बाणस्तारी अपघाताच्या प्रकरणी चालक महिला होती आणि तिच्यावर गुन्हा नोंदवा !
मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांची म्हार्दाेळ पोलिसांकडे मागणी
फोंडा, ८ ऑगस्ट (वार्ता.) – बाणस्तारी येथे झालेल्या अपघाताच्या प्रकरणी वाहन चालवणारी महिला होती आणि तिच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी ८ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी म्हार्दाेळ पोलीस ठाण्यासमोर दिवाडी आणि कुंभारजुवे येथील मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी केली. या वेळी भाजपचे कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांचीही उपस्थिती होती.
जागरूक नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते यांनी पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांना प्रश्न केला की, पोलिसांनी बाणस्तारी येथे झालेल्या अपघाताच्या वेळी परेश सिनाई सावर्डेकर यांची पत्नी मेघना या वाहन चालवत असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असूनही पोलिसांनी परेश सावर्डेकर यांच्या विरोधात गुन्हा कसा नोंदवला ? या वेळी प्रत्यक्षदर्शींनी पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांना सांगितले की, अपघातग्रस्त ‘मर्सिडिस’ वाहनाचे उजव्या बाजूचे दार अपघातानंतर उघडता येत नव्हते. यामुळे पती परेश सिनाई सावर्डेकर याला बाहेर येऊन वाहन चालवणार्या मेघना हिची जागा घेणे अशक्य होते. बाणस्तारी येथे झालेल्या अपघाताच्या वेळी एकूण ६ वाहनांना ठोकर देणारे आणि तिघांचा बळी घेणारे ‘मर्सिडीस’ वाहन महिला चालवत होती, अशी लेखी माहिती अपघाताचे पहिले प्रत्यक्षदर्शी दिग्विजय वेलींगकर यांनी म्हार्दाेळ पोलिसांना लेखी स्वरूपात दिली आहे.
अपघाताला उत्तरदायी चालकाला जामीन नाकारला !
अपघातात मद्यधुंद अवस्थेत वाहन हाकल्याने झालेल्या अपघातात तिघे ठार झाल्याच्या प्रकरणी चालक परेश सावर्डेकर याला फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
या प्रकरणी चालकाच्या विरोधात सदोष मनुष्यवध आदी गुन्ह्यांखाली गुन्हा नोंद करून त्याला कह्यात घेण्यात आले आहे.
A medical examination had confirmed that the accused was inebriated at the time of the incident.https://t.co/M855PFAIW9
— MSN India (@msnindia) August 9, 2023
चालक परेश सावर्डेकर यांच्या वतीने अधिवक्ता सरेश लोटलीकर आणि अधिवक्ता पाडगावकर यांनी, तर सरकारच्या बाजूने अधिवक्ता एस्. सामंत यांनी बाजू मांडली. म्हार्दाेळ पोलिसांनी ‘संशयिताला जामीन देऊ नये’, अशी न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने निकालात म्हटले आहे की, चालक मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन हाकत असल्याचे लक्षात येते. न्यायालयाने निवाडा देतांना चालक परेश सावर्डेकर याला जामीन नाकारला. संशयित परेश सावर्डेकर सध्या पोलीस कोठडीत आहे.
दोषीला शिक्षा होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बाणस्तारी येथील अपघाताच्या प्रकरणी पत्रकारांना म्हणाले, ‘‘जो कुणी दोषी आहे, त्याला शिक्षा होणारच आहे. पोलीस या प्रकरणी अन्वेषण करत आहेत.’’
बाणास्तारी येथील अपघातात दिवाडी येथील सुरेश फडते आणि भावना फडते हे दांपत्य ठार झाले. फडते दांपत्याला न्याय मिळावा, यासाठी दिवाडी येथील ग्रामस्थांनी ७ ऑगस्ट या दिवशी दिवाडी येथे सभा घेतली.