रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करत असतांना सतत शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असणारे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती अपार भाव असलेले घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६४ वर्षे) !

‘वर्ष १९९३ पासून मी सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून साधना करायला आरंभ केला. काही कारणाने मी संस्‍थेच्‍या कार्यापासून दूर गेलो. मी प.पू. गुरुदेवांपासून (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यापासून) दूर गेलो असलो, तरी त्‍यांनी माझा हात सोडला नव्‍हता. त्‍यांच्‍या कृपेने पुन्‍हा मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात येण्‍याची संधी मिळाली. आश्रमात आल्‍यावर मला त्‍यांच्‍या दर्शनाची आणि सत्‍संगाची संधी मिळाली. प.पू. गुरुदेवांच्‍या सत्‍संगातून आणि आश्रमात सेवा करतांना मला पुष्‍कळ शिकायला मिळाले. प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेने मला पुष्‍कळ अनुभूतीही आल्‍या. त्‍या येथे दिल्‍या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात अनुभवलेली सूत्रे

१ अ. विवाहपत्रिकेचा घेतलेला सूक्ष्म प्रयोग : ‘प.पू. गुरुदेव (परात्‍पर गुरु डॉ. आठवले), एकदा तुमचा सत्‍संग लाभला, तेव्‍हा तुम्‍ही आमच्‍याकडून एक सूक्ष्मातील प्रयोग करून घेतला. तुम्‍ही आम्‍हा साधकांना २ विवाहपत्रिका दाखवून विचारले, ‘‘या २ विवाहपत्रिकांकडे पाहून काय वाटते ?’’ त्‍यातील एका आयताकृती पत्रिकेकडे पाहून सर्व साधकांनी ‘चांगले वाटते’, असे सांगितले. तेव्‍हा तुम्‍ही त्‍या पत्रिकेची पुढची बाजू (दर्शनी भाग) आम्‍हाला दाखवली. त्‍यावरील भगवान श्रीकृष्‍णाचे चित्र पाहून सर्व साधक आनंदी झाले. नंतर आपण ती पत्रिका उघडून पत्रिकेचा आतील भाग दाखवून साधकांना विचारले, ‘‘आता याकडे पाहून काय वाटते ?’’ तेव्‍हा साधकांनी सांगितले, ‘‘पत्रिकेतून चैतन्‍य आणि आनंद यांच्‍या लहरी येत आहेत.’’ मला त्‍यात ‘पोकळी निर्माण झाली आहे’, असे दिसले. चित्र सगुण आहे, तर अक्षर निर्गुण आहे (चित्रापेक्षा अक्षर सूक्ष्म आहे; म्‍हणून अक्षर निर्गुण आहे.); म्‍हणून अक्षरे लिहिलेला भाग मला निर्गुण जाणवला. आपल्‍याच कृपेने मला ‘निर्गुण निर्गुणाकडे नेत आहे’, हे अनुभवता आले. आपण मला म्‍हणालात, ‘‘एवढी प्रगती कशी केलीत ?’’ गुरुदेव, साधकांना आनंद देणारे आपणच आहात आणि साधकांना सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जाणारेही आपणच आहात ! कर्ते-करविते, परमेश्‍वर आपणच आहात, गुरुदेव !

श्री. बबन वाळुंज

१ आ. ‘गुरुदेवांच्‍या बोटांमधून चैतन्‍य प्रक्षेपित होते’, ते प्रत्‍यक्ष प्रयोगांमधून पहायला मिळणे : गुरुदेव, आपण आपल्‍यासमोरील प्‍लास्‍टिकच्‍या डब्‍यातील पाण्‍यात आपले एक एक बोट बुडवून नंतर पाचही बोटे एकत्र पाण्‍यात घातलीत. प्रत्‍येक वेळी आपण साधकांना विचारले, ‘‘या पाण्‍याकडे पाहून काय वाटते ?’’ तेव्‍हा सर्व साधकांनी सांगितले, ‘‘पाणी गुलाबी झाले.’’ हे ऐकून आपण आनंदी झालात. गुरुदेव, आपल्‍या चरणी पंचतत्त्वे विलीन झाली आहेत, ही अनुभूती आपणच साधकांना दिलीत. क्षणोक्षणी आम्‍हाला अनुभूती देणारेही आपणच आहात, गुरुदेव !

