आहार-विहार सांभाळा !
सांसारिक कृती वेळेत होण्यासाठी सर्वसामान्य झटतात; पण देवाने जे अमूल्य असे शरीर दिले आहे, त्याकडे लक्ष देण्याची वेळ आली की, कारणे दिली जातात. कामाची दगदग, दैनंदिन जीवनात वाढत चाललेला ताण, स्पर्धेत टिकण्याची धडपड आदींचे आव्हान इतके मोठे आहे की, स्वतःच्या शरिराकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. भिंगरीप्रमाणे केवळ तो दैनंदिन जीवनाच्या रहाटगाडग्यात गरगर फिरत आहे. अमुक वयापर्यंत स्वतःचे घर आणि अधिकोष येथे किमान रकमेपर्यंतची बचत, जीवन विमा आदी सगळी गणिते जुळून आणण्यासाठी जिवाचे रान केले जाते. या सर्व पळापळीत ‘स्वतःच्या आरोग्यासाठी वेळच नाही’, असे चित्र निर्माण होते. त्यामुळे विविध आजार मागे लागतात. याचे सारे परिणाम आता तरुणवयातच दिसू लागले आहेत. वृद्धापकाळी तर याचे गंभीर परिणाम विविध आजारांच्या रूपाने समोर येतात. माणूस ज्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर धडपड करतो, तेच पोट सकस आहाराने आणि वेळेत भरले जाण्यासाठी मात्र त्याच्याकडे वेळ नाही. मग इतकी जी वणवण केली जाते, ती कशासाठी ? रात्री विलंबाने कामावरून येणे, त्यामुळे बाहेरचे खाणे, विलंबाने जेवणे आदींमुळे शरिराची प्रचंड हानी होते. या सर्वांचा परिणाम विविध प्रकारचे रोग तरुणपणीच होण्यास आरंभ झाला आहे. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग हे हल्ली तरुणपणीच अनेकांना होतात. दात खराब होणे, केस गळणे, चष्मा लागणे या गोष्टीही अगदी आता लहान वयात होतात. त्यात भ्रमणभाष आणि समाजमाध्यमे यांची भर पडल्याने शारीरिक अन् मानसिक आरोग्याच्या हानीला सीमाच राहिलेली नाही. आहार-विहार, दिनचर्या निसर्गनियमानुसार सात्त्विक न ठेवता मनाप्रमाणे वागले जाते. त्यामुळे रोगग्रस्त होऊन चिकित्सालय आणि रुग्णालय, तसेच औषधे आणि आरोग्य चाचण्या यांची देयके भरणे हे नित्याचे झाले आहे. प्रतिदिन वेळात वेळ काढून व्यायाम किंवा योगसाधना करणे आणि शक्य तितके आयुर्वेदानुसार किंवा निसर्गनियमानुसार आहार-विहार ठेवणे, हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आज बहुसंख्य समाज केवळ स्वतःभोवती गुरफटून गेल्याचे पहायला मिळते. या चौकटीबाहेर जात समाजासाठी किंवा धर्म आणि राष्ट्र यांसाठी काही करण्याचा विचारही बहुतेकांच्या मनाला शिवत नाही. स्वतःचे शरीर आणि मन सशक्त, सक्षम असेल, तर व्यक्ती कार्यक्षम राहून स्वतःच्या पलीकडचा म्हणजे समाजाचा विचार करू शकते.
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई.