गोवा : शिवोली येथील अनधिकृत ‘मुस्कान चिकन-मटण’ विक्री केंद्र बंद !
पंचायतीने नोटीस देऊनही दुकान बंद करण्यास नकार दर्शवल्याने तणाव
म्हापसा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – मार्ना-शिवोली पंचायत क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मधील अनधिकृत ‘मुस्कान चिकन-मटण’ विक्री केंद्र पंचायत आणि स्थानिक यांनी केलेल्या विरोधामुळे मालकाला हे केंद्र बंद करणे भाग पडले.
गेल्या काही वर्षांपासून हे ‘मुस्कान चिकन-मटण’ केंद्र या ठिकाणी चालू आहे. या केंद्राच्या विरोधात अनेक तक्रारी पंचायतीकडे आल्या होत्या. ऑक्टोबर २०२२ मध्ये या केंद्राची अनुज्ञप्ती संपली होती. लोकांच्या वाढत्या तक्रारींमुळे पंचायतीने या केंद्राच्या अनुज्ञप्तीचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला होता. या केंद्राच्या विरोधात स्थानिकांनी नव्याने पंचायतीकडे तक्रार प्रविष्ट केल्यानंतर मार्न-शिवोली पंचायत मंडळाने ८ ऑगस्ट या दिवशी सकाळी संबंधित केंद्राची पहाणी केली. या वेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले. पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. पंचायतीची अनुज्ञप्ती नसतांनाही दुकान बंद करण्यास दुकानमालकाने नकार दर्शवल्याने घटनास्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘पंचायतीने अनुज्ञप्तीचे नूतनीकरण केलेले नाही आणि यामुळे मालकाने स्वत:हून दुकान बंद करावे, अन्यथा पंचायत दुकानाला टाळे ठोकणार’, अशी चेतावणी पंचायतीने या वेळी दिली. शेवटी दुकानमालकाने स्वत:हून दुकान बंद केल्याने तणाव निवळला.
याविषयी ग्रामस्थ सूरज चोडणकर म्हणाले, ‘‘या परिसरात गुरे गायब होत आहेत आणि यामागे या केंद्राचा हात असल्याचा संशय आहे. दुकानावर ठेवण्यात येत असलेल्या मांसामुळे येथून ये-जा करणार्या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे. केंद्रातील मांसाहारी कचराही उघड्यावर टाकण्यात येत आहे.’’