हसतमुख, प्रेमळ आणि शारीरिक त्रास असूनही सर्व प्रकारच्या सेवा भावपूर्ण करणार्या ठाणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता नंदकिशोर ठाकूर (वय ६२ वर्षे) !
‘जून १९९८ मध्ये मी सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. त्या वेळी मी प्रथम श्री. नंदकिशोर ठाकूर यांच्या घरी गेलो. तेव्हापासून मी अध्यात्मप्रसाराच्या सेवेनिमित्त सौ. नम्रता ठाकूर यांच्या संपर्कात आलो. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. मनाचा मोठेपणा
श्री. नंदकिशोर आणि सौ. नम्रता ठाकूर यांचे घर नौपाडा (ठाणे) येथे मध्यवर्ती ठिकाणी अन् रहदारीच्या मार्गावर आहे. पूर्वीच्या काळातील तो एक मोठा बंगला आहे. ‘त्यांचे घर जसे मोठे आहे, तसे ठाकूरकाका-काकूंचे मनही पुष्कळ मोठे आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. प्रेमळ आणि हसतमुख
त्या वेळी श्री. ठाकूरकाका ठाणे जिल्ह्यातील अध्यात्मप्रसाराची सेवा करत असत. मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा अनेक साधक दिवाणखान्यात उपस्थित होते. त्या वेळी ठाण्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवाचे नियोजन चालू होते. काकांनी माझे अगत्याने स्वागत केले आणि माझी विचारपूस केली. त्याच वेळी ठाकूरकाकूंची ओळख झाली. तेव्हा माझ्या लक्षात आलेले त्यांचे गुण, म्हणजे त्या पुष्कळ प्रेमळ आणि हसतमुख आहेत अन् त्यांचा आवाज एखाद्या लहान मुलीसारखा गोड आहे.
२.८.२०२३ या दिवशी सद़्गुरु अनुराधा वाडेकर या काकूंना भेटायला गेल्या होता. तेव्हा त्यांनी मला काकूंची काही छायाचित्रे पाठवली. ती पाहिल्यावर काकू एवढ्या गंभीर आजारी असूनही त्यांचा चेहरा प्रसन्न आणि आनंदी जाणवला.
३. निर्मळ मन आणि मनमोकळेपणा
काकूंचे मन निर्मळ असून त्या सर्व साधकांशी मनमोकळेपणाने आणि आपुलकीने बोलतात. त्यामुळे साधकांना त्यांच्या घरात वावरतांना मुळीच संकोच वाटत नाही. काकू साधकांना पहिल्या भेटीतच आपलेसे करून घेतात.
४. साधकांचे आदरातिथ्य प्रेमाने करणे
पुढे सेवेच्या निमित्ताने वर्ष २००२ पर्यंत माझे जवळजवळ प्रतिदिनच सेवेनिमित्त त्यांच्या घरी जाणे व्हायचे. काकू येणार्या-जाणार्या साधकांसाठी चहा-पाणी आणि दूरवरून येणार्या साधकांसाठी जेवणाची व्यवस्था अत्यंत प्रेमाने करायच्या. ‘याचा त्यांना कंटाळा आला’, असे माझ्या पहाण्यात कधीच आले नाही.
५. कुटुंबाचे दायित्व आणि साधकांचे आदरातिथ्य या दोन्ही गोष्टी संयमाने अन् शांतपणे पार पाडणे
काकूंच्या घरी एकत्र कुटुंबपद्धत होती. काका आणि त्यांचे २ भाऊ यांचे कुटुंब अन् आई-वडील, असे मोठे कुटुंब होते. त्यांच्या घरी सतत नातेवाइकांची ये-जा असायची. या सर्वांचे चहा-पाणी आणि जेवण यांकडेही काकूंना लक्ष द्यावे लागायचे. त्यातच साधकांचे सतत येणे-जाणे, सत्संग, अभ्यासवर्ग इत्यादी असायचे. ‘एवढ्या सर्व गडबडीत काकूंची कधी चिडचिड झालेली आहे’, असे माझ्या पहाण्यात आले नाही. काकू संयमाने आणि शांतपणे एकेक सेवा करत रहायच्या.
६. काकूंचे घर म्हणजे सनातनचे सेवाकेंद्रच !
