अन्वेषणात प्रथमदर्शनी घातपात झाल्याविषयी माहिती नाही ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी
नीलिमा चव्हाण संशयास्पद मृत्यूचे प्रकरण !
रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण यांच्या मृत्यूनंतर आजपर्यंत झालेल्या अन्वेषणात प्रथमदर्शनी कोणताही घातपात झाल्याविषयी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा घातपात नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. व्हिसेरा (‘मृत्यूचे ठोस कारण काय ?’, याच्या निदानासाठी शरिरातील काही अवयव किंवा रक्त पुढील तपासणीसाठी काढून ठेवले जाते. याला ‘व्हिसेरा’ असे म्हणतात.) तपासणीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड याही उपस्थित होत्या.
(सौजन्य : News18 Lokmat)
जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘‘२९ जुलैला नीलिमा चव्हाण बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या जाण्याच्या मार्गावरील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले आहेत. या प्रकरणी १०४ साक्षीदारही तपासले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार शरिरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने पोलीस अन्वेषण करत असून साक्षीदारांकडे कसून चौकशी चालू आहे. लवकरच या मृत्यूमागील वस्तूस्थिती समोर येईल. व्हिसेरा तपासणी अहवाल ४ दिवसांत प्राप्त होईल आणि त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल.’’