स्वतःची प्राणशक्ती अल्प असूनही साधकांचे सर्व त्रास स्वतःकडे घेऊन साधकांना मोक्षाकडे घेऊन जाणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी श्री. अशोक शांताराम दहातोंडे यांनी व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !
१. प्रारब्धामुळे सुदाम्याच्या होणार्या हालअपेष्टा पाहून व्याकुळ झालेल्या रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करणे आणि भगवान श्रीकृष्णाने सुदाम्याच्या प्रारब्धात हस्तक्षेप करता येत नसल्याविषयी रुक्मिणीमातेची समजूत काढणे : ‘सुदामा भगवान श्रीकृष्णाचा परम भक्त आणि परम मित्र होता. प्रारब्धामुळे सुदाम्याला हाल, असंख्य समस्या आणि दुःख यांना सामोरे जावे लागत होते. श्री महालक्ष्मीरूपी रुक्मिणीमाता सुदाम्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या हालअपेष्टा अन् दुःख पाहून व्याकुळ होऊन भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करायची की, ‘देवा, तुम्ही सुदाम्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे दुःख अन् कष्ट दूर करा.’ प्रत्येक वेळी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीमातेला समजावून सांगत असे की, ‘प्रत्येक जिवाला प्रारब्ध आणि संचित भोगूनच संपवावे लागते.’
२. साधकांची सुदाम्याएवढी भावभक्ती नसूनही कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांचे सर्व त्रास आणि प्रारब्ध स्वतःवर घेऊन साधकांकडून साधना करवून घेत असणे : प.पू. गुरुमाऊली, आमची सुदाम्याप्रमाणे भक्ती नाही. आम्हा सर्व साधकांची तुम्हाला अपेक्षित अशी परिपूर्ण कृती, धर्माचरण आणि धर्मपालन (हिंदु राष्ट्रात अपेक्षित आहे, त्याप्रमाणे) होत नाही, तसेच साधकांकडून तुम्ही सांगितलेली गुरुकृपायोगानुसार साधना तुम्हाला अपेक्षित अशी होत नाही. या घनघोर आपत्काळात ‘कोरोना’ महामारीसारख्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेल्या संकटकाळीही परात्पर गुरुमाऊली विविध आश्रम, प्रसार आणि घरी राहून साधना करणार्या साधकांचे अन् त्यांच्या कुटुंबियांचे सर्व त्रास, प्रारब्ध स्वतःवर घेऊन आमचे रक्षण, पालन-पोषण करत आहे आणि आमच्याकडून साधना करवून घेऊन आम्हाला एक-एक पाऊल देव आणि मोक्ष यांकडे घेऊन जात आहे. त्यामुळेच परात्पर गुरुमाऊलींची प्राणशक्ती पुष्कळ न्यून होत आहे. अशा स्थितीतही त्यांचा ‘माझ्या साधकांसाठी मी आणखीन काय करू शकतो ?’, असाच विचार आणि ध्यास असतो. साधकांना काही, म्हणजे काहीच अल्प पडून देत नाहीत.
‘हे दयाळू, साधकवत्सल, परात्पर गुरुमाऊली, तुम्ही करत असलेली अनंत कोटी कृपा आणि तुमची आम्हा पामरांवर असलेली प्रीती यांविषयी आम्ही तुमच्या चरणी कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?’, हे आमच्या बुद्धीपलीकडचे असून ते आमच्या कधीच लक्षात येऊ शकत नाही. याबद्दल क्षमस्व !’
– श्री. अशोक शांताराम दहातोंडे, देहली (४.३.२०२१)