१ इ. सर्व साधकांकडे लक्ष देऊन त्‍यांच्‍यावर प्रीतीवर्षाव करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले ! : या सत्‍संगाच्‍या वेळी एक हिंदी भाषिक साधक आणि त्‍यांची कन्‍या एका बाजूला बसले होते. त्‍यांच्‍याकडे आपले लक्ष गेल्‍यावर आपण त्‍यांच्‍यावर प्रेमाचा वर्षाव करून त्‍यांना आनंदासागरात डुंबवले.

२. ‘अहं आणि अपेक्षा’, या स्‍वभावदोषांमुळे अहं दुखावला जाऊन समष्‍टी कार्यापासून दुरावणे; मात्र परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी हात न सोडणे

गुरुदेवा, पूर्वी तुम्‍ही माझे पुष्‍कळ कौतुक केले; पण त्‍यामुळे माझा अहं वाढला. ‘आपले समष्‍टी रूप साधकांमध्‍ये आहे, ते सर्वत्र आहे’, हे स्‍वकौतुकरूपी अहं आणि अपेक्षा यांमुळे माझ्‍या लक्षातच येत नव्‍हते. त्‍यामुळे समष्‍टी कार्य करतांना माझा अहं दुखावला जाऊन मी सेवेपासून दुरावलो; मात्र आपण मला सोडले नाहीत. मला आपले दर्शन व्‍हायचे. माझ्‍यावर अनेेक संकटे आली; पण आपण मला स्‍थिर ठेवून त्‍यातून बाहेर काढले. आपल्‍याच कृपेने माझा रामनाथी आश्रमात येण्‍याचा योग आला. मला येथे धान्‍य निवडण्‍याची सेवा मिळाली.

३. रामनाथी आश्रमात आल्‍यावर शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. धान्‍य निवडण्‍याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे : धान्‍य निवडतांना माझ्‍या मनाची एकाग्रता होऊन ते-ते धान्‍याचे कण माझ्‍याशी बोलत होते.

३ अ १. मटकीकडून ‘मन निर्मळ करायचे आहे’, हे शिकता आल्‍यामुळे गुरुचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त होणे : मटकी निवडत असतांना मटकी माझ्‍याशी बोलू लागली, ‘तू मला निर्मळ करतोस; पण तू कधी निर्मळ होणार ?’ तिच्‍याकडून मला माझे अंतःकरण निर्मळ करण्‍याचा दृष्‍टीकोन मिळाला. त्‍यामुळे माझ्‍याकडून कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

३ अ २. मेथीने ‘मनुष्‍य गुण्‍या-गोविंदाने एकत्र राहू शकत नाही’, असे सांगणे, तेव्‍हा ‘आताचा आपत्‍काळ हा मनुष्‍यासाठीच आहे’, असे लक्षात येणे : मेथी निवडतांना मी मेथीतील मोहरी बाजूला करत होतो. तेव्‍हा मोहरी मला म्‍हणाली, ‘मी मोहरी, ती मेथी. आम्‍ही वेगळ्‍या असूनही एकत्र रहातो; मात्र तुम्‍ही (मनुष्‍य) कधी असे एकत्र राहू शकता का ? नाहीच. स्‍वार्थासाठी जन्‍मोजन्‍मी भांडत रहाता. तुम्‍हीच निसर्ग आणि जीवसृष्‍टी यांची हानी केली आहे. खरे म्‍हटले, तर आजही आम्‍ही, सर्व जीवसृष्‍टी, वृक्ष, वनस्‍पती कलियुगात असूनही सत्‍यलोकाची अनुभूती घेतो.’

हे गुरुदेवा, तेव्‍हा आपल्‍याच कृपेने लक्षात आले, ‘आताचा चालू झालेला आपत्‍काळ हा सर्वसामान्‍य मनुष्‍यासाठी आहे.’

३ अ ३. सेवा करतांना ज्‍वारीचेे दाणे मला म्‍हणाले, ‘चिंतन कर. नाहीतर सेवा यांत्रिकपणे होईल.’

३ अ ४. ‘या पृथ्‍वीतलावरील प्रत्‍येक लहानात लहान जिवाचीही काळजी घेणारा भगवंतच आहे’, हे लक्षात येणे : एकदा सकाळी अल्‍पाहारासाठी शेवया निवडायची सेवा मिळाली. माझ्‍या बाजूला सेवा करणार्‍या ताईला विचारले, ‘‘यात काय निवडायचे.’’ त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘खडे आणि किडेही आहेत.’’ गुरुस्‍मरण करून निवडण्‍यास आरंभ केला. त्‍यात बारीक, गोल, चपटे आणि काळ्‍या रंगाचे किडे दिसत होते. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘या किड्यांना सांभाळणाराही भगवंतच आहे. हे गोणीत बंदिस्‍त असूनही देव त्‍यांची काळजी घेतो. त्‍यांना पंचतत्त्वे, उदा. पाणी, वायू आणि तेज पुरवतो.’ देवाची काय लीला आहे ? गुरुदेव, तुम्‍ही सार्वजनिक सभेत सांगायचात, ‘महासागराच्‍या तळाशी असलेल्‍या जिवाचीही भगवंत काळजी घेतो.’ या विचारांनी माझी भावजागृती होत असे. आपल्‍या या वाक्‍याची आपण आम्‍हा साधकांना प्रचीतीच देत आहात. कृतज्ञ आहे, गुरुदेव !

३ अ ५. ‘धान्‍यांमुळे मनुष्‍यजीवन आहे आणि केवळ गुरुकृपेनेच ते साधकांना समजत आहे’, असे इतर धान्‍यांनी सांगणे : इतर धान्‍ये निवडतांना ती मला म्‍हणाली, ‘आमच्‍यामुळे मनुष्‍य जीवन आहे; पण तुम्‍हाला आमची किंमत नाही. तुमचे पोषण करणारे आम्‍हीच आहोत. हे आता तुम्‍हा साधकांना गुरुकृपेने कळत आहे. प.पू. गुरुदेवांची तुमच्‍यावर केवढी कृपा आहे.’  तेव्‍हा माझ्‍याकडून त्‍या धान्‍यांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

३ अ ६. धान्‍यातील कचर्‍याने ‘साधकांना थोर गुरु लाभल्‍यामुळे साधक भाग्‍यवान असून माझ्‍यासारख्‍या कचर्‍याचे (प्रारब्‍धाचे) गाठोडे साधकांमध्‍ये आहे आणि गुरुकृपेने योग्‍य क्रियमाण वापरले, तर मनुष्‍यजन्‍माचे सार्थक होईल’, असे सांगणे : धान्‍यातील बाजूला काढलेला कचरा वाटीत ठेवला जातो आणि निवडलेले धान्‍य मोठ्या भांड्यात ठेवले जाते. तेव्‍हा माझे लक्ष निवडलेल्‍या धान्‍याकडे जाण्‍यापेक्षा वाटीतील कचर्‍याकडेच जात होते. तो कचरा मला म्‍हणाला, ‘आम्‍हाला या धान्‍यामुळे रामनाथी आश्रमात येण्‍याचे भाग्‍य लाभले. तुम्‍ही साधक भाग्‍यवान आहात. तुमच्‍या जीवनात असे गुरु आले. तुमचे चिंतन व्‍हायला पाहिजे की, माझ्‍यासारखे कचर्‍याचे गाठोडे तुमच्‍यातही आहे; म्‍हणून तुम्‍हाला प्रारब्‍ध संपवण्‍यासाठी मनुष्‍यजन्‍म मिळाला आहे. ही गुरुकृपाच आहे. क्रियमाण कर्म योग्‍य दिशेने वापरल्‍यावर जन्‍माचे सार्थक होणारच आहे !’

‘गुरुदेवा, आपल्‍याच कृपेने धान्‍य निवडतांना माझ्‍या लक्षात आले की, ही सर्व धान्‍ये आश्रमातील चैतन्‍याने भारित झाली आहेत.’ तेव्‍हा माझा धान्‍यांप्रती भाव जागृत होऊन आपल्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

३ आ. ध्‍यानमंदिरातील भिंतीकडून शिकायला मिळालेले सूत्र : मी ध्‍यानमंदिरात नामजप करण्‍यासाठी बसतांना प्रार्थना केली. मी भिंतीला म्‍हणालो, ‘तुझ्‍यातील चैतन्‍याने मी आनंदी झालो.’ तेव्‍हा ती मला म्‍हणाली, ‘मी भिंत आहे. मला कुठेे जायचे म्‍हटले, तरी जाता येत नाही. तुम्‍ही साधक आहात. तुम्‍हीच आता सात्त्विक आणि चैतन्‍यमय व्‍हायचे आहे. आताच लाभ करून घ्‍या.’

‘गुरुदेवा, आपली कृपा आणि आश्रमातील सात्त्विकता अन् चैतन्‍य यांमुळे मला ‘निर्जीव वस्‍तूही बोलतात’, ही अनुभूती घेता आली.’

४. रामनाथी आश्रमात मिळत असलेल्‍या महाप्रसादाविषयी असलेला भाव !

४ अ. ‘साधकांच्‍या प्रसाद-महाप्रसाद यांत अयोग्‍य काही जाऊ नये’, यांसाठी प्रत्‍येक धान्‍य ३ वेळा निवडले जाणे : ‘एकदा पोहे निवडतांना त्‍यामध्‍ये वृक्षाच्‍या सालीचा काळपट तुकडा मिळाला. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘गुरुदेवांनी साधकांच्‍या प्रसादात अयोग्‍य काहीही जाऊ नये’, यासाठी ‘एकदा निवडले’, ‘फेर निवडले’ आणि ‘परत निवडले’ अशा पद्धतीने धान्‍य निवडण्‍यास शिकवले आहे. त्‍या धान्‍यावर साधकांचे चैतन्‍यमय प्रेमाचे हात फिरतात. ते सात्त्विक अन् चैतन्‍यमय झालेले अन्‍न आपले साधक ग्रहण करतात.

४ आ. रामनाथी आश्रमात मिळत असलेला अतुल्‍य महाप्रसाद ! : ‘गुरुदेवा, या प्रसाद-महाप्रसादाचे मोल करता येणार नाही. तो अमूल्‍य आणि अतुल्‍य आहे. त्‍याला दिलेली ‘अमूल्‍य’ ही उपमा येथे तोकडीच पडते. खरेतर, मूल्‍य आणि अमूल्‍य हे शब्‍द व्‍यवहाराशी संबंधित आहेत. ते चैतन्‍यमय महाप्रसादाला कसेे लागू पडतील ? आश्रमात आलेल्‍या धान्‍यांमध्‍ये आश्रमातील चैतन्‍य संक्रमित होऊन त्‍याचा साधकांना लाभ होतो; म्‍हणून साधकांना धान्‍याचा सत्‍संग मिळतो आणि आपल्‍या कृपेने धान्‍याला साधकांचा सत्‍संग मिळतो. या दोघांचाही उद्धार करणारे आपणच आहात, गुरुदेव !

४ इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने आश्रमात प्रतिदिन मिळणारा महाप्रसाद, म्‍हणजे ‘कलियुगात मिळत असलेला गोपाळकाल्‍याचा प्रसाद आहे’, असा भाव असलेले श्री. वाळुंज ! : द्वापरयुगात ‘श्रीकृष्‍णाच्‍या गोपाळकाल्‍याचा लाभ व्‍हावा’, यासाठी देवताही यमुनेतील मासे होऊन चैतन्‍यमय प्रसाद मिळण्‍याची वाट पहात असत. प.पू. गुरुदेव, या कलियुगात आपत्‍कालीन स्‍थितीतही साधकांना प्रतिदिन गोपाळकाल्‍याचा चैतन्‍यमय महाप्रसाद मिळत आहे. हे आम्‍हा साधकांचे परमभाग्‍यच आहे.’

(क्रमशः उद्याच्‍या अंकात)

– श्री. बबन वाळुंज, घाटकोपर (मुंबई)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/708993.html