मणीपूरमधील रक्‍तपात आणि अमली पदार्थ यांचा ‘सुवर्ण त्रिकोण’शी संबंध !

‘सध्‍या मणीपूरमध्‍ये महिलांशी अपवर्तन केल्‍याची चित्रफीत प्रसारित झाल्‍यानंतर  सगळीकडे वादळ उठले आहे. ख्रिस्‍ती कुकी आणि हिंदु मैतेई समुदायांमधील संघर्ष वाढला आहे; परंतु हा परस्‍पर तणाव केवळ जातीय नसून त्‍यात अमली पदार्थांचा मोठा संबंध आहे. मणीपूर-म्‍यानमार, थायलंड आणि लाओस अशा सुवर्ण त्रिकोणाला (‘गोल्‍डन ट्रँगल’ला) लागून आहे, जेथून अफू आणि इतर अमली पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात व्‍यवहार होतो. या ‘सुवर्ण त्रिकोणा’ने कुकी आणि मैतेई यांना समोरासमोर कसे आणले, हे समजून घेऊया.

मणीपूर येथील दंगलीत जाळण्‍यात आलेली वाहने यांचे संग्रहित छायाचित्र

१. हिंदु मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा दिल्‍याने कुकी समाज अप्रसन्‍न

मणीपूरमध्‍ये मेच्‍या प्रारंभी इंफाळ उच्‍च न्‍यायालयाने पहाडांवर वसलेल्‍या हिंदु मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा (‘एस्.टी.’चा) दर्जा दिला. दुसरीकडे कुकी समाज या निर्णयाच्‍या विरोधात होता. त्‍यानंतर तेथे हिंसाचार उसळला. त्‍यांची आंदोलने अधिकच हिंसक होत गेली. डोंगराळ भागात रहाणार्‍या ख्रिस्‍ती कुकी समाजाची लोकसंख्‍या मैतेईहून थोडी न्‍यून आहे. अशा स्‍थितीत आक्षेप घेण्‍याचे पहिले कारण, म्‍हणजे अनुसूचित  जमातीच्‍या श्रेणीत आल्‍यानंतर तेथे मैतेई हे भूमी खरेदी करू शकतील आणि नोकर्‍यांचीही विभागणी होईल, अशी भीती कुकींना वाटली.

यावर मैतेई समाजाचा युक्‍तीवाद असा आहे की, मणीपूर भारतात विलीन होण्‍यापूर्वी ते अनुसूचित जमातीमध्‍ये होते. नंतर हा दर्जा त्‍याच्‍याकडून काढून घेण्‍यात आला. यानंतर ते त्‍यांच्‍याच राज्‍यात बाजूला पडत गेले. त्‍यांची लोकसंख्‍याही न्‍यून होऊ लागली. मैतेईंची लोकसंख्‍या पूर्वी एकूण लोकसंख्‍येच्‍या ५९ टक्‍के होती, ती वर्ष २०११ च्‍या जनगणनेमध्‍ये ४४ टक्‍क्‍यांपर्यंत न्‍यून झाली. तेव्‍हापासून त्‍यांनी अनुसूचित जमातीचा दर्जा परत मिळावा, यासाठी हिंदु मैतेई समाजाने मागणी चालू केली आहे.

२. कुकी आणि मैतेई समाजांमधील वादामागे व्‍यसनाधीनता ! 

दोन समाजांमध्‍ये वाद असण्‍यामागे अनुसूचित जमाती दर्जा हे अधिकृत कारण असले, तरी मुख्‍य कारण अमली पदार्थ हे आहे. मणीपूरला ‘अफूचा स्‍वर्ग’ समजले जाते. तेेथे अफूची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या व्‍यवसाय कुकी समाजाच्‍या अधीन आहे. अफूची शेती थांबवण्‍यासाठी सरकारने अनुमाने ७ वर्षांपूर्वी कारवाई चालू केली होती, तेव्‍हापासून कुकी अप्रसन्‍न होते. या कारवाईचा अमली पदार्थांच्‍या तस्‍करीवर परिणाम झाल्‍याने त्‍यांचे महत्त्वही न्‍यून होत गेेले. न्‍यायालयाचा आदेश मैतेई समाजाच्‍या बाजूने आला. त्‍यानंतर वाढलेला तणाव आता रक्‍तरंजित बनला आहे. ख्रिस्‍ती कुकींना वाटले की, हिंदु मैतेई समाजानेही डोंगरावर भूमी खरेदी करणे चालू केले, तर अफूची शेती विभागली जाईल किंवा हा व्‍यवसाय नष्‍ट होईल. आतापर्यंत कुकी समाजाच्‍या आतंकवादी लोकांनी त्‍यावर कब्‍जा केला होता. ते अफू पिकवायचे आणि म्‍यानमारला पाठवायचे. तेथून अफू जगभर पसरायचे. अमली पदार्थांच्‍या तस्‍करीवर सरकारने कठोर आघात केला होता. आता मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाल्‍याने कुकींवर दुहेरी फटका बसल्‍याचे समजले जात आहे.

मणीपूर येथील दंगलीत जाळण्‍यात आलेली घरे यांचे संग्रहित छायाचित्र

३. मणीपूर-म्‍यानमार सीमेवरून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी आणि तस्‍करी

‘अमली पदार्थविरोधी पथका’ने (‘नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरो’ने) मणीपूरविषयी यापूर्वीही चेतावणी दिली आहे. मणीपूरची  सीमा म्‍यानमारला लागून आहे, जो सुवर्ण त्रिकोणाचा (गोल्‍डन ट्रँगलचा) भाग आहे. हा सुवर्ण त्रिकोण म्‍यानमार, थायलंड आणि लाओस यांच्‍यात स्‍थित आहे, जो दक्षिण आशियातील अमली पदार्थांच्‍या पुरवठ्याचा सर्वांत मोठा स्रोत समजला जातो. याला अमेरिकी गुप्‍तचर संस्‍था ‘सीआयए’ने भौगोलिक आधारावर ‘गोल्‍डन ट्रँगल’ असे नाव दिले. मणीपूरच्‍या अफूचा दर्जा चांगला आहे. त्‍यामुळे हे देश तेथे अफूच्‍या लागवडीला चालना देण्‍यासाठी सर्व योग्‍य-अयोग्‍य पद्धतींचा अवलंब करतात.

ते स्‍थानिक लोकांना अधिक पैशाचे आमीष दाखवतात आणि यात अडकवतात. त्‍यानंतर शेती आणि तस्‍करी यांचा खेळ चालू होतो. हे सर्व गेली अनेक दशके अत्‍यंत पद्धतशीरपणे चालू होते. ‘लंडन स्‍कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स’चा अहवाल ‘सिक्‍युरिटी चॅलेंजेेस अलाँग द इंडिया-म्‍यानमार बॉर्डर’ यानुसार भारत आणि म्‍यानमार यांमधील अनेक किलोमीटरच्‍या खुल्‍या सीमेमुळेही अनेक समस्‍या निर्माण होत आहेत.

म्‍यानमार-मणीपूर सीमेवर एक वेगळी व्‍यवस्‍था आहे, ज्‍याला ‘फ्री मुव्‍हमेंट रेझिम’ म्‍हणतात. ‘फ्री मुव्‍हमेंट रेझिम’ अशी सूट देते की, सीमेपलीकडे १६ किलोमीटरच्‍या परिघात रहाणारे लोक कोणत्‍याही ‘व्‍हिसा’ किंवा पडताळणी यांखेरीज इकडून तिकडे जाऊ शकतात. या अंतर्गत आदिवासींना कोणतीही हलकी फुलकी वस्‍तू समवेत नेण्‍याची अनुमती आहे. या सवलतींचा अपवापर करून लोक अमली पदार्थांची तस्‍करी करतात.

४. अफू पिकवण्‍यासाठी म्‍यानमारचे सहस्रो लोक मणीपूरमध्‍ये स्‍थायिक

अशा प्रकारे म्‍यानमारचे तस्‍कर भारतात येतात आणि येथून अमली पदार्थांचा पुरवठा करतात. मणीपूर आणि म्‍यानमार यांची सीमा लागून असल्‍यामुळे या दोघांमध्‍येही रोटी-बेटीचे व्‍यवहार होत आहेत. या कारणास्‍तव स्‍थानिक लोकही अनेक संवेदनशील माहिती सामायिक करतात, जी तस्‍करांच्‍या उपयोगी पडते. इतर देशांतून आलेले तस्‍करही त्‍यांच्‍या लोकांना येथे वसवत आहेत. अफूच्‍या लागवडीमध्‍ये गुंतलेल्‍या लोकांमध्‍ये कुकी-चिन-जो एथनिक वांशिक समूहाचे लोक अधिक आहेत. हे तेच लोक आहेत, जे म्‍यानमारमधून आले आणि अनधिकृतपणे येथे स्‍थायिक होऊ लागले. ते अफूच्‍या उत्‍पादनासाठी चुराचुंदपूर, चांदले जिल्‍ह्यातील जंगले तोडून शेतीसाठी भूमी सिद्ध करत आहेत. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये अनुमाने १ सहस्र अवैध घुसखोर पकडले गेले आहेत, जे अफू पिकवण्‍यासाठी म्‍यानमारमधून येथे स्‍थायिक झाले होते.

५. ईशान्‍य भारतातील अमली पदार्थांचा व्‍यापार थांबवण्‍यासाठी सीमांवरील पडताळणी कठोर करणे आवश्‍यक !

थोड्या मागील घटना पाहिल्‍या, तर आठवते की, अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्‍या आत्‍महत्‍येच्‍या प्रकरणातही अमली पदार्थविरोधी पथकाने या ‘गोल्‍डन ट्रँगल’विषयी चर्चा केली होती. केवळ मणीपूरच नाही, तर अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड राज्‍यांच्‍याही सीमाही अतिशय संवेदनशील असल्‍याचे अन्‍वेषण अधिकारी म्‍हणाले होते. येथून अफू बाहेर जाते आणि उरलेले अमली पदार्थ आत येत देशातील मोठ्या शहरांपर्यंत पोचतात. एवढेच काय, आसामची राजधानी गौहत्तीही तस्‍करांच्‍या तावडीत असल्‍याचे समजते.

म्‍यानमारमधून हेरॉईन आणि अ‍ॅम्‍फेटामाईनचे प्रकार, स्‍टिमुलेंट्‍स (उत्तेजक) भामो, लशिओ आणि मांडली यांमार्गे केवळ मणीपूरच नाही, तर मिझोराम आणि नागालँड येथे जात राहिले. वर्ष २०११ मधील हॉवर्ड विद्यापिठाच्‍या अहवालात दावा करण्‍यात आला होता की, तेथील सीमा पडताळणी कठोर नसल्‍याने मणीपूर हे अमली पदार्थांच्‍या तस्‍करांचे आवडते ठिकाण आहे.’

(साभार : ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे संकेतस्‍थळ)