखद आठवणींचे स्मरण
सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सूक्ष्म जगता’ची करून दिलेली ओळख, तसेच अन्य राज्यांत प्रचार करतांना पू. शिवाजी वटकर यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अनुभवलेली अपार कृपा आणि अनिष्ट शक्तींपासून झालेले रक्षण’, यांविषयी आपण ९.८.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात पाहिले. आज पुढील भाग पाहू.
(भाग ८)
१८. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगामुळे झालेले गुणवर्धन
१८ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचा स्थुलातून सत्संग लाभूनही त्यांचा ‘प्रीती’ हा गुण आत्मसात करता न येणे आणि त्यांनी प्रामुख्याने प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगणे : साधना करतांना आरंभीची सलग १० वर्षे मला परात्पर गुरु डॉक्टरांचा स्थुलातून सत्संग लाभला, तरीही मी त्यांच्याकडून ‘प्रीती’ हा गुण शिकण्यास न्यून पडलो. कधीकधी परात्पर गुरु डॉक्टर म्हणायचे, ‘‘निरपेक्ष प्रेम करणे’, हे वटकरांना जमणार नाही. त्यामुळे ‘त्यांचे साधनेचे दुसरे काही पैलू विकसित होतील’, अशी सेवा त्यांना सांगूया.’’ एवढी माझी साधनेची स्थिती गंभीर होती. याविषयी मी परात्पर गुरु डॉक्टरांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही प्रामुख्याने प्रेमभाव वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सर्वकाही ठीक होईल.’’
परात्पर गुरु डॉक्टर आणि सहसाधक यांनी माझ्यातील ‘प्रीती’ या गुणाची वाढ होण्यासाठी माझ्याकडून सातत्याने प्रयत्न करून घेतले. ‘अशक्य ही शक्य करतील स्वामी ।’ या वचनानुसार ‘जे देवाला शक्य झाले नाही, ते श्री गुरु करू शकतात’, याची मला अनुभूती आली. परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला अहंच्या गंभीर स्थितीतून बाहेर काढून आनंद दिला.
१८ आ. ‘नियोजन करणे’ या गुणामुळे झालेला लाभ
१८ आ १. ‘लिखित नियोजन’ म्हणजे देवाला दिलेला शब्द आहे’, असे वाटून तो शब्द पूर्ण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले जाणे : मी लहानपणापासूनच लिखित नियोजन करायला शिकलो आणि हळूहळू मला त्याची गोडी लागली. परात्पर गुरु डॉक्टरांची भेट होऊन साधना चालू केल्यावर ‘लिखित नियोजन’ म्हणजे त्यांना दिलेले वचन आहे’, याची जाणीव होऊन माझ्याकडून सेवा करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. लिखित नियोजन हे माझे ‘ध्येय’ असते आणि ते पूर्ण झाल्याविना मला करमत नाही. नियोजनात ठरवलेल्या कृती ‘केव्हा पूर्ण करीन’, याचा मला रात्रंदिवस ध्यास लागलेला असतो. ‘यालाच ‘तळमळ’ म्हणतात आणि ‘साधनेमध्ये तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे’, हेही परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला शिकवले आहे.
१८ आ २. नियोजन केल्यामुळे वेळेत आणि कार्यपद्धतीनुसार सेवा करण्याची शिस्त लागून क्षमता वाढणे : नियोजन केल्यामुळे मी करत असलेल्या सेवा माझ्या नियंत्रणात राहून त्या समयमर्यादेत करण्याचा प्रयत्न होत असे. त्यामुळे सेवा कार्यपद्धतीनुसार आणि वेळेत करण्याची शिस्त माझ्या अंगी बाणली गेली. अल्प वेळेत अधिक कृती केल्याने गुरुकृपेने माझी क्षमताही वाढली.
१८ आ ३. ‘नामस्मरणासाठी किती वेळ मिळतो’, हे दर्शवणारा लेख लिहिणे आणि त्यामुळे दिवसभर १३ घंटे नामजप करण्यासाठी मिळू शकतात’, हे लक्षात येऊन प्रयत्न होऊ लागणे : वर्ष १९९० मध्ये परात्पर गुरु डॉक्टर घेत असलेल्या अभ्यासवर्गात सर्वांना नामस्मरणाचे महत्त्व कळले; मात्र ‘नामस्मरण करण्यासाठी वेळ मिळत नाही’, असे वर्गातील सर्वजण म्हणू लागले. तेव्हा मी ‘मॅनेजमेंट फॉर चँटिंग’, असा लेख लिहिला. प्रतिदिन २४ घंटे, म्हणजे १४४० मिनिटे मिळतात. त्यामध्ये ‘दिवसभर मला कोणत्या कृती करायच्या आहेत आणि ‘त्यासाठी किती वेळ लागतो ?’, हे मी लिहून काढले. तेव्हा ‘जवळजवळ ५४ टक्के, म्हणजे १३ घंटे एवढा वेळ नामजप करण्यासाठी मिळू शकतो’, असे माझ्या लक्षात आले. प्रवासात, वैयक्तिक आवरतांना, जेवतांना, म्हणजे ‘ज्या कृती करण्यासाठी बुद्धीचा वापर करायचा नसतो’, अशा कृती करतांना आपण नामस्मरण करू शकतो.
मी हे अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉक्टरांना दाखवले आणि त्यांच्या कृपेने मी तसे प्रयत्न करण्यास आरंभ केला. यातून ‘नामजप करण्यास पुष्कळ वेळ उपलब्ध आहे’, हा संस्कार माझ्या मनावर झाला.
१८ आ ४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रचारदौर्यांचे नियोजन करतांना त्यांनी अनेक बारकावे शिकवणे : परात्पर गुरु डॉक्टरांचे महाराष्ट्र आणि गोवा येथे अध्यात्मप्रचार दौरे असायचे. त्या वेळी मला त्यांचे लिखित नियोजन आणि त्या त्या जिल्ह्यांतील साधकांशी समन्वय करण्याची सेवा मिळाली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ‘एकाच वेळी २ – ३ गोष्टी कशा करायच्या ? अगदी लहान लहान गोष्टींचेही नियोजन कसे करायचे ?’, इत्यादी शिकवले.
गुरुकृपायोगांतर्गत साधनेतील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेमुळे माझ्यातील अनेक स्वभावदोष जाऊन गुरुकृपेने ईश्वरी गुणांची वाढ होत आहे. ही सर्व परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यावर केलेली कृपाच आहे.
१९. संत आणि प्रचारसेवा यांसाठी चारचाकी गाडीचा झालेला उपयोग !
मुंबई, ठाणे आणि रायगड येथील अध्यात्मप्रचाराच्या सेवेसाठी मला माझ्याकडे असलेल्या चारचाकी गाडीचा पुष्कळ उपयोग झाला. गाडीमुळे मला अध्यात्मप्रचाराची, तसेच संतांना इच्छित स्थळी नेण्याची सेवा करता आली.
अ. मी परात्पर गुरु डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांना गाडीतून मुंबई येथून परात्पर गुरु डॉक्टरांचा अभ्यासवर्ग असलेल्या ठिकाणी घेऊन जात असे.
आ. एके दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांनी मला गाडीतून प.पू. काणे महाराज यांना अभ्यासवर्गाला घेऊन येण्याची सेवा दिली.
इ. घाटकोपर येथील प.पू. विजय जोशीबाबा यांच्या समवेत ते सांगतील, त्या ठिकाणी मी गाडी घेऊन जात असे.
ई. प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबईला यायचे. तेव्हा मी गाडी घेऊन त्यांच्या समवेत जात असे. प.पू. बाबांनी प.पू. डॉक्टरांना सांगितले होते, ‘‘मी जेव्हा मुंबईत येईन, तेव्हा वटकरांना माझ्या समवेत ठेवा.’’
परात्पर गुरु डॉक्टर अभ्यासवर्गात ‘चालक’ म्हणून माझ्याकडून झालेल्या सेवेतील चुका घ्यायचे. ‘मी कुठे चुकलो ?’, हे दाखवून त्यांनी मला साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याला नेले. ही त्यांची माझ्यावर असलेली कृपाच आहे.
२०. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अविस्मरणीय सत्संगातील काही सुखद आठवणी
मला परात्पर गुरु डॉक्टरांचा १० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रत्यक्ष सहवास लाभला. त्यांच्या सत्संगातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय असून त्यांच्या सुखद आणि चैतन्यदायी अशा काही आठवणी पुढे दिल्या आहेत.
२० अ. प.पू. भक्तराज महाराज प्रत्यक्ष भजने म्हणत असतांना ती ऐकण्याची तीव्र इच्छा असणे आणि मोरटक्का येथील भंडार्याला गेल्यावर प.पू. डॉक्टरांनी ती इच्छा पूर्ण करणे : प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) मुंबईत येत. तेव्हा प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मला त्यांचा अनमोल सत्संग लाभत असे. प.पू. बाबा जे बोलत, तो प्रत्येक शब्द मी मनात कोरून ठेवून ती अमृतवचने लिहून प.पू. डॉक्टरांकडे देत असे. मला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने फार आवडायची आणि ते प्रत्यक्ष भजने म्हणत असतांना मला ती ऐकण्याची तीव्र इच्छा होती.
मोरटक्का येथील भंडार्याच्या दिवशी मी श्री ‘शामसाई यांच्या आश्रमा’त झोपायला गेलो होतो. रात्री १२ वाजता प.पू. डॉक्टरांनी मला शोधले आणि प.पू. बाबा भजने म्हणत होते, त्या सभागृहात नेले. तिथे बसायला जागा नव्हती. त्यामुळे त्यांनी मला प्रत्यक्ष प.पू. बाबांच्या चरणांजवळच बसवले आणि भजने ऐकण्याचा आनंद दिला.
वर्ष १९९१ पासून मी प.पू. भक्तराज महाराज भजने गात असतांना ऐकत होतो. मी कोणत्याही मनःस्थितीत असलो, तरी त्या भजनांतील चैतन्यामुळे मला सकारात्मकता आणि आनंद अनुभवता यायचा. या भजनांमुळे मला आतापर्यंत साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे आणि ‘आनंदी जीवन कसे जगायचे ?’, हेही शिकता येत आहे.
२० आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सहवासातील आठवणींचे स्मरण होऊन ‘त्यांच्या रूपात भगवंतच समवेत होता’, या विचाराने भावजागृती होणे : डिसेंबर १९९२ मध्ये मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत रायगड जिल्ह्यात अध्यात्मप्रचाराला गेलो होतो. वाटेत आम्ही एका उपाहारगृहात मसाला डोसा खाल्ला होता. आता कधी कधी मला त्या गोष्टीची आठवण होते. तेव्हा मला काही कळत नव्हते; पण आता ‘प्रत्यक्ष भगवंतच सगुण रूपात माझ्या समवेत होता’, असा विचार येऊन माझी पुष्कळ भावजागृती होते.
(क्रमशः)
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.५.२०२०)
|
भाग ९ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/709837.html