रत्नागिरी एस्.टी. बसस्थानकाचे ६ वर्षे काम रखडल्याने मनसेने मोर्चा काढून दिली चेतावणी !
. . . अन्यथा बांधकामाच्या जागेवर म्हशी बांधून गोठा असल्याचे घोषित करू !
रत्नागिरी, ८ ऑगस्ट (वार्ता.) – मागील २ वर्षांपासून येथील एस्.टी. बसस्थानकाचे कोणतेही काम पूर्णत्वास गेलेले नाही. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना पावसात उभे राहून एस्.टी.ची वाट बघावी लागत आहे. ६ वर्षे रखडलेले हे काम पुढील २० दिवसांमध्ये चालू न केल्यास बांधकामाच्या जागेवर म्हशी बांधून हा गोठा असल्याचे घोषित करू !, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली आहे. बसस्थानकाच्या या रखडलेल्या प्रश्नाविषयी लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा काढून मनसेने शासनाचे लक्ष वेधले. या वेळी म्हशींचे प्रतिकात्मक मुखवठे दाखवून या कृतीचा निषेध करण्यात आला.
मनसेचे कोकण संघटक आणि सरचिटणीस श्री. वैभव खेडेकर म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आमदार, खासदार नव्हे, तर मंत्री आपले आहेत. मागील ६ वर्षांमध्ये आमदार पळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र जनतेच्या जिव्हाळ्याचा एस्.टी. बसस्थानकाचा विषय निधीअभावी रखडतो, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.
या मोर्चात जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, जिल्हा सचिव श्री. संतोष नलावडे आणि चिपळूण शहराध्यक्ष श्री. अभिनव भुरण आणि शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते.