गोव्यात गेल्या ५ वर्षांत ८६ किशोरवयीन मुलींना गर्भधारणा ! – मंत्री विश्वजीत राणे यांची विधानसभेत माहिती

पणजी, ६ ऑगस्ट (वार्ता.) – मागील ५ वर्षांत राज्यात ८६ किशोरवयीन मुलींना गर्भधारणा झाल्याची माहिती महिला आणि बाल कल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत एका लेखी प्रश्नावर उत्तरादाखल दिली आहे. राज्यात रहात असलेल्या परराज्यातील कुटुंबांतील किशोरवयीन मुलींमध्ये गर्भधारणा होण्याचे प्रकार वाढत आहे का ? असा प्रश्न काँग्रेसचे हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी विचारला होता. यावर उत्तरादाखल मंत्री विश्वजीत राणे यांनी यासंबंधीची माहिती खात्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले.

उत्तरात मंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘मुलींना किशोरवयात गर्भधारणा होण्यामागील निश्चित कारण शोधले जात आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील विविध आरोग्य केंद्रांच्या वतीने कुटुंबे आणि मुली यांच्यामध्ये जागृती करण्यात येत आहे. विविध जागृतीपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. पीडित युवतींना आधार देण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. म्हापसा आणि मडगाव रेल्वेस्थानक यांवर ‘चाईल्ड हेल्पलाईन’ चालू करण्यात आली आहे, तसेच गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बालकल्याण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.’’

संपादकीय भूमिका

आजवर लोकप्रतिनिधींनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे !