सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्‍याने रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याचा त्रास दूर होणे

१. रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याचा त्रास २ – ३ मासांनी पुनःपुन्‍हा होणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘युुरिक अ‍ॅसिड’ न्‍यून करण्‍यासाठी प्रतिदिन एक गोळी घ्‍यावी लागेल’, असे सांगणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘मला मागील २ – ३ वर्षांपासून रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याचा त्रास होत होता. हा त्रास २ – ३ मासांनी उफाळून येत असे. हा त्रास उफाळून आल्‍यावर माझ्‍या एका पायाच्‍या घोट्याची हालचाल होऊ शकत नसे. मी भूमीवर पाय टेकवू शकत नव्‍हतो. तो पाय थोडा जरी हलला, तरीही मला पुष्‍कळ वेदना होत असत. असे ३ – ४ दिवस सहन केल्‍यावर माझा त्रास हळूहळू न्‍यून होत असे आणि पुन्‍हा २ – ३ मासांनी मला हा त्रास होत असे. मला सूज येण्‍याच्‍या १ – २ दिवस आधीच ‘माझ्‍या पायावर सूज येईल’, हे लक्षात येत असे; पण मी ते थांबवू शकत नव्‍हतो. माझ्‍या रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’चे प्रमाण १३.९ पर्यंत (टीप) गेले होते. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘युरिक अ‍ॅसिड’ न्‍यून होण्‍यासाठी तुम्‍हाला प्रतिदिन (‘fabustat 30mg’) एक गोळी घ्‍यावी लागेल.’’ (टीप : निरोगी व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’चे प्रमाण ३.५. ते ७.२(mg/dl) इतके असते.)

२. केलेले आयुर्वेदाचे उपचार

श्री. विजय पाटील

हा त्रास दूर होण्‍यासाठी मी पंचकर्म उपचार केले. मी काही मास गोखरूचा काढाही घेतला; पण काहीच लाभ झाला नाही. माझ्‍या रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’चे प्रमाण वाढतच राहिले.

३. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या ‘शारीरिक विकारांवरील नामजप’ या लेखातील ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याचा त्रास दूर होण्‍यासाठी सांगितलेला नामजप केल्‍यावर त्रास उणावणे

मी पुणे येथे नोकरी करत असतांना मार्च २०२२ च्‍या पहिल्‍या आठवड्यात मला ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याचा त्रास होण्‍याची लक्षणे जाणवायला लागली. तेव्‍हा मी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ‘शारीरिक विकारांवरील नामजप’ हा लेख वाचला आणि ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याचा त्रास दूर होण्‍यासाठी दिलेला ‘श्री गणेशाय नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप करायला प्रारंभ केला. त्‍यानंतर गुरुमाऊलींच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या) कृपेने मला फारसा त्रास झाला नाही. त्‍या वेळी मला सुटी घेऊन घरी रहायची वेळ आली नाही.

मी आस्‍थापनात जाता-येता ८ दिवस हा नामजप अनुमाने एक घंटा केला. त्‍यानंतर मी नामजप केला नाही. नंतर मे २०२२ मध्‍ये मला या त्रासाची प्रारंभीची लक्षणे जाणवायला लागल्‍यावर मी पुन्‍हा हा नामजप चालू केला आणि गुरुकृपेने मला पाय सुजण्‍याचा त्रास झाला नाही. नंतर ७ मासांच्‍या कालावधीत गुरुकृपेने मला त्रास झाला नाही.

४. काळानुसार संपूर्ण मानवजातीला उपयुक्‍त होतील, असे विकारांवरील नामजप शोधून दिल्‍याबद्दल गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता !

सत्‍य, त्रेता आणि द्वापर या युगांत ऋषिमुनींनी घोर तपश्‍चर्या करून मानवजातीच्‍या कल्‍याणासाठी वेगवेगळे मंत्र आणि स्‍तोत्रे सिद्ध केली. ते मंत्र आणि स्‍तोत्रे यांच्‍या पठणाने मनुष्‍य आनंदी जीवन जगू शकत होता. कलियुगात ‘नामसाधना’ हीच श्रेष्‍ठ साधना असल्‍याने कृपाळू गुरुमाऊलीने काळानुसार सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या माध्‍यमातून संपूर्ण मानवजातीला उपयुक्‍त होतील, असे विकारांवरील नामजप शोधून दिले आहेत, त्‍याबद्दल कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरीही ती अल्‍पच आहे. रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याच्‍या त्रासातून गुरुमाऊलीने माझी मुक्‍तता केली, त्‍याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

५. प्रार्थना

‘माझ्‍या अंतर्मनात अनेक जन्‍मांपासून वास करणार्‍या भयंकर विकारांपासूनही माझी निरंतर सुटका करावी’, ही श्री गुरूंच्‍या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विजय पाटील, भोर, पुणे. (२९.८.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक