म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र झाल्यास ‘तमनार’ प्रकल्प अडचणीत येऊ शकतो ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा
पणजी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यास ‘गोवा तमनार वीजवाहिनी’ प्रकल्प अडचणीत येऊ शकतो, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत दिली. काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला वीजमंत्री सुदिन ढवळीकर उत्तर देत होते.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, ‘‘म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र करण्याविषयी अजूनही सरकारचा निर्णय झालेला नाही आणि यामुळे याविषयी मी अधिक काही सांगू शकत नाही; मात्र म्हादई अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित झाल्यास ‘तमनार’ प्रकल्पाच्या अडचणीत वाढ होईल. तमनार प्रकल्पाच्या माध्यमातून गोवा ते कर्नाटक यांच्यामध्ये २४० कि.मी. लांब वीजवाहिन्या घालण्यात येत आहेत.
‘तमनार’ प्रकल्पाच्या अंतर्गत धारबांदोडा ते म्हापसा वीजवाहिनी घालण्याचे काम चालू वर्षी पूर्ण होणार
‘तमनार’ प्रकल्पाच्या अंतर्गत धारबांदोडा ते म्हापसा वीजवाहिनी घालण्याचे काम चालू वर्षी, तर कर्नाटक ते धारबांदोडा यांच्यामधील वीजवाहिन्या घालण्याचे काम वर्ष २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. ‘तमनार’ प्रकल्प पूर्ण न झाल्यासही या प्रकल्पासाठी उभारल्या जाणार्या साधनसुविधांचा गोव्याला निश्चितच लाभ होणार आहे.’’