देशाला विश्‍वगुरु करण्‍याच्‍या पंतप्रधानांच्‍या प्रयत्नांना हातभार लावूया ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेचा शुभारंभप्रसंगी मनोगत व्‍यक्‍त करतांना खासदार श्री. धनंजय महाडिक, तसेच अन्‍य

कोल्‍हापूर, ८ ऑगस्‍ट (वार्ता.) – कोल्‍हापूरच्‍या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. कोल्‍हापूर-मुंबई बंद झालेली सह्याद्री रेल्‍वे चालू करण्‍यासाठी देहलीत २ बैठका झाल्‍या.‘वन्‍दे भारत’ चालू करण्‍यासाठी लागणारे सक्षम ‘रेल्‍वे ट्रॅक’ कोल्‍हापूर-मिरज या स्‍थानकादरम्‍यान नाहीत; मात्र लवकरच त्‍यांचे सक्षमीकरण होऊन  कोल्‍हापूर-मुंबई ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वे चालू होईल. कोल्‍हापूर-वैभववाडी रेल्‍वेमार्गासाठी पाठपुरावा चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या देशाला विश्‍वगुरु बनवण्‍याच्‍या प्रयत्नांना हातभार लावूया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेच्‍या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

ते म्‍हणाले, ‘‘कोल्‍हापूर रेल्‍वेस्‍थानकाच्‍या विकासासाठी ६ कोटी रुपये संमत केले होते. मी पाठपुरावा केल्‍यावर १८ कोटी आणि ४३ कोटी रुपये कोल्‍हापूरच्‍या रेल्‍वे विस्‍तारिकरणासाठी व्‍यय होणार आहेत. कोल्‍हापूर विमानतळाचे प्रवेशद्वार करण्‍यासाठी वैशिष्‍ट्यपूर्ण दगड वापरत असून कोल्‍हापूर रेल्‍वेस्‍थानकाचे पुरातन स्‍वरूप तसेच ठेवून नवीन विस्‍तारिकरण केले जाणार आहे.’’