काकांच्या घरी सनातनच्या दिवसभर सेवा चालायच्या. त्याला त्यांच्या आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता. काकांची मुले मयुरी आणि अंकुर यांच्यासह पूर्ण ठाकूर कुटुंब सनातनमय झाले होते. एकमेकांना द्यावयाचे निरोप आणि वस्तू काकांच्या घरी ठेवल्या जायच्या. काकू ते सर्व निरोप आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे अंक, ग्रंथ, अंगफलक, भित्तीपत्रके, कापडी फलक इत्यादी साहित्य त्या त्या साधकाला आठवणीने द्यायच्या. काकू सर्व सेवा भावपूर्ण करायच्या.
७. साधकांच्या सामूहिक नामजपाचे नियोजन आणि चहा-पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करणे
वर्ष २००१ – २००२ या कालावधीत अधूनमधून दिवसभरात अनुमाने ८ घंटे सामूहिक नामजप करण्याचे नियोजन असायचे. नौपाडा (ठाणे) येथील सामूहिक नामजपाचे नियोजन ठाकूरकाकांच्या घरी असायचे. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ – ९ वाजेपर्यंत साधक आपापल्या वेळेनुसार तेथे येऊन नामजप करायचे. त्या वेळी काका आणि काकू नामजपाचे नियोजन, तसेच चहा-पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करायचे.
८. इतरांचा विचार करणे
मे २००० मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई-ठाणे-रायगड या आवृत्तीचा आरंभ होण्यापूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रसार करण्यासाठी आम्ही १५ – २० साधक अनुमाने एक मास प्रतिदिन रात्री १० वाजल्यानंतर ‘सनातन प्रभात’विषयीची माहिती भिंतींवर रंगवण्यासाठी जायचो. आम्हाला परत येण्यास रात्रीचे २ – ३ वाजायचे. त्यामुळे काकू आम्हा सर्वांसाठी प्रतिदिन मोठे थर्मास भरून चहा, तसेच भूक लागल्यास खाण्यासाठी सुका खाऊही आवर्जून द्यायच्या.
९. स्वतःच्या देहाचा विचार न करता सर्व प्रकारच्या सेवा मनापासून करणे
काकू त्यांच्या घरी आलेल्या साधकांचे चहा-पाणी आणि समन्वय सेवा करायच्या. यांसह त्या जिल्ह्याच्या ग्रंथसाठ्याचे दायित्वही पहायच्या. त्यांच्याकडे सर्व भाषांच्या ग्रंथांचा साठा होता. त्या वेळी या सेवेची व्याप्ती पुष्कळ मोठी होती. ‘साधक आणि ग्रंथ वितरण कक्ष यांना ग्रंथ देणे अन् त्यांचा हिशोब ठेवणे’, यांसारख्या सेवा त्या करायच्या. खरेतर काकूंना प्रकृतीच्या बर्याच अडचणी होत्या. त्यांच्या कमरेच्या हाडाचे शस्त्रकर्म झाले होते. त्यांना ऊठ-बस करायला जमत नसे, तसेच काकांना मधुमेह असल्यामुळे त्यांच्या पथ्य-पाण्याचे काकूंना पहायला लागायचे, तरीही त्या स्वतःच्या देहाचा विचार न करता सर्व सेवा मनापासून करायच्या. याबद्दल त्यांचे कितीही कौतुक केले, तरी ते अल्पच आहे.
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भावपूर्ण सेवा करणे
जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ठाणे जिल्ह्यातील साधकांसाठी मार्गदर्शन असायचे, तेव्हा त्यांची सर्व व्यवस्था ठाकूरकाकांच्या घरी असायची, तसेच ठाणे जिल्ह्यांतर्गत सत्संग, अभ्यासवर्ग, मार्गदर्शन इत्यादी सर्व कार्यक्रम त्यांच्या घरी असत. तेव्हा काकू परात्पर गुरु डॉक्टर आणि साधक यांची भावपूर्ण सेवा करायच्या. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे.
काकूंमध्ये स्वभावदोष आणि अहं अल्प आहे. ‘साधनेची तीव्र तळमळ, प्रीती, इतरांचा विचार करणे, झोकून देऊन सेवा करणे, संयम, समंजसपणा’, यांसारखे अनेक गुणत्यांच्यात आहेत.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेने मला ठाकूरकाकूंसारख्या विविध गुणांनी युक्त असलेल्या साधिकेचा सत्संग साधनेच्या आरंभीच्या टप्प्यातच मिळाला आणि त्यांच्यातील वरील गुण शिकण्याची संधी मिळाली’, याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने मी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण करतो.
इदं न मम ।’
– (सद़्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.८.२०२३)