शिक्रापूर (पुणे) महाविद्यालयाच्‍या गलथान कारभारामुळे बी.कॉम.च्‍या प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण !

शिक्रापूर (पुणे) – विद्यापिठाने बी.कॉम.च्‍या प्रथम वर्षाचे निकाल नुकतेच घोषित केले. यामध्‍ये कस्‍तुरी शिक्षण संस्‍थेच्‍या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. कुणालाच द्वितीय सत्राचा एकही गुण मिळाला नाही; म्‍हणून विद्यापिठात चौकशी केली, तर ‘महाविद्यालयानेच वेळेत गुण पाठवले नाहीत’, असे विद्यापिठाने सांगितले. याविषयी महाविद्यालयात चौकशी केली असता महाविद्यालय अरेरावीची भूमिका घेत आहे. काही विद्यार्थ्‍यांनी पोलीस ठाण्‍यामध्‍येही दाद मागितली होती. ‘आमची चूक नसतांनाही हा भूर्दंड आम्‍हाला का ?’ असा प्रश्‍न शिक्रापूरच्‍या कस्‍तुरी शिक्षण संस्‍थेत शिकणार्‍या विद्यार्थ्‍यांनी उपस्‍थित केला आहे.

यावर बी.कॉम.च्‍या प्रथम वर्षाचे गुण महाविद्यालयाकडून पाठवण्‍यात आले असल्‍याचे कस्‍तुरी शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक डॉ. पंडित पलांडे यांनी सांगितले. (महाविद्यालयाने पुढाकार घेऊन वेळेत समस्‍या सोडवणे आवश्‍यक आहे. यामध्‍ये विद्यार्थ्‍यांना झालेल्‍या मनस्‍तापाला कोण उत्तरदायी ? – संपादक)

संपादकीय भूमिका :

असा गलथान कारभार विद्यापिठात होणे अपेक्षित नाही. याